भिर्रर्रर्र ऽऽऽ उचल की टाक…

ब्लॉग या नव्या माध्यमाच्या विश्वात पहिलं पाऊल टाकताना आपल्या परंपरेचा आणि संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या बैलगाडा शर्यतीच्या विषयाशिवाय आणखी कोणता विषय समर्पक असू शकतो, असं आपलं मला सहज वाटलं. आम्हाला नव्याच्यी कास धरायची आहे. अगदी जरुर धरायची आहे. मात्र, हे करताना आम्ही आमची संस्कृती आणि प्रथापरंपरांना फाटा देऊ शकत नाही, हेच माझं म्हणणं आहे. त्यामुळंच माझा पहिला ब्लॉग हा माझ्या लाडक्या सर्जा-राजासाठी…

Image

बरोब्बर एक वर्ष पूर्ण झालं बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठून आणि पुन्हा सुरू होऊन. राज्य सरकारनं ऑगस्ट २०११ मध्ये सर्क्युलर काढून बैलगाडा शर्यतींवरील बंदी म्हणजे कोणताही सारासार विचार न करता घेतलेला मोगलाई निर्णय होता. नंतर हायकोर्टातही ही बंदी काय राहिली. मात्र, उत्साही गावकऱ्यांनी बैलगाडा शर्यती आयोजित करण्याचे सुरूच ठेवले. त्यामुळे गावागावांमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास प्रारंभ केला. सर्वसामान्य शेतकरी त्यामुळं नाडला गेला. शेतकऱ्यांचे तारणहार आम्हीच आहोत, अशा पद्धतीनं भाषणे ठोकायची. मात्र, त्याच शेतकऱ्याला कसा त्रास होईल, यासाठी सर्क्युलर काढायचे. व्वा.. रे काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार.

काय झालं या बंदीमुळं. शेतकऱ्याचा आनंद हिरावून घेण्याचे पाप काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या माथी लागले. मुळात अशी बंदी घालण्याची काही आवश्यकताच नव्हती. कारण कोणत्याही शेतकऱ्याचं उदाहरण घ्या, तो स्वतःपेक्षा त्याच्याकडील पशुधन अधिक प्रेमाने जपतो. त्यांची स्वतःच्या जिवापेक्षा अधिक काळजी घेतो. वेळप्रसंगी तो स्वतः उपाशी राहिल, पण आपल्या गायी-बैलांना चारा दिल्याशिवाय त्याला चैन पडणार नाही. पोटच्या पोरासारखा तो जनावरांना जपत असतो. त्यामुळं बैलगाडा शर्यतींमुळं बैल जोड्यांवर अन्याय, अत्याचार होईल, ही धारणाच चुकीची आहे.

पण ‘व्हाइटकॉलर’ म्हणजेच पांढरपेशा मंडळींच्या दबावाला राज्य सरकार बळी पडले. शेतकऱ्यांच्या आनंदावर, त्याच्या मनोरंजनावरच बंदी आली. मग गावोगावच्या यात्रा ओस पडू लागल्या. यात्रेमुळे पोट भरणारे वाजंत्रीवाले, छोटे-मोठे व्यावसायिक आणि जत्रेत सहभागी होणारे विक्रेते यांचा रोजगारच बुडाला. पण आम आदमीच्या सोबत आमचा हात आहे, अशा गप्पा ठोकणाऱ्यांनी त्यांच्याच पोटावर पाय आणला होता.

पांढरपेशा समाजाचा हा हल्ला परतवून लावण्यासाठी आम्ही लढा उभारला. नाही, ही बंदी आम्ही खपवून घेणार नाही. आपण सर्वांनी एकत्र येऊन ही लढाई लढू, असे सर्वांनी ठरविले. कधी रास्ता रोको केला. झोपी गेलेल्या राज्य सरकारकडे बैलगाडा मालकांचे गाऱ्हाणे मांडले. त्यांना खडबडून जागे करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला. बैलगाडा मालक आणि शिवसेना पक्षाच्या वतीने मी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.  बैलगाडा मालक रामकृष्ण टाकळकर होते, आबा शेवाळे होते, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर इथले बैलगाडा मालक होते. आम्ही सर्वांनी एकत्र येऊन बैलगाडा मालकांची बाजू सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली.

आम्ही आमच्या पोरांपेक्षा अधिक प्रेम हे गायीबैलांवर करतो, हे सर्वोच्च न्यायलयाच्या न्यायाधीशांनी पटवून दिलं. शेवटी त्यांनाही आमचे म्हणणे पटले आणि सर्वोच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारी २०१३ रोजी बैलगाडा शर्यतींवरील बंदी मागे घेतली. शेतकरी बैलांची खूप काळजी घेतात आणि त्यांचे हाल करीत नाही, हे न्यायमूर्तींना पटले. आमच्या लढ्याला निर्भेळ यश आल्यामुळं मला वैयक्तिकपणे खूप आनंद झाला. माझ्या बळीराजासाठी मी काही करु शकलो, अशी भावना खूप सुखावह होती. अखेर सर्वोच्च न्यायालयानंच परवानगी दिल्यामुळं पुन्हा एकदा गावागावांमधून भिर्रर्रर्रर्रर्रर्र… चा आवाज घुमू लागला आणि बैलगाडा शर्यती भरू लागल्या.

(वृत्त आणि व्हिडिओ पाहाः http://bharat4india.com/mediaitem/1466-top-news)

माघी पौर्णिमेच्या निमित्तानं गावागावांना भेटी देत फिरत होतो. तेव्हाही बैलगाडा शर्यतींमुळं बळीराजाच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य पाहून माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. बैलगाडा शर्यतींमुळं गावांचं हरवलेलं गावपण पुन्हा एकदा मिळालं. गावात चैतन्य आलं. उत्साह आला. जल्लोष आला. सारे श्रेय बैलगाडा मालकांनी संघटितपणे उभारलेल्या लढ्याचे होते. मी फक्त निमित्त मात्र. त्यांच्यासोबत होतो इतकंच. पण आमच्या यशाचे श्रेय लाटण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण शेतकरी राजा सूज्ञ आहे. त्याला आपले कोण आणि परके कोण हे चांगल्या पद्धतीनं समजतं. त्यामुळंच अशा श्रेय लाटणाऱ्यांबद्दल शब्द वाया न घालविलेलेच बरे.

मुळात मला अनेकदा वाटतं, की ही पांढरपेशी मंडळी फक्त बैलगाडा शर्यतींनाच का टार्गेट करतात. म्हणजे बैलगाडा शर्यती या देशभरात भरविल्या जातात. किला रायपूरच्या ग्रामीण ऑलिंपिकमध्ये बैलगाडा शर्यतींचे आयोजन होते. तमिळनाडूत पोंगलच्या सणानिमित्त ‘जालिकट्टू’चे आयोजन होत असते. कर्नाटकातही बैलगाडा शर्यतींची लोकप्रियता प्रचंड आहे. इतकेच काय तर आपला शेजारी असलेल्या बांग्लादेशामध्येही बैलगाडा शर्यतींना तुफान प्रतिसाद मिळतो. इतक्या सर्वदूर जर बैलगाडा शर्यतींना प्रतिसाद मिळत असेल तर या पांढरपेशा मंडळींच्या डोळ्यात का खुपते देव जाणे.

एकीकडे बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्याची मागणी ही मंडळी करतात. पण दुसरीकडे अश्वशर्यतींवर हीच मंडळी पैसै लावतात. घोड्यांच्या शर्यतींमुळे त्यांचे हाल होत नाहीत का. पोलोसारखा किंवा इक्वेस्ट्रियन या खेळांमध्ये घोड्यांचा वापर केला जातो. त्या खेळांवर बंदी आणावी, म्हणून कोणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. मग सामान्य शेतकऱ्याला आनंद मिळवून देणाऱ्या बैलगाडा शर्यतीच टार्गेट का.

त्यांना कोणी वाली नाही, अशी तुमची समजूत असेल तर तुम्ही गैरसमजुतीत आहात. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाजूने मी कायमच उभा होतो, आहे आणि राहीन. मग ते बैलगाडा शर्यतींचे आंदोलन असो किंवा शेतकऱ्यांना भेडसावणारी कोणतीही समस्या असो. शिवाजीराव आढळराव पाटील कायम त्यांच्या सोबत असेल. फक्त पाठिशी थांबणार नाही. तर त्यांच्यासोबत रस्त्यावरही उतरेन.

येळकोट येळकोट… जय मल्हार…

5 thoughts on “भिर्रर्रर्र ऽऽऽ उचल की टाक…

  1. second दादा खूपच छान ,,,,सेकंद १० १० …
    किशोर डुंबरे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s