अजित पवार तेव्हा कुठे होता तुम्ही?

मराठीमध्ये एक म्हण आहे, ‘आपण मारणाऱ्याचा हात पकडू शकतो. पण बोलणाऱ्याचं तोंड नाही पकडू शकत.’ आता एकदम मला या म्हणीची आठवण झाली. ‘खोटं बोल पण रेटून बोल’ अशा प्रवृत्तीच्या लोकांना काय बोलायचं तेच मला कळत नाही. अशाच प्रवृत्तीचे एक महाशय म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार. त्यांच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करण्यासाठीच मी हा ब्लॉग लिहितोय.

बरीच धापवळ आणि शोधाशोध केल्यानंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार सापडला आणि त्याची जाहीर घोषणा उपमुख्यमंत्री महाशयांनी केली. तेव्हा त्यांना अचानक बैलगाडा शर्यती आणि बैलगाडा मालक वगैरे गोष्टींची आठवण झाली. बैलगाडा शर्यती भविष्यात थांबवायच्या नसतील, तर बैलगाडा मालक असलेल्या  उमेदवारालाच निवडून द्या, अशी सूचनावजा दमच त्यांनी शेतकऱ्यांना भरला. अहो, अजित पवार जनाची नाही, पण मनाची तरी थोडी बाळगा… 

0021

नेमका निवडणुकीच्या तोंडावरच तुम्हाला शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा बैलगाडा शर्यतींचा विषय आठवतो का? मतांवर डोळा ठेवून किती घाणेरडं राजकारण कराल. बैलगाडा शर्यतींविरोधात २००५ पासून रण पेटले होते. कोर्टकचेऱ्या चालू होत्या, बंदी उठवण्यासाठी मागणी होत होती आणि अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिला जात होता, तेव्हा तुम्ही कुठे गायब झाला होतात. अहो, इतकंच काय, दोनवेळा तुमच्याच राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी सरकारने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. सरकारने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातलीच, शिवाय प्रत्यक्ष कायदेशीर मार्गांनी लढा देण्याची वेळ आली, तेव्हा सरकारने पळ देखील काढला.

दादा तुम्हाला आठवणार नाहीच. पण मला चांगलं आठवतंय. पहिल्यांदा २००५ मध्ये बंदी आली होती. तेव्हा तुम्ही कुठे दडून बसला होता आम्हाला माहिती नाही. बैलगाडा शर्यतबंदी विरोधात मंचरमध्ये आंदोलन झालं. आणि तुमच्या पोलिसांनी बैलगाडा मालकांना गुराढोरा सारख मारलं आणि माझ्यासह ५८ निरपराध शेतकऱ्यांवर कलम ३०७चे खटले दाखल केले. पण मी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन समर्थपणे लढा दिला होता आणि शेतकऱ्यांची बाजू मांडली होती. तुम्ही, तुमचे कार्यकर्ते, तुमचा पक्ष आणि तुमचे आताचे उमेदवार तेव्हा कुठे गायब झाला होता. तुमचे कार्यकर्ते फक्त कोर्टातील विजयाचा जल्लोष साजरा करताना पुढे पुढे मिरवित होते. अजित पवार हेच का तुमचे बैलगाडा शर्यतींचे प्रेम आणि जिव्हाळा.

1913388_775197562510164_984222003_o

जेव्हा २००५ मध्ये बैलगाडा शर्यतींवर बंदी आली होती, तेव्हा मंचरमध्ये दंगल उसळली होती. शेतकऱ्यांनी या अन्यायकारक बंदीविरोधात जाब विचारला होता. तेव्हा माझ्यासह ५८ जणांवर केसेस दाखल केल्या होत्या. जेव्हा कोर्टाने बैलगाडा शर्यतींच्या बाजूने निकाल दिला तेव्हा महाराष्ट्राचे तोंडपाटील गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी घोषणा केली, की सर्वच्या सर्व ५८ जणांच्या  विरोधातील खटले मागे घेतले जातील. नऊ वर्षे झाली आज त्या घटनेला. पण अजून एकाही शेतकऱ्याविरुद्धचा खटला मागे घेण्यात आलेला नाही. उलट आता सर्वांना पोलिस खात्याने अटक वॉरंट धाडले आहे. नेमके निवडणुकीच्या तोंडावर ही अटक वॉरंट धाडण्याचे कारण काय? तुम्ही शेतकऱ्यांना गर्भित इशारा देताय का, की राष्ट्रवादीला मतदान केले नाही, तर तुम्हाला तुरुंगात डांबू? मतांसाठी शेतकऱ्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा नवा व्यवसाय सुरू केलाय का राष्ट्रवादी काँग्रेसनं. खबरदार जर माझ्या शेतकऱ्याला हात लावाल तर.

अजित पवार तुम्हाला शिरूर लोकसभा मतदारसंघातील तसेच जुन्नर, आंबेगाव, खेड परिसरातील तुमच्याच पक्षाच्या काही शेतकरी आणि बैलगाडा मालकांनी घेतलेली ती भेट आठवतेय का बरं? तुम्हाला नाहीच आठवणार म्हणा. पण मला चांगली आठवतेय. त्यावेळी परिसरातील अनेक गावांमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, शेतकरी आणि बैलगाडा मालक तुमच्याकडे आले होते. ‘दादा, काहीतरी करा. बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठविण्यासाठी…’ अशी गळ घालत होते. पण तेव्हा तुम्ही त्यांची बाजू ऐकून घेतली नाहीच. पण त्यांना कोणतीही मदत न करता हाकलवून लावलं. शिवाय त्यांनाच चार खडे बोल सुनाविले. ‘शर्यतींचा नाद कसला करता. बैलगाडा शर्यती काही चांगल्या नाहीत. तुम्हाला हे नसते धंदे करायला कुणी सांगितले. चालते व्हा आणि पुन्हा असल्या मागण्या घेऊन माझ्याकडे यायचं नाही,’ असा दम भरून राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांना तुम्ही हुसकावून काढले होते. बघा जरा आठवतोय का तो प्रसंग…

अजित पवार तुमच्यासारखा दुटप्पी आणि दुतोंडी माणूस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शोधून सापडायचा नाही. आधी शेतकऱ्यांना आणि बैलगाडा मालकांना हाकलवून लावले. त्यांचा अपमान केला. त्यांना चालते व्हा म्हणालात. आणि आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा पुळका आलाय का तुम्हाला. ज्यांना तुम्ही ‘चालते व्हा’ म्हणालात ती मंडळी आणि ते बैलगाडा मालक, शेतकरी तुम्हाला ‘चालते व्हा’ म्हटल्याशिवाय राहणार नाहीत. मतदारराजा हा आंधळा, बहिरा आणि मुका नाही. तो हुशार आहे. त्याला माहितीये आपला कोण आणि परका कोण? वेळप्रसंगी मदतीला धावून येणारा कोण आणि निवडणुकीच्या तोंडावर फक्त गोडगोड बोलणारा कोण हे मतदाराला चांगलं ठावूक आहे. त्यामुळं तुम्ही बैलगाडा शर्यती आणि बैलगाडा मालकांबद्दलचं खोटं प्रेम व्यक्त करून मतांवर डोळा ठेवू नका. तुमच्या पदरी निराशाच येणार आहे.

6 thoughts on “अजित पवार तेव्हा कुठे होता तुम्ही?

Leave a comment