प्रचारादरम्यानची ‘डब्बा पार्टी’

प्रचारादरम्यान अनेकदा गावोगावी फिरावं लागतं. सकाळपासून सुरू होणाऱ्या प्रचारफेऱ्या रात्री उशिरापर्यंत सुरूच असतात. मध्येच एखाद्या गावात कार्यकर्त्यांचा मेळावा लावलेला असतो. दुसऱ्या गावात महायुतीच्या कार्यकर्त्यांची बैठक असते. अशा धामधुमीत उगवलेला दिवस कसा मावळतो, ते कळत देखील नाही. अशा अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून चार घास खाण्यासाठी पंधरा-वीस मिनिटांचा वेळ काढणं देखील अनेकदा कठीण होऊन जातं. मग कुठं जेवायचं नि काय जेवायंच, याचं नियोजन वगैरे करणं तर खूपच दूरची गोष्ट झाली.

1970589_791342254229028_493614527_n

मध्यंतरी फेसबुकवर प्रचारादरम्यानच्या ‘डब्बा पार्टी’चे फोटो पडल्यानंतर त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अनेकांना त्या फोटोचं अप्रूप वाटलं. काही जणांनी मला फोन करून त्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. एखादा खासदार त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत बसून त्यांच्या डब्यातलं जेवण करतो, याचं काही मंडळींना खूपच आश्चर्य वाटलं. ‘दादा, आम्हाला तुमचा अभिमान आहे,’ ‘तुम्ही ग्रेट आहात,’ असं अनेकांनी सांगितलं. पण मी इथं नम्रपणे सांगू इच्छितो, मी खूप वेगळं किंवा मोठं असं काहीच केलेलं नाहीये. इतर नेते त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर जेवत नसतील, म्हणून तुम्हाला हे वेगळं वाटत असेल. पण मी हे नेहमीच करत आलोय.

गेल्या दहा-वीस वर्षांपास्नंच माझं असंच आहे. आता फक्त फेसबुक किंवा ब्लॉग वगैरे सोशल मिडिया आल्यामुळं या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतायेत इतकंच. लहानपणी नाही का, शाळेमधली मुलं एकत्रच डब्बा खायला बसतात. त्यांच्यामध्ये कुठं दुजाभाव असतो. अनेकदा सहलीला गेलं किंवा कुठल्याशा किल्ल्यावर भटकायला गेल्यानंतर सगळे जण एकत्रच अंगत पंगत मांडतात. ती मंडळी जसं एकत्र जेवतात, तसंच आमचं कार्यकर्त्यांचं सहभोजन. मुख्य म्हणजे जेवणाच्या बाबतीत माझ्या फारशा अटी आणि शर्ती कधीच नव्हत्या. आजही नाहीत. ‘जे ताटात पडेल, ते गपगुमान खायचं. जास्त नखरे करायचे नाहीत,’ असं वळण लहानपणापास्नंच आईनं लावलंय. त्याचा आजपर्यंत खूप फायदा मला झाला आणि अजूनही होतोय.

प्रचारादरम्यान पंधरा-वीस मिनिटं वेळ आहे, असं लक्षात आल्यानंतर थोड्या वेळेसाठी डेरा टाकायचा. एखाद्या रस्त्याच्या कडेला झाडाची सावली शोधायची, मंदिराची ओसरी गाठायची किंवा शेताचा आसरा घेऊन डब्बे उघडायचे आणि ताव मारायचा. तालुक्याच्या ठिकाणी असलो तर कार्यकर्त्याच्या घरामध्ये किंवा ऑफिसात जेवण उरकायचं, हा आमचा नित्यक्रम. मध्यंतरी जुन्नरला अशीच आमची जोरदार ‘डब्बा पार्टी’ पार पडली. प्रचारादरम्यान अधूनमधून अशा डब्बा पार्ट्या पार पडतच असतात. कधी भजीपावचा आस्वाद घेतला जातो. तर कधी गर्रमागर्रम वडापावची छोटेखानी पार्टी रंगते.

10001160_792453944117859_1764211819_o

कधी ज्वारीची तर कधी बाजरीची भाकरी, ठेचा किंवा शेंगादाण्याची चटणी, वांग्याची भाजी किंवा झणझणीत झुणका, कधी लाल तर्रीचं कालवण, फ्लॉवर नि बटाट्याचा रस्सा आणि भात. प्रत्येकाच्या डब्यात जे काही असेल ते सर्वांनी एकत्र बसून फस्त करायचं… कधीतरी हळूच कोणीतरी स्वतःच्या डब्यातली भाकरी मला देतं आणि आग्रह करत म्हणतं, ‘दादा, तुम्ही खा. आपल्याला अजून खूप फिरायचंय.’ कधी मी माझ्याकडची भाकरी-भाजी कार्यकर्त्यांना देत म्हणतो, ‘तुमचं जोरात होऊ द्या. तुम्हाला पण जोरदार काम करायचंय.’ थट्टामस्करी करत आमचं जेवण पार पडतं. सहकाऱ्यांसोबत जेवण्यात जे काही सुख आहे, ते शब्दात मांडणं खूप अवघड आहे. घाईघाईत का होईना पण दोन घास पोटात जातात, यापेक्षा आणखी आनंदाची गोष्ट माझ्यासाठी काय असणार.

प्रचारासाठी फिरताना एखाद्या दूरच्या खेड्यात गेल्यानंतर रात्री परतायला उशीरच होतो. मग गावातली एखादी मायमाऊली तिच्या लेकराला आग्रह करते. म्हणते, ‘शिवाजी, आता कधी तू घरी जाणार आणि कधी जेवणार. बाहेर काहीबाही खाण्यापेक्षा आमच्याकडंच भाजीभाकरी खाऊन मग जा.’ खेड्यातल्या कुठल्याशा घरातून ‘दादा, आज जेवण केल्याशिवाय आम्ही तुम्हाला सोडणारच नाही,’ असा आग्रह होतो. माझ्या परिवाराचा भाग असलेल्या मंडळींचा हा प्रेमळ आग्रह मला मोडवत नाही. मग रात्रीचं जेवण तिथंच होतं.

Tea

मध्यंतरी खेडतालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील रस्ते डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ झाला. तसंच आळंदी, कोयाळी, मरकळ या ठिकाणी ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या रस्ते डांबरीकरण कामांचा नारळही फोडण्यात आला. कामाची ही सगळी गडबड सुरू असतानाच एका शिवसैनिकाच्या घरातून ‘दादा, आज इथंच जेवायचं,’ असा आग्रह सुरू झाला. छोटीशी चिमुरडी देखील त्यात पुढं होती. त्या चिमुरडीचा आग्रह मला मोडवेना. मग ‘जेवण नको, फक्कड चहा टाका,’ असं सांगून आमची छोटेखानी ‘टी पार्टी’ पार पडली. त्यांच्याकडं चहा घेतल्यानंतर त्या चिमुरडीच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद माझ्यासाठी खूप मोलाचा होता.

काही दिवसांपूर्वी जुन्नर तालुक्यातल्या आळे इथं आठवडे बाजाराला भेट दिली. तिथल्या बाजारात शेतकरी आणि भाजीपाला विक्रेत्यांशी मस्त गप्पागोष्टी झाल्या. त्यांनी आणलेल्या भाज्या, फळं आणि इतर गोष्टींबद्दल मी माहिती जाणून घेतली. विक्रीसाठी आणलेली काही फळं त्यांनी मला दिली. ‘दादांनीही त्याच्या तरुणपणात माझ्यासारखीच भाजीची पाटी वाहिलीय, भाजी विकलीय, ही गोष्ट आम्हाला खूपच अभिमानाची वाटते,’ असं त्या भाजीविक्रेत्यांनी स्वतःहून मला सांगितलं. माझ्या डोळ्यासमोर दोन क्षण माझा भूतकाळ उभा राहिला. त्यावेळी घेतलेल्या कष्टांची आठवण झाली.

1511463_796064123756841_887596997_o

लहानपणी आठवडे बाजार आणि जत्रा या दोन गोष्टींचं मला खूप आकर्षण असायचं. त्याठिकाणी मिळणाऱ्या खाद्यपदार्थांमुळं आम्ही कायमच जत्रेची वाट पाहत असायचो. रेवड्या, गोडीशेव, शेव-चिवडा, बुंदीचा लाडू, पापडी, वडा आणि भजी वगैरे गोष्टी खुणावत असायच्या. परवा आळे बाजारात गेल्यानंतर त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. ‘दादा, तुम्हीच येणार. आताच तोंड गोड करतो,’ असं म्हणत कुणी मिठाई भरविली तर कुणी गोड्याशेवेचा आग्रह केला. प्रत्येकाच्या मनात त्याच्या शिवाजीदादाबद्दल असलेलं प्रेम आणि आपुलकी पाहून मलाही भरून आलं.

गेली अनेक वर्ष मी समाजकारणात आहे. दहा वर्ष खासदार आहे. पण मी नेता, हा कार्यकर्ता वगैरे गोष्टी मी कधी मानल्याच नाहीत. कार्यकर्त्यांसमवेत फिरलो, कार्यकर्त्यांसमवेत बसलो, त्यांच्यासोबतच जेवलो आणि त्यांच्यासोबतच राहिलो. शिवसैनिक हाच माझा सखा आणि खेडोपाड्यातला मतदार हाच माझा सोबती. त्यामुळं माझं जे काही आहे, ते त्यांच्यासमोर. त्यांच्यासोबत. आतून एक आणि बाहेरून एक असं मला कधी जमलंच नाही. म्हणूनच कदाचित माझं आणि शिवसैनिकांचं नातं एकदम वेगळं आहे.

‘जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसमवेत जेवता, तेव्हा त्या जेवणाची लज्जत नेहमीपेक्षा आणखी वाढते,’ अशा आशयाचा इंग्रजीमध्ये एक विचार आहे. माझे शिवसैनिक, माझे कार्यकर्ते हे माझं कुटुंबच आहे. त्यांच्यासमवेत जेवण घेतल्यानं जेवणाची लज्जत, पदार्थांचा स्वाद आणखी वाढतो, असंच मला वाटतं. कारण वेळोवेळी मी त्याचा अनुभव घेतलाय.

Advertisements