ही लढाई माझी आणि माझीच… लढणार आणि जिंकणारही मीच…

bullock-cart-759
जून सुरू झालाय आणि जुलै येवू घातलाय आणि याच काळात सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठीची निर्णायक सुनावणीही होतेय. मात्र बैलगाडा शर्यतींचा विषय आलाय आणि मी बोलण्याआधी राजकारणातील कुणी बोललेय असे कधीच संपूर्ण पुणे जिल्ह्यात आणि अर्थातच महाराष्ट्रातही झालेले नाही. पर्यायाने एकीकडे जून-जुलैमधल्या पावसाळ्यातील ’कुत्र्यांच्या-छत्र्या’ उगवायला सुरुवात होईल आणि त्याच पध्दतीने याच काळात मी बोललोय म्हटल्यावर अनेक नाटकी बैलगाडाप्रेमी नेते-कार्यकर्ते मंडळीही बोलू लागतील हे माझ्यासाठी नेहमीचे चित्र.
खरं तर मी सन २००२ पासून बैलगाडा शर्यतींसाठी लढा देतोय. त्यामुळे बैल, बैलगाडा आणि बैलगाडा-शर्यती हा विषय नेहमीच माझ्यासाठी जणू श्वासच झालाय. अनेकांना असंच वाटतं आलंय की, मी बैलगाडा शर्यतींचा मुद्दा लावून धरलाय म्हणूनच खासदार झालोय आणि मग तेही असंच काहीसं करु लागतात. वास्तविक बैलगाडा मालकांच्या पाठीशी मी कित्येक वर्षे कायमच ठामपणे उभा राहिल्याने बैलगाडा शर्यतींचा विषय जिवंत राहिलाय. अन्यथा राजकरणातील काही तथाकथित नेते मंडळींनी बैलगाडा शर्यतींचा विषय कधीच ‘निकालात’ काढला असता. येत्या महिनाभरात सर्वोच्च न्यायलायात पाच न्यायमुर्तींच्या पूर्ण खंडपीठासमोर (फुल बेंच) निर्णायक सुनावणी होतेय. यात तामिळनाडूतील जलिकट्टू, कर्नाटकातील कंबाळा आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती असे सगळेच एकत्रित प्रश्न या खंडपिठापुढे सुनावणीसाठी येणार आहेत. अर्थात याच अनुषंगाने बैलगाडा शर्यती आणि त्या चालू-बंद होण्याच्या इतिहासात डोकवावं आणि आजच्या पिढीला हा इतिहास अवगत व्हावा म्हणून हे वास्तव मांडतोय.
Bailgada dabhade dada copy
महाराष्ट्रात बैलगाडा विमा संघटना काढणारा पहिला खासदार मीच
बैलगाडा शर्यती हे महाराष्ट्राचं आणि त्यातल्या त्यात माझ्या शिरुर लोकसभा मतदार संघाचं एक सोहळ्याचं रुप. याच सोहळ्याला आपल्यातीलच काही नतद्र्ष्टांची नजर लागली ती सन २००४-०५ च्या दरम्यान. खरं तर सन २००३-०४ चा काळ आठवा. त्याकाळी बैलगाडा शर्यतींबाबत कोण गंभीर होतं तर कुणीच नाही. माजी खासदार दिवंगत किसनराव बाणखेले यांना बैलगाडा शर्यतींमध्ये रस होता. त्यांच्यानंतर या विषयात स्वारस्य दाखवून माझा ’अजेंडा’ समजून मी काम केले. बैलगाडा शर्यतींबरोबरच बैलगाडा मालक आणि शौकिनांच्या प्रत्येक प्रश्नावरही मी काम केले आणि या प्रश्नी सातत्यही  ठेवले. खरं तर बैलगाडा शर्यतीत बैलांच्या पायाला इजा, पाय मोडणे, शिंग मोडणे, बैल कायमचाच निकामी होणे असे प्रकार मी अनेक स्पर्धांमध्ये पाहिल्यावर महाराष्ट्रात पहिल्यांदा ‘बैलगाडा विमा संघटना’ मी काढली. बैलगाडा मालकांकडून आम्ही फक्त शंभर रुपये ते पाचशे रुपये जमा करायचो आणि बैलाच्या इजा उपचाराबरोबरच बैल निकामी झाल्यास त्याच्या मालकाला ४० ते ५० हजार रुपये आम्ही द्यायचो. यासाठी खूप वेळा मी खिशातूनच हे पैसे भरले हे सांगायला मला आजही अभिमान वाटतोय. अर्थात अशा काही अफलातून कल्पनांमुळे बैलगाडा शर्यतींची लोकप्रियता अगदी जगात प्रसिध्द झालेल्या ‘पुणे-फेस्टीवल’ पर्यंत पोहचली आणि त्याचे निमित्त आपली एक पिढी आहे याचा मला अभिमान वाटतो.
DSC_0158
IMG_20171220_164228
बैलगाडा शर्यतींच्या घाटाला खासदार निधी देणारा देशातील पहिला खासदारही मीच
सन २००४ मध्ये मी पहिल्यांदा खासदार झाल्यावर ’बैलगाडा घाटांसाठी खासदार निधी’ देणारा मी पहिला खासदार देशात ठरलोय. या निमित्ताने जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरुर-हवेली मतदार संघातील अनेक बैलगाडा घाटांच्या उभारणीत माझ्या योगाने होणा-या खासदार निधीचे योगदान संपूर्ण मतदार संघ विसरलेला नाही. अशाच पध्दतीने बैलगाडा शर्यती ज्या पुणे जिल्ह्यात कधीकाळी एकदम भन्नाट-सुसाट अशा सुरू होत्या त्याच वेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची अवकृपा झाली अन राज्यात पहिल्यांदा सन २००५ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ता काळात बैलगाडा शर्यती बंद पडल्या. याबाबत मी न्यायालयात गेलो अन शर्यती पुन्हा सन २००६ मध्ये सुरू झाल्या. पुढे पाच वर्षे या शर्यती २०११ पर्यंत अगदी निर्विघ्नपणे सुरू होत्या. मात्र सन २०११ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमधील तत्कालीन पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांनी एक अध्यादेश जारी करुन त्यात वाघ, सिंह, अस्वल, माकड आणि बैल यांचे प्रशिक्षण आणि प्रदर्शन यावर बंदी घातली आणि आपल्या बैलगाडा शर्यती बंद झाल्या.
अर्थात त्याच वेळी मी लगेच सर्वोच्च न्यायालयात पदरमोड करुन धाव घेतली आणि नामवंत वकिलांची फौज उभी केली. याचा परिणाम असा झाला की, संपूर्ण राज्यभरात फेब्रुवारी-२०१२ मध्ये बैलगाडा शर्यती पुन्हा जोमात सुरू झाल्या. मात्र आडकाठी आणणार नाही ते कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकार कसले हो..? मग पुन्हा एकदा तत्कालीन सरकारकडून आडकाठी आली आणि शर्यती बंद झाल्या. खरं तर बैल हा वरील रानटी प्राण्यांच्या गटात न मोडणारा आणि तुमच्या आमच्या घरातील एक कुटुंबसदस्य असणारा प्राणी. तर इतर प्राणी हे जंगली आहेत हे मी संसदेसह न्यायालयात सिध्द करण्यासाठी कायमच भांडत राहिलो. अर्थात केवळ बैलाला त्या जंगली प्राण्यांच्या यादीतून वगळले तरी आपल्या बैलगाडा शर्यती सुरू होणे शक्य आहे. मात्र संसद, सर्वोच्च न्यायालय आणि अगदी राजकीय व्यवस्था अशा सर्व स्तरावर आर्थिक ताकदीसह लढलो पण तोकडे यश आले आणि ७ मे २०१४ रोजी पुन्हा एकदा याच नियमाद्वारे बैलगाडा शर्यतींवर बंदी लादण्यात आली, तीच आजही कायम आहे.
Dada arrest
बैलगाडा शर्यतींवर सन २००५ पासून आंदोलने करुन गुन्हे दाखल होणारा एकमेव नेता मीच
बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात म्हणून सन २००५ पासूनच्या प्रत्येक वेळीच्या आंदोलनात मी पुढे होतो आणी आहेही. बैलगाडा मालक माझ्याच नेतृत्वाखाली संघटीत झालेत. बंदी उठावी यासाठी कायदेशीर लढाई उभाण्यात मीच पुढाकार घेतला आणि रस्त्यावरची आंदोलनेही केली. या आंदोलनांमध्ये बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी गुन्हा दाखल झालेला मी एकमेव नेता आहे हे सांगायला मला अभिमान वाटतो. बैलगाडा शर्यती हा जसा माझा ‘श्वास’ झाला तोच ‘श्वास’ अनेकांनाही आकर्षित करु लागला आणि बैलगाडा शर्यतीच्या विषयामुळेच आपण खासदार होवू शकतो असे उगाचच कुणालाही वाटू लागले. कायद्याची भाषा अवगत नाही, कायदा समजत नाही, कायदा पाळण्यासाठी आणि लढण्यासाठी असतो हे अनेकांच्या गावीही नाही. अशाच काही उत्साही मंडळींमुळे कायद्याचीच भाषा करणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच मुंबईत नरिमन पॉईंटवर केलेल्या एका बैलगाडा-स्टंटला सामोरे जावे लागण्याचा प्रसंग महाराष्ट्राने अनुभवलाय आणि तो क्षण शेतकरी, बैलगाडा शर्यतींशौकीनांसाठी तितकाच वाईटही ठरला.
IMG_1661IMG_1894
बैलगाड्यांसाठी राजकीय जोडे बाजूला ठेवणाराही मीच
मी बैलगाड्यासाठी काय करु शकतो याचा अनुभव सहा महिन्यांपूर्वी चाकणमध्ये दाखवून दिला. माझे राजकीय कट्टर विरोधक दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते, महेश लांडगेंसह सर्वपक्षीय नेते-कार्यकर्त्यांना मी फक्त बैलगाडा शर्यती सुरू होण्याच्या एकाच अजेंड्यासाठी हाक दिली आणि याच व्यासपीठावर मी बैलगाडा शर्यती सुरू करण्याबाबतच्या एकत्रित लढाईचे रणशिंगही फुंकले. अर्थात बैलगाडा शर्यती सुरू करण्याच्या नावाखाली काही मंडळी उगाच संघटीत होण्याचे चित्र तयार करतात याचे दु:ख खुप वेदना देते हेही आवर्जून सांगावेसे वाटते. अर्थात कुणातरी नेत्याला खुष करण्यासाठी, त्याच्या इशा-यावर चालणारी काही मंडळी ही पावसाळ्यातील कुत्र्यांच्या छत्र्यांसारखेच असतात हे मी गेल्या काही वर्षांच्या अनुभवात जवळून पाहिलेले आहे. अर्थात बैलगाडा मालकांकडील वर्गणी, वकील-शिष्ठमंडळांच्या नावाखाली विमानांच्या दिल्ली फे-या, दिल्लीत कुणी तरी नेता पकडून त्याचेबरोबर केलेले फोटो सेशन असा सगळाच खेळ शेतक-यांच्या भावनांशी खेळला गेला आणि जातोय हे या मंडळींच्या गावीही नसते आणि नाही हे विशेष.
vlcsnap-2015-12-25-17h13m01s255
बैलगाड्यावर पहिल्यांदा लोकसभेत बोलणारा पहिला खासदारही मीच!
लोकसभेत महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात असे ठणकावून सांगणारा पहिला खासदार मी आहे आणि याचा मला अभिमान आहे. पंत्रप्रधान नरेंद्र् मोदींना भेटून बैलगाडा शर्यतींबाबत लोकसभेत निर्णय घ्या असे सांगणारा देशातील पहिला खासदारही मीच आहे. शिवजन्मभूमी ‘शिवनेरीच्या छत्रछायेखाली जन्माला येवून राजा शिवछत्रपतींच्या नावाने जगताना सामान्य शेतक-याच्या जिव्हाळ्याच्या बैलगाडा शर्यतींसाठी कुणालाही नडायची ताकद ही फक्त माझ्यातच आहे,’ हे मी वेळोवेळी दाखवून दिलेय. तामिळनाडूतील जलीकट्टूसाठी कमलहसन सह सर्व अभिनेते रस्त्यावर उतरतात आणि सरकारला तात्पूरता अध्यादेश काढून तिथे बैलगाडा शर्यती चालू कराव्या लागतात हे तामिळनाडूचे वैभव. मात्र आपल्याकडे फक्त खासदार शिवाजीराव आढळराव यांनीच काय ते लढायचे आणि बैलगाडा शर्यती सुरू होण्याचे संकेत दिसू लागले की, सोशल मिडीयासह प्रत्येक ठिकाणी या ‘संधीसाधू-उपटसुंभांनी’ चमकायचे हे आपल्या पुणे जिल्ह्यातील शेतक-यांचे खरोखरीच दुर्दैव म्हणावे लागेल.
002 Bailgada_PM Letter001 Bailgada_PM Letter
003_reply PM
आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागे म्हणाले होते की, बैलगाडा शर्यती सुरू करण्याबाबतचे विधेयक विधानसभेत आणू आणि कायदा करु. मात्र हे विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे जावून त्यावर सही होताच त्यावर अजय मराठे नामक व्यक्तिने आक्षेप घेतले आणि कायदा झाला पण ’नियमावली कुठेय?’ असे म्हणत पुन्हा बैलगाडा शर्यतींपुढे अडचण आली. यावर उच्च न्यायालयाने याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडे हे प्रकरण सोपवल्याबरोबरच न्यायालयाने पाच सदस्यांचे पूर्ण बेंच यासाठी नेमले आणि त्याचीच सुनावणी येत्या महिनाभरात होईल. अर्थात यासाठी राज्याच्या वतीने लढण्यासाठी राज्याच्या कायदा व विधी विभागाशी मी नुकताच बोललो असून दिल्लीत राज्याच्या वतीने बाजु मांडणारे जे वकील आहेत त्यांचेकडे बैलगाडा शर्यती सुरू होतील अशा पध्दतीचे सर्व पूरावे व बाजु मांडण्यासाठीचे दस्ताऐवज पोहच झाल्याची खात्रीही आपण करुन घेतलेली आहे.
पहा कशी थट्टा, बरी नव्हे ही थट्टा..!
भाजपा सरकारने प्राणी कल्याण मंडळाच्या (अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्ड) अध्यक्षपदी खासदार पूनम महाजन-राव यांची नियुक्ती केलीय. अर्थात केंद्रातील एक मंत्री मनेका गांधी यांच्या सांगण्यावरुन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पूनम महाजन या सगळ्यांनी मिळून प्राणी कल्याण मंडळात ज्या जयसिन्हा यांची नियुक्ती केलीय ते जयसिन्हा म्हणजे ‘पेटा’चे (म्हणजेच बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी ज्या पेटा संघटनेचा तीव्र विरोध आहे त्यांचेच सदस्य असलेले हे गृहस्थ) सक्रीय सदस्य आहेत हे आपण सगळ्यांनी याचसाठी ध्यानी घ्यायला हवे. कारण या नियुक्तीने भाजपाच्या केंद्रापासून ते राज्यापर्यंतच्या सर्वच नेते-पदाधिका-यांची भूमिका किती (अ) प्रामाणिक आहे तेच लक्षात येतेय. मात्र बैलगाडा शर्यती-प्रेमी शेतक-यांची जयसिन्हांच्या नियुक्तीच्या निमित्ताने कशी थट्टा केली गेलीय ते आपण प्रत्येकासाठी लक्षवेधी आहे हे नक्की.
म्हणून शेवटी एकच सांगणे ते हे की, राजकारण हा काही माझा धंदा नाही अन मला त्यातून काहीच कमवायचेही नाही हे मी माझ्या तीन पंचवार्षिकमध्ये दाखवून दिलेय. मात्र माझ्या खासदारकीच्या अगदी पहिल्या टर्मपासून जी बैलगाडा शर्यतींबाबतची लढाई मी एकट्याने सुरू केली त्यात माझ्या सोबतीला आज पर्यंत कुणी सलगपणे टिकले असा एकही ‘हरीचा-लाल’ नाहीये. तरीही बैलगाडा शर्यती सुरू होणे आणि त्या चालू राहणे हे माझ्या बैलगाडा शौकीनांसाठी, सामान्य शेतक-यांसाठी आणि बैलगाडा मालकांसाठी माझे स्वप्न असून ते मी पूर्ण करणारच आणि सर्वोच्च न्यायालय, लोकसभा आणि रस्त्यावरील लढाई मी जिंकणारच हे मी पुन्हा एकदा आवर्जून सांगतो!
जय महाराष्ट्र!!!

अनुपम रम्य सोहळा…

मतदार भगिनी-बंधूंनो, नमस्कार…

आपणांस लक्ष लक्ष प्रणाम आणि कोटी कोटी धन्यवाद…

मतदारराजानं दाखविलेल्या दृढ विश्वासामुळं सलग तिसऱ्यांदा विजयाची माळ माझ्या गळ्यात पडली आहे. विजयी म्हणून नाव माझे असले, तरीही हा विजय तुमचा आहे. शिरूरमधील मतदारांचा आहे. माझ्या लाडक्या आणि मेहनती शिवसैनिकांचा आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आहे. हा विजय तुमचा माझा सगळ्यांचा आहे. तेव्हा आपल्या या दमदार आणि दणकेबाज विजयाबद्दल तुम्हालाही मनःपूर्वक शुभेच्छा… फेसबुक, ट्वीटर आणि वृत्तपत्रांमधून सर्वांचे आभार यापूर्वीच मानले होते. विजयोत्सवाचा जल्लोष आणि इतर गडबडींमधून थोडा वेळ मिळाल्यानंतर मग ब्लॉग लिहिवा, असा विचार केला आणि आज लिहायला घेतलं.

10308062_824191960944057_2797217580040961417_n

यंदाच्या निवडणुकीत धनुष्यबाणाला जवळपास साडेसहा लाख मतं मिळाली. गेल्या वेळी मला चार लाख ८२ हजार म्हणजे जवळपास पाच लाखांच्या आसपास मतं मिळाली होती आणि तुमचा दादा एक लाख ७९ हजार मतांनी निवडून आला होता. मात्र, यंदा आपण माझ्यावर व्यक्त केलेल्या प्रेमामुळं माझ्या मतांचा आकडा साडेसहा लाखांपर्यंत पोहोचला आणि जवळपास तीन लाख दोन हजार मतांच्या फरकानं आपला विजय साकारला. शिवसेनेच्या उमेदवारांपैकी सर्वाधिक मताधिक्यानं जिंकलेला उमेदवार शिरूरचा ठरला आहे. केवळ आणि केवळ आपल्यामुळेच हे शक्य झालंय.

आपण माझ्यावर जो विश्वास दाखविला त्याबद्दल माझे आपल्याला कोटी कोटी प्रणाम. फक्त धन्यवाद व्यक्त करून ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपल्या ऋणात राहूनच मतदारसंघाचा अधिकाधिक विकास करण्यासाठी कार्यरत राहीन, इतकेच आश्वासन आपल्याला मी या निमित्तानं देतो. आता केंद्रात आपले सरकार आहे. लवकरच राज्यातही महायुतीचेच सरकार येणार आहे. त्यामुळं शिरूर मतदारसंघाचा ‘सुपरफास्ट विकास’ होईल, हा माझा तुम्हाला शब्द आहे.

दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनचा विजय साकारणाऱ्या विस्टन चर्चिल यांच्या एका उद्गाराची मला आठवण झाल्यावाचून राहत नाही. ‘कोणत्याही परिस्थितीत विजय. कोणत्याही दहशतीची पर्वा न करता, लढा कितीही प्रदीर्घ असला तरीही आणि मार्ग कितीही खडतर असला तरीही विजय हवाच. कारण एकच विजयाशिवाय तरणोपाय नाही…’ आपल्या विजयाच्या बाबतीत चर्चिलचे हे उद्गार अत्यंत समर्पक आहेत.

10344345_825494007480519_8631895757535716209_o

राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आमदार, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी ठोकलेला तळ, साम दाम दंड आणि भेद अशा सर्व प्रकारांचा वापर करून विरोधकांनी लढविलेली निवडणूक, पोलिस आणि प्रशासनाच्या जोरावर गळचेपी करण्याचा केलेला प्रयत्न आणि बदनामी तसेच गैरलागू मुद्दे उपस्थित करून प्रचार भरकटविण्याचे षडयंत्र… राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जमेल ते करून पाहिले. मात्र, मतदारराजा कशालाही भुलला नाही. भरकटला नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचा ठाम निर्धार त्याने केला होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर त्याने पुन्हा एकदा सार्थ विश्वास व्यक्त केला.

तुमच्या लाडक्या दादाला सर्वच्या सर्व सहाही विधानसभा मतदारसंघांत घसघशीत आघाडी दिली आहे. विजयाचे मताधिक्य आणि सर्व विधानसभांमध्ये महायुतीला मिळालेली आघाडी पाहून राष्ट्रवादीच्या आमदारांचे धाबे दणाणले आहे. विधानसभेला अशीच परिस्थिती राहिली, तर आपले डिपॉझिट गुल होते, की काय अशा चिंतेत राष्ट्रवादीचे धुरीण चिंतन बैठका करीत आहेत. चालू दे त्यांचं…

फक्त शिरूरमध्येच नाही, तर पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रासह देशभरात भगव्या लाटेचे साम्राज्य पसरले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला मतदारांनी पसंती दर्शविली आहे. त्यांच्या गुजरात मॉडेलचे भरभरून समर्थन केले आहे. नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासियांना प्रचंड अपेक्षा आहेत. ते परिस्थिती सुधारू शकतील, असा विश्वास आहे.

विजयाची हॅट्ट्रिक आणि नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भव्यदिव्य विजयामुळे झालेल्या आनंदाचा कळसाध्याय म्हणजे संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मंगळवारी (वीस मे रोजी) पार पडलेला हृद्य सोहळा. संसदेमध्ये पहिलं पाऊल ठेवण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी टेकविलेला माथा, ‘भाजपा ही माझी आई आहे,’ हे सांगताना त्यांचा दाटून आलेला कंठ आणि हृदयाला हात घालणाऱ्या भाषणामुळं भाजपच्या अनेक नेत्या-कार्यकर्त्यांच्या डोळ्यात तरळलेले अश्रू… सर्व काही कल्पनेच्या पलिकडचे. सगळा कसा ‘अनुपम रम्य सोहळा’च जसा.

1402269_826532127376707_7443288013772275067_o

शिवसेनेसाठीही तो दिवस खूप संस्मरणीय होता. भावपूर्ण होता. आनंददायी होता. संसद आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकाविण्याचं स्वप्न हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलं होतं. संसदेवर भगवा फडकला आहे. बाळासाहेबांचे पहिलं स्वप्न साकार झालंय. आता त्यांचं आणखी एक स्वप्न पूर्ण करण्याची कामगिरी आपल्याला पार पाडायची आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेवर पुन्हा एकदा भगवा फडकावून महायुतीचे सरकार सत्तेवर आणायचं आहे. मला खात्री आहे, की उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली हा संकल्पही आपण निश्चितपणे सिद्धीस नेऊ.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सहकारी पक्षांनाही त्या दिवशी आवर्जून बोलविण्यात आलं होतं. जवळपास २९ पक्षांचे प्रतिनिधी तेव्हा उपस्थित होते. सरकार स्थापनेसाठीचा दावा करण्यासाठी नरेंद्रभाईंनी राष्ट्रपतींची भेट घेतली. ‘एनडीए’च्या घटक पक्षाच्या नेत्यांनाही बरोबर नेण्याची वेगळी प्रथा नरेंद्रभाईंनी यावेळी सुरू केली. आम्हाला त्याचं विशेष कौतुक आहे. भाजपच्या संसदीय नेतेपदी मोदींची निवड झाली. नंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांनीही नरेंद्रभाईंच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब केलं. भाजपनेही सर्व मित्रपक्षांना आश्वस्त केलं, की जरी भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता येणार असली तरीही मित्रपक्षांचा योग्य तो सन्मान राखला जाईलच. कधी खेळीमेळीच्या, कधी हास्यविनोदांच्या तर कधी भावपूर्ण वातावरणात बैठक पार पडली.

शिवसेना हा भारतीय जनता पक्षाचा सर्वाधिक जुना मित्रपक्ष आहे. यंदा तर शिवसेना हा १८ खासदारांसह सर्वाधिक मोठा मित्रपक्षही ठरला आहे. शिवसेनेचा वाघ देशातील सहाव्या क्रमांकावर राहिला आहे. शिवसेना कार्यप्रमुख मा. श्री उद्ध‍व ठाकरे यांनी घेतलेल्या कठोर मेहनतीचे आणि परिश्रमांचेच हे फळ आहे, असं मी मानतो. स्वतः उद्धवसाहेब, सौ. रश्मी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे यावेळी आवर्जून उपस्थित होते.

10358990_826532134043373_5936949364826863433_o

सेंट्रल हॉलमध्ये उद्धवसाहेबांनी मोजकंच पण मार्मिकपणे केलेलं भाषणही मला भावलं. हा सोहळा पाहताना, अनुभवताना माझाही ऊर अभिमानानं भरून आला. ‘आजच्या दिवशी मला बाळासाहेबांची राहून राहून आठवण येते,’ असं उद्ध‍वसाहेबांनी सांगितलं. खरं तर शिवसेनेच्या प्रत्येक खासदाराच्या आणि शिवसैनिकाच्या मनातली भावनाच उद्ध‍वसाहेबांनी बोलून दाखविली होती. इतक्या आनंदाच्या आणि जल्लोषाच्या प्रसंगी बाळासाहेबांची आठवण आली नाही, तर तो शिवसैनिक कसला. सगळा सोहळा कसा भावोत्कट बनला होता. आयुष्यात पुन्हा कधीही अनुभवता येणार नाही, अशा सोहळ्याचं साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं, हे मी माझं भाग्य समजतो.

आता उत्सुकता आहे नरेंद्र मोदींच्या राज्याभिषेक सोहळ्याची… आपण या आणि अशा अनेक संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार…

जयहिंद… जय महाराष्ट्र…