










मतदार भगिनी-बंधूंनो, नमस्कार…
आपणांस लक्ष लक्ष प्रणाम आणि कोटी कोटी धन्यवाद…
मतदारराजानं दाखविलेल्या दृढ विश्वासामुळं सलग तिसऱ्यांदा विजयाची माळ माझ्या गळ्यात पडली आहे. विजयी म्हणून नाव माझे असले, तरीही हा विजय तुमचा आहे. शिरूरमधील मतदारांचा आहे. माझ्या लाडक्या आणि मेहनती शिवसैनिकांचा आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आहे. हा विजय तुमचा माझा सगळ्यांचा आहे. तेव्हा आपल्या या दमदार आणि दणकेबाज विजयाबद्दल तुम्हालाही मनःपूर्वक शुभेच्छा… फेसबुक, ट्वीटर आणि वृत्तपत्रांमधून सर्वांचे आभार यापूर्वीच मानले होते. विजयोत्सवाचा जल्लोष आणि इतर गडबडींमधून थोडा वेळ मिळाल्यानंतर मग ब्लॉग लिहिवा, असा विचार केला आणि आज लिहायला घेतलं.
यंदाच्या निवडणुकीत धनुष्यबाणाला जवळपास साडेसहा लाख मतं मिळाली. गेल्या वेळी मला चार लाख ८२ हजार म्हणजे जवळपास पाच लाखांच्या आसपास मतं मिळाली होती आणि तुमचा दादा एक लाख ७९ हजार मतांनी निवडून आला होता. मात्र, यंदा आपण माझ्यावर व्यक्त केलेल्या प्रेमामुळं माझ्या मतांचा आकडा साडेसहा लाखांपर्यंत पोहोचला आणि जवळपास तीन लाख दोन हजार मतांच्या फरकानं आपला विजय साकारला. शिवसेनेच्या उमेदवारांपैकी सर्वाधिक मताधिक्यानं जिंकलेला उमेदवार शिरूरचा ठरला आहे. केवळ आणि केवळ आपल्यामुळेच हे शक्य झालंय.
आपण माझ्यावर जो विश्वास दाखविला त्याबद्दल माझे आपल्याला कोटी कोटी प्रणाम. फक्त धन्यवाद व्यक्त करून ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपल्या ऋणात राहूनच मतदारसंघाचा अधिकाधिक विकास करण्यासाठी कार्यरत राहीन, इतकेच आश्वासन आपल्याला मी या निमित्तानं देतो. आता केंद्रात आपले सरकार आहे. लवकरच राज्यातही महायुतीचेच सरकार येणार आहे. त्यामुळं शिरूर मतदारसंघाचा ‘सुपरफास्ट विकास’ होईल, हा माझा तुम्हाला शब्द आहे.
दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनचा विजय साकारणाऱ्या विस्टन चर्चिल यांच्या एका उद्गाराची मला आठवण झाल्यावाचून राहत नाही. ‘कोणत्याही परिस्थितीत विजय. कोणत्याही दहशतीची पर्वा न करता, लढा कितीही प्रदीर्घ असला तरीही आणि मार्ग कितीही खडतर असला तरीही विजय हवाच. कारण एकच विजयाशिवाय तरणोपाय नाही…’ आपल्या विजयाच्या बाबतीत चर्चिलचे हे उद्गार अत्यंत समर्पक आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आमदार, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी ठोकलेला तळ, साम दाम दंड आणि भेद अशा सर्व प्रकारांचा वापर करून विरोधकांनी लढविलेली निवडणूक, पोलिस आणि प्रशासनाच्या जोरावर गळचेपी करण्याचा केलेला प्रयत्न आणि बदनामी तसेच गैरलागू मुद्दे उपस्थित करून प्रचार भरकटविण्याचे षडयंत्र… राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जमेल ते करून पाहिले. मात्र, मतदारराजा कशालाही भुलला नाही. भरकटला नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचा ठाम निर्धार त्याने केला होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर त्याने पुन्हा एकदा सार्थ विश्वास व्यक्त केला.
तुमच्या लाडक्या दादाला सर्वच्या सर्व सहाही विधानसभा मतदारसंघांत घसघशीत आघाडी दिली आहे. विजयाचे मताधिक्य आणि सर्व विधानसभांमध्ये महायुतीला मिळालेली आघाडी पाहून राष्ट्रवादीच्या आमदारांचे धाबे दणाणले आहे. विधानसभेला अशीच परिस्थिती राहिली, तर आपले डिपॉझिट गुल होते, की काय अशा चिंतेत राष्ट्रवादीचे धुरीण चिंतन बैठका करीत आहेत. चालू दे त्यांचं…
फक्त शिरूरमध्येच नाही, तर पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रासह देशभरात भगव्या लाटेचे साम्राज्य पसरले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला मतदारांनी पसंती दर्शविली आहे. त्यांच्या गुजरात मॉडेलचे भरभरून समर्थन केले आहे. नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासियांना प्रचंड अपेक्षा आहेत. ते परिस्थिती सुधारू शकतील, असा विश्वास आहे.
विजयाची हॅट्ट्रिक आणि नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भव्यदिव्य विजयामुळे झालेल्या आनंदाचा कळसाध्याय म्हणजे संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मंगळवारी (वीस मे रोजी) पार पडलेला हृद्य सोहळा. संसदेमध्ये पहिलं पाऊल ठेवण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी टेकविलेला माथा, ‘भाजपा ही माझी आई आहे,’ हे सांगताना त्यांचा दाटून आलेला कंठ आणि हृदयाला हात घालणाऱ्या भाषणामुळं भाजपच्या अनेक नेत्या-कार्यकर्त्यांच्या डोळ्यात तरळलेले अश्रू… सर्व काही कल्पनेच्या पलिकडचे. सगळा कसा ‘अनुपम रम्य सोहळा’च जसा.
शिवसेनेसाठीही तो दिवस खूप संस्मरणीय होता. भावपूर्ण होता. आनंददायी होता. संसद आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकाविण्याचं स्वप्न हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलं होतं. संसदेवर भगवा फडकला आहे. बाळासाहेबांचे पहिलं स्वप्न साकार झालंय. आता त्यांचं आणखी एक स्वप्न पूर्ण करण्याची कामगिरी आपल्याला पार पाडायची आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेवर पुन्हा एकदा भगवा फडकावून महायुतीचे सरकार सत्तेवर आणायचं आहे. मला खात्री आहे, की उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली हा संकल्पही आपण निश्चितपणे सिद्धीस नेऊ.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सहकारी पक्षांनाही त्या दिवशी आवर्जून बोलविण्यात आलं होतं. जवळपास २९ पक्षांचे प्रतिनिधी तेव्हा उपस्थित होते. सरकार स्थापनेसाठीचा दावा करण्यासाठी नरेंद्रभाईंनी राष्ट्रपतींची भेट घेतली. ‘एनडीए’च्या घटक पक्षाच्या नेत्यांनाही बरोबर नेण्याची वेगळी प्रथा नरेंद्रभाईंनी यावेळी सुरू केली. आम्हाला त्याचं विशेष कौतुक आहे. भाजपच्या संसदीय नेतेपदी मोदींची निवड झाली. नंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांनीही नरेंद्रभाईंच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब केलं. भाजपनेही सर्व मित्रपक्षांना आश्वस्त केलं, की जरी भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता येणार असली तरीही मित्रपक्षांचा योग्य तो सन्मान राखला जाईलच. कधी खेळीमेळीच्या, कधी हास्यविनोदांच्या तर कधी भावपूर्ण वातावरणात बैठक पार पडली.
शिवसेना हा भारतीय जनता पक्षाचा सर्वाधिक जुना मित्रपक्ष आहे. यंदा तर शिवसेना हा १८ खासदारांसह सर्वाधिक मोठा मित्रपक्षही ठरला आहे. शिवसेनेचा वाघ देशातील सहाव्या क्रमांकावर राहिला आहे. शिवसेना कार्यप्रमुख मा. श्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या कठोर मेहनतीचे आणि परिश्रमांचेच हे फळ आहे, असं मी मानतो. स्वतः उद्धवसाहेब, सौ. रश्मी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे यावेळी आवर्जून उपस्थित होते.
सेंट्रल हॉलमध्ये उद्धवसाहेबांनी मोजकंच पण मार्मिकपणे केलेलं भाषणही मला भावलं. हा सोहळा पाहताना, अनुभवताना माझाही ऊर अभिमानानं भरून आला. ‘आजच्या दिवशी मला बाळासाहेबांची राहून राहून आठवण येते,’ असं उद्धवसाहेबांनी सांगितलं. खरं तर शिवसेनेच्या प्रत्येक खासदाराच्या आणि शिवसैनिकाच्या मनातली भावनाच उद्धवसाहेबांनी बोलून दाखविली होती. इतक्या आनंदाच्या आणि जल्लोषाच्या प्रसंगी बाळासाहेबांची आठवण आली नाही, तर तो शिवसैनिक कसला. सगळा सोहळा कसा भावोत्कट बनला होता. आयुष्यात पुन्हा कधीही अनुभवता येणार नाही, अशा सोहळ्याचं साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं, हे मी माझं भाग्य समजतो.
आता उत्सुकता आहे नरेंद्र मोदींच्या राज्याभिषेक सोहळ्याची… आपण या आणि अशा अनेक संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार…
जयहिंद… जय महाराष्ट्र…
एखाद्या कॉर्पोरेट कंपनीला लाजवेल, असं प्रोफेशनल व्यवस्थापन पण तरीही अत्यंत आस्थेनं आणि जिव्हाळ्यानं विचारपूस करण्याची वृत्ती, प्रचंड व्यापात असूनही ज्या व्यक्तीला भेटायचंय, त्याबद्दलची बारकाईनं मिळविलेली माहिती आणि समोरच्या व्यक्तीची काय मतं आहेत, हे कायम जाणून घेण्याची उत्सुकता… हे वर्णन आहे, पहिल्याच भेटीत समोरच्याला जिंकून घेण्याची क्षमता असलेले गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं. त्यांच्या केवळ वागण्या-बोलण्यातच नाही, तर व्यक्तिमत्त्वात आणि कार्यशैलीतही जादू आहे, हे मला अगदी प्रकर्षानं जाणवलं.
भारतीय जनता पक्षाने त्यांना पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार जाहीर केल्यापासून मला मोदी यांची भेट घेण्याची इच्छा होती. वाणी, विचार, व्हिजन आणि व्यक्तिमत्व अशा सर्वच गोष्टींमुळे सारा देश त्यांच्याकडे आकृष्ट होतो आहे. अशा व्यक्तिमत्त्वाला आपणही भेटावं, असं खूप दिवसांपासून मनात होतं. मध्यंतरी भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील उपनेते श्री. गोपीनाथ मुंडे आणि राज्यसभेतील खासदार प्रकाश जावडेकर यांना मोदी यांची भेट घेण्याची इच्छा असल्याचं सांगितलं होतं. मला नरेंद्र मोदींना भेटण्याची इच्छा असल्याचा निरोप त्यांनी संबंधित कार्यालयाकडे दिला होता. पण तेव्हा तो विषय तेवढ्यावरच थांबला.
मग अचानक एकदिवशी मला नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातून फोन आला. दिवस होता वीस जानेवारी. मला दोन दिवसांनी म्हणजे २२ जानेवारी रोजी मोदी यांनी भेटीसाठी वेळ दिल्याचा निरोप सांगण्यासाठी तो फोन होता. खरं तर मोदींची भेट मिळणार ही माझ्यासाठी नव्या वर्षाची विशेष ‘भेट’च होती. बावीस जानेवारीला दुपारी साडेबारा वाजता मोदी यांच्या गांधीनगर येथील कार्यालयात मोदींना मी भेटणार होतो. भेटीच्या आदल्या दिवशी म्हणजे २१ जानेवारी रोजी मला मोदी यांच्या ‘ओएसडी’चा (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) फोन आला. तुम्ही उद्या भेटायला येणार आहात का, हे विचारायला. माझा होकार आहे, हे कळल्यानंतर त्यांनी सांगितलं, की पंधरा मिनिटं आधीच या. शिवाय तुमची राहण्याची किंवा गाडीचा व्यवस्था करायची आहे का, असंही विचारलं. अर्थात, गांधीनगरमध्ये माझ्या कंपनीचं ऑफिस आणि राहण्याची व्यवस्था असल्यानं मी त्याला नम्रपणे नकार दिला.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी बरोब्बर सव्वाबारा वाजता मोदी यांच्या कार्यालयात पोहोचलो. मंत्रालय कॉम्प्लेक्सपासून त्यांच्या ऑफिसपर्यंत मला विशेष ‘एस्कॉर्ट’ पुरविण्यात आला होता. ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर चहा, पाणी वगैरे झालं. त्यांचे ‘ओएसडी’, सेक्रेटरी आणि पीए अशा सर्वांशी माझी ओळख करुन देण्यात आली. थोडं ब्रिफिंग झालं. काय पाहिजे वगैरेची विचारपूस केली. बरोब्बर साडेबारा वाजता त्यांनी बेल वाजवून मला आत पाठविण्याचा निरोप धाडला.
गंमत पहा, भारताचा भावी पंतप्रधान असलेला माणूस पण त्याचं नियोजन इतकं पक्क होतं की विचारता सोय नाही. वेळापत्रक प्रचंड व्यस्त असलेला माणूस असूनही त्यांनी साडेबाराची वेळ खास माझ्यासाठी राखून ठेवली होती. त्या ऑफिसमध्ये तेव्हा फक्त मी एकटाच होतो. नाहीतर इतर मंत्री, मुख्यमंत्री यांनी भेटायला वेळ दिली, की शेकडो कार्यकर्ते तिथं असतात. कुठलेकुठले अधिकारी असतात, कामं घेऊन आलेले लोक असतात, सचिव आणि इतर मंडळी असतात. मंत्री, मुख्यमंत्री ऑफिसमधून बाहेर आला, की सगळेच त्याला भेटायला तुटून पडतात. त्या सगळ्यांच्या गराड्यातच मंत्री किंवा मुख्यमंत्री तुम्हाला भेटतात आणि घाई गडबडीत भेट उरकून निघून जातात. ना त्यांना नीट काही समजतं, ना आपलं समाधान होतं.
मोदी भेटीबाबतीतही तसंच होईल का, अशी चिंता मला सतावत होती. पण मी निश्चितपणे येणार आहे, म्हटल्यानंतर मोदींनी ती वेळ खास माझ्यासाठीच राखून ठेवली होती. त्यावेळी दुसऱ्या कोणालाही त्यांनी भेटायला बोलविलं नव्हतं. फक्त मी आणि तेच. त्यांचा हा वक्तशीरपणा आणि प्रोफेशनलिझम मला प्रचंड आवडला. ऑफिसमधील प्रत्येकाच्या बॉली लँग्वेजमध्ये प्रोफेशनलपणा ठासून भरल्याचं जाणवत होतं. प्रोफेशनलपणा असला तरीही कोरडेपणा नव्हता. त्याचंही कौतुक वाटलं.
आता गेल्यानंतर माझं मराठीमधून त्यांनी स्वागत केलं. म्हणाले, ‘या… या… शिवाजीराव या. कसे आहात. काय चाललंय.’ पुण्याचं राजकारण काय म्हणतंय, पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीला दणका बसेल का, महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे, शिरूर लोकसभा मतदारासंघातील राजकारण कसंय… अशा विविध विषयांवर चर्चा होत गेली. गेल्यावेळी शिरूरमधून शरद पवार तुमच्या विरोधात उभे राहणार होते. पण त्यांनी रिस्क न घेता माढ्याकडे मोर्चा वळविला. यंदा तुमच्याविरोधात कोण आहे, गेल्या वेळी पावणेदोन लाखांचं लीड घेऊन तुम्ही जिंकून आला होता, यंदा किती लीड असणार वगैरे सर्व गोष्टींची माहिती त्यांच्याकडे होती. त्याबद्दल अधिक माहिती ते माझ्याकडून जाणून घेत होते.
मग आमच्यासाठी चहा आला. आम्ही दोघांनी मस्त चहा घेतला. देशात सर्वाधिक औद्योगिकीकरण असलेला मतदारसंघ शिरूर आहे, हे त्यांना माहिती होतं. औद्योगिक आघाडीवर महाराष्ट्रात सध्या काय परिस्थिती आहे, मतदारसंघातील औद्योगिक क्षेत्राच्या अडचणी काय आहेत, यावर आमची चर्चा झाली. त्यासाठी तुमच्या डोक्यात काय उपाययोजना आहेत, अशी मला विचारणाही केली. शिरूर मतदारसंघात अनेक धरणं बांधली गेली आहेत. पण धरणग्रस्तांचा प्रश्न प्रलंबित आहे. त्या समस्या सोडविण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू आणि मार्ग काढू, असं सांगितलं. शिरूर मतदारसंघात दोन ते तीन लाख आदिवासी नागरिक आहेत. त्यांच्यासाठीही आपण काही ना काही विशेष योजना राबवू. तुम्हीही तुमच्या कल्पना मला सांगा. त्यांचाही अंतर्भाव आपण त्यामध्ये करू, असं आवर्जून सांगितलं.
मला माझ्या कार्य अहवालासाठी मोदी यांचं शुभेच्छापत्र हवं होतं. तेही त्यांनी मला त्याच दिवशी तातडीनं मिळेल, अशी व्यवस्था केली. पीएला ते तयार करण्यास सांगितलं. दुपारी जेवायला घरी या आणि तेव्हाच शुभेच्छापत्र घेऊन जा, असं आग्रहाचं निमंत्रणही दिलं. त्या निमित्तानं घर पाहणं होईल, असंही म्हणाले. मी म्हटलं, जेवण नको. मी ऑफिसला जाऊन येतो फक्त शुभेच्छापत्र न्यायला. तसं पहायला गेलं तर मोदी आणि माझी भेट फक्त दहा मिनिटांसाठी ठरली होती. पण आम्ही जवळपास अर्धातास गप्पा मारत होतो. शुभेच्छापत्र घेण्यासाठी मग मी संध्याकाळी त्यांच्या घरी गेलो. तेव्हाही तिथं पंधरा-वीस मिनिटं आमची ‘टी विथ नरेंद्र मोदी’ अशी खास छोटेखानी मैफल जमली. वाफाळता चहा घेताघेता पुन्हा गप्पा रंगल्या.
शिरूर मतदारसंघात सभा घेण्यासंदर्भातही आमची चर्चा झाली. ‘तुम्ही आतापर्यंत मुंबई-पुण्यातच जाहीर सभा घेतल्या आहेत. आमच्या मतदारसंघात ग्रामीण भागातील नागरिकांशी संवाद साधायला या तुम्ही. तुम्हाला ऐकण्याची, पाहण्याची खूप उत्सुकता आहे,’ असं आग्रहाचं निमंत्रण मी त्यांना दिलं. त्यांनी देखील पीएला बोलवून तातडीनं त्याची नोंद डायरीत करायला सांगितली. इतर नेत्यांशी चर्चा करून मी नक्की तुमच्या मतदारसंघात सभा घेतो, असं आश्वासन मला दिलं.
मी पहिल्यांदा प्रोफेशनल राजकारणी माणसाला भेटतो आहे, असं मला वाटलं. अनेक मंत्री नि मुख्यमंत्र्यांना भेटलोय. पण असा अनुभव कुठेच आला नव्हता. असा अत्यंत प्रोफेशनल, वक्तशीर आणि बारीकसारीक माहिती जाणून असलेला माणूस जर देशाचा पंतप्रधान झाला, तर देशात नक्कीच खूप चांगले बदल होतील, असा विश्वास मला मोदी यांना भेटून वाटला. शिवाय मोदी यांना भेटल्यानंतर प्रत्येक जण का भारावून जातो, याचं उत्तरही मला मोदी यांच्या भेटीमुळं मिळालं.
नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी हार्दिक शुभेच्छा…
ब्लॉग या नव्या माध्यमाच्या विश्वात पहिलं पाऊल टाकताना आपल्या परंपरेचा आणि संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या बैलगाडा शर्यतीच्या विषयाशिवाय आणखी कोणता विषय समर्पक असू शकतो, असं आपलं मला सहज वाटलं. आम्हाला नव्याच्यी कास धरायची आहे. अगदी जरुर धरायची आहे. मात्र, हे करताना आम्ही आमची संस्कृती आणि प्रथापरंपरांना फाटा देऊ शकत नाही, हेच माझं म्हणणं आहे. त्यामुळंच माझा पहिला ब्लॉग हा माझ्या लाडक्या सर्जा-राजासाठी…
बरोब्बर एक वर्ष पूर्ण झालं बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठून आणि पुन्हा सुरू होऊन. राज्य सरकारनं ऑगस्ट २०११ मध्ये सर्क्युलर काढून बैलगाडा शर्यतींवरील बंदी म्हणजे कोणताही सारासार विचार न करता घेतलेला मोगलाई निर्णय होता. नंतर हायकोर्टातही ही बंदी काय राहिली. मात्र, उत्साही गावकऱ्यांनी बैलगाडा शर्यती आयोजित करण्याचे सुरूच ठेवले. त्यामुळे गावागावांमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास प्रारंभ केला. सर्वसामान्य शेतकरी त्यामुळं नाडला गेला. शेतकऱ्यांचे तारणहार आम्हीच आहोत, अशा पद्धतीनं भाषणे ठोकायची. मात्र, त्याच शेतकऱ्याला कसा त्रास होईल, यासाठी सर्क्युलर काढायचे. व्वा.. रे काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार.
काय झालं या बंदीमुळं. शेतकऱ्याचा आनंद हिरावून घेण्याचे पाप काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या माथी लागले. मुळात अशी बंदी घालण्याची काही आवश्यकताच नव्हती. कारण कोणत्याही शेतकऱ्याचं उदाहरण घ्या, तो स्वतःपेक्षा त्याच्याकडील पशुधन अधिक प्रेमाने जपतो. त्यांची स्वतःच्या जिवापेक्षा अधिक काळजी घेतो. वेळप्रसंगी तो स्वतः उपाशी राहिल, पण आपल्या गायी-बैलांना चारा दिल्याशिवाय त्याला चैन पडणार नाही. पोटच्या पोरासारखा तो जनावरांना जपत असतो. त्यामुळं बैलगाडा शर्यतींमुळं बैल जोड्यांवर अन्याय, अत्याचार होईल, ही धारणाच चुकीची आहे.
पण ‘व्हाइटकॉलर’ म्हणजेच पांढरपेशा मंडळींच्या दबावाला राज्य सरकार बळी पडले. शेतकऱ्यांच्या आनंदावर, त्याच्या मनोरंजनावरच बंदी आली. मग गावोगावच्या यात्रा ओस पडू लागल्या. यात्रेमुळे पोट भरणारे वाजंत्रीवाले, छोटे-मोठे व्यावसायिक आणि जत्रेत सहभागी होणारे विक्रेते यांचा रोजगारच बुडाला. पण आम आदमीच्या सोबत आमचा हात आहे, अशा गप्पा ठोकणाऱ्यांनी त्यांच्याच पोटावर पाय आणला होता.
पांढरपेशा समाजाचा हा हल्ला परतवून लावण्यासाठी आम्ही लढा उभारला. नाही, ही बंदी आम्ही खपवून घेणार नाही. आपण सर्वांनी एकत्र येऊन ही लढाई लढू, असे सर्वांनी ठरविले. कधी रास्ता रोको केला. झोपी गेलेल्या राज्य सरकारकडे बैलगाडा मालकांचे गाऱ्हाणे मांडले. त्यांना खडबडून जागे करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला. बैलगाडा मालक आणि शिवसेना पक्षाच्या वतीने मी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. बैलगाडा मालक रामकृष्ण टाकळकर होते, आबा शेवाळे होते, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर इथले बैलगाडा मालक होते. आम्ही सर्वांनी एकत्र येऊन बैलगाडा मालकांची बाजू सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली.
आम्ही आमच्या पोरांपेक्षा अधिक प्रेम हे गायीबैलांवर करतो, हे सर्वोच्च न्यायलयाच्या न्यायाधीशांनी पटवून दिलं. शेवटी त्यांनाही आमचे म्हणणे पटले आणि सर्वोच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारी २०१३ रोजी बैलगाडा शर्यतींवरील बंदी मागे घेतली. शेतकरी बैलांची खूप काळजी घेतात आणि त्यांचे हाल करीत नाही, हे न्यायमूर्तींना पटले. आमच्या लढ्याला निर्भेळ यश आल्यामुळं मला वैयक्तिकपणे खूप आनंद झाला. माझ्या बळीराजासाठी मी काही करु शकलो, अशी भावना खूप सुखावह होती. अखेर सर्वोच्च न्यायालयानंच परवानगी दिल्यामुळं पुन्हा एकदा गावागावांमधून भिर्रर्रर्रर्रर्रर्र… चा आवाज घुमू लागला आणि बैलगाडा शर्यती भरू लागल्या.
(वृत्त आणि व्हिडिओ पाहाः http://bharat4india.com/mediaitem/1466-top-news)
माघी पौर्णिमेच्या निमित्तानं गावागावांना भेटी देत फिरत होतो. तेव्हाही बैलगाडा शर्यतींमुळं बळीराजाच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य पाहून माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. बैलगाडा शर्यतींमुळं गावांचं हरवलेलं गावपण पुन्हा एकदा मिळालं. गावात चैतन्य आलं. उत्साह आला. जल्लोष आला. सारे श्रेय बैलगाडा मालकांनी संघटितपणे उभारलेल्या लढ्याचे होते. मी फक्त निमित्त मात्र. त्यांच्यासोबत होतो इतकंच. पण आमच्या यशाचे श्रेय लाटण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण शेतकरी राजा सूज्ञ आहे. त्याला आपले कोण आणि परके कोण हे चांगल्या पद्धतीनं समजतं. त्यामुळंच अशा श्रेय लाटणाऱ्यांबद्दल शब्द वाया न घालविलेलेच बरे.
मुळात मला अनेकदा वाटतं, की ही पांढरपेशी मंडळी फक्त बैलगाडा शर्यतींनाच का टार्गेट करतात. म्हणजे बैलगाडा शर्यती या देशभरात भरविल्या जातात. किला रायपूरच्या ग्रामीण ऑलिंपिकमध्ये बैलगाडा शर्यतींचे आयोजन होते. तमिळनाडूत पोंगलच्या सणानिमित्त ‘जालिकट्टू’चे आयोजन होत असते. कर्नाटकातही बैलगाडा शर्यतींची लोकप्रियता प्रचंड आहे. इतकेच काय तर आपला शेजारी असलेल्या बांग्लादेशामध्येही बैलगाडा शर्यतींना तुफान प्रतिसाद मिळतो. इतक्या सर्वदूर जर बैलगाडा शर्यतींना प्रतिसाद मिळत असेल तर या पांढरपेशा मंडळींच्या डोळ्यात का खुपते देव जाणे.
एकीकडे बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्याची मागणी ही मंडळी करतात. पण दुसरीकडे अश्वशर्यतींवर हीच मंडळी पैसै लावतात. घोड्यांच्या शर्यतींमुळे त्यांचे हाल होत नाहीत का. पोलोसारखा किंवा इक्वेस्ट्रियन या खेळांमध्ये घोड्यांचा वापर केला जातो. त्या खेळांवर बंदी आणावी, म्हणून कोणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. मग सामान्य शेतकऱ्याला आनंद मिळवून देणाऱ्या बैलगाडा शर्यतीच टार्गेट का.
त्यांना कोणी वाली नाही, अशी तुमची समजूत असेल तर तुम्ही गैरसमजुतीत आहात. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाजूने मी कायमच उभा होतो, आहे आणि राहीन. मग ते बैलगाडा शर्यतींचे आंदोलन असो किंवा शेतकऱ्यांना भेडसावणारी कोणतीही समस्या असो. शिवाजीराव आढळराव पाटील कायम त्यांच्या सोबत असेल. फक्त पाठिशी थांबणार नाही. तर त्यांच्यासोबत रस्त्यावरही उतरेन.
येळकोट येळकोट… जय मल्हार…