तुही यत्ता कंची…

‘शिक्षण हे असे एकमेव जबरदस्त शस्त्र आहे, की ज्यामध्ये सारे जग बदलण्याची क्षमता आहे.’

दक्षिण आफ्रिकेचे महान सुपुत्र डॉ. नेल्सन मंडेला.

‘शिक्षण म्हणजे तुम्ही काय काय जाणता. पुस्तकात काय आहे, ते माहिती असणे म्हणजे शिक्षण नव्हे.’

अनुभवातून मिळते, तेच आयुष्यातील खरे शिक्षण.

इजिप्तमधील सुप्रसिद्ध विचार

ज्ञानप्राप्तीचा एकमेव मार्ग म्हणजे अनुभव.

आइनस्टाइन

तुम्ही म्हणाल, दादांनी आज हे काय सुरू केलंय. पण मुद्दामच मी आज हे लिहिलंय. अनेकांना सत्तेची मस्ती येते. काहींना पैशाची मस्ती येते. काही जणांना त्यांच्या ताकदीची किंवा सौंदर्याची मस्ती येते. तशीच आपल्या इथल्या काही जणांना शिक्षणाची मस्ती आलीय, असं वाटतंय. पदवीपर्यंत शिक्षण घेणारे काही जण माझं शिक्षण किती झालंय, असा प्रश्न विचारताहेत.

मुळात जेव्हा निवडणुकीत मुद्दे नसतात किंवा उमेदवारानं काहीच कामे केलेली नसतात. तेव्हा असे गैरलागू मुद्दे आणि फालतू प्रश्न विचारण्याची आफत काही जणांवर येते. तुम्हाला तुमच्या पदवीचा इतकाच गर्व झाला असेल, तर तो तुमच्यापाशीच ठेवा. दुसऱ्याचं शिक्षण आणि दुसऱ्याचा अनुभव याबद्दल अपशब्द काढण्याचा तुम्हाला अधिकार नाही.

अनेक जणांना वाटतंय, की मी एका रात्रीत उद्योगपती झालोय. आरोप करतायेत, की मी शेतकऱ्याचा मुलगा नाहीये. मी पण सर्वांसारखा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातलाच आहे. इतरांसारखी गुरं चरायला नेलीयेत. गुरं राखलीयेत. मोटं हाकलीय. विहिरीवरून घरात पाणी आणलंय. शेतीची कामंही केलीयेत. अगदी गवतही कापलंय. जन्माला आल्या आल्या काही मी उद्योगपती बनलो नाहीये. माझं जीवन पण इतर सर्वांसारखंच खडतर आणि अवघडच राहिलंय. तुम्हाला उद्योगपती आढळराव दिसतायेत. पण तुम्ही माझी आत्मकथा वाचली नसल्यामुळं शेतकरी आढळराव, भाजीविक्रेता आढळराव, पेपर टाकणारा आढळराव, डोअरकिपर आढळराव, शिपाई आढळराव आणि इतर कष्टाची नि मेहनतीची कामं करणारा आढळराव दिसत नाही. माझ्या आयुष्याची सगळी कथा ‘अनाहत’मध्ये मी सविस्तरपणे मांडलीय.  अनेकांनी ते वाचलीही आहे. पण ज्यांनी ते वाचलेलं नाहीये, त्यांच्यासाठी ते पुन्हा एकदा सांगतोय.

लहानपणी आमचं कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाल्यानंतर तिथं अहोरात्र मेहनत घेतली. अत्यंत खडतर परिस्थितीत घर चालविण्यासाठी खूप कष्ट सोसले. मंडईत वडिलांना मदत करण्यासाठी भाजी विकली. आंब्याच्या पेट्या वाहिल्या. पण शिक्षणावरील श्रद्ध ढळू दिली नाही. सकाळी मंडईत भाजी विकायची नि रात्री शाळेत शिकायचं, असा माझा उपक्रम सुरू असायचा. मग वडील गावी परतले आणि मी मुंबईतच राहिलो. हाती नोकरी नाही. रहायला घर नाही, तरी डगमगलो नाही. मुंबईत प्रसंगी झोपडपट्टीत राहिलो, मिळेत तिथे आसरा घेतला. पण कष्ट आणि शिक्षण हे सुरूच होतं. कधी पेपरची लाइन टाकली, कधी डोअर किपरचं काम केलं, प्रिंटिंग प्रेसमध्ये हेल्पर म्हणून कामाला लागलो. दिवसभर कष्ट सुरू असतानाही शिक्षण कधी सुटलं नाही.

‘झेनिथ इलेक्ट्रॉनिक्स’मध्ये शिपाई म्हणून कामाला लागलो. पण तेवढ्यावरच समाधान मानलं नाही. शिक्षणाप्रमाणेच इतर गोष्टींचं ज्ञानही आपल्याला हवं, म्हणून टायपिंगचा क्लास लावला. इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स पूर्ण केला. वेळप्रसंगी रस्त्यावर राहिलो, पण ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वाचण्याचा नियम चुकविला नाही. झेनिथमध्ये काम करीत असतानाच कोल्हापुरात शिवाजी युनिव्हर्सिटीत पी. डी. आर्टला बहिस्थ म्हणून प्रवेश घेतला. फक्त तीन महिन्यात सर्व अभ्यास पूर्ण करून परिक्षा दिली. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण तर झालोच, पण कोल्हापूर सेंटरमध्ये इंग्रजी विषयात सर्वप्रथम आलो.

004

मी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला उद्योगपती नाही. शेतकरी कुटुंबातच जन्मलो पण कष्टानं आणि स्वकर्तृत्वानं उद्योगपती बनलोय आणि मला त्याचा अभिमान आहे. आयुष्यात दोन गोष्टी कायम लक्षात ठेवल्या. वाचत राहिलो. इंग्रजी पेपर, इंग्रजी पुस्तकं, इंग्रजी साहित्य वाचत राहिलो. कष्ट करीत राहिलो. कोणतंही काम करण्याची कधी लाज बाळगली नाही आणि तिसरं म्हणजे नेहमी नवनवीन गोष्टी शिकत राहिलो.

भारतात कम्प्युटर अजून यायचा होता. महाराष्ट्रातल्या उद्योजकांबरोबर जपान, हाँगकाँग, सिंगापूर आणि कोरिया दौऱ्यावर गेलो होतो. तिथे जे काही पाहिलं होतं, माहिती घेतली होती ‘मायक्रोप्रोसेसर ट्रेनर सिस्टीम’ तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. तसं पाहिलं तर तेव्हा ती मोठी रिस्कच होती. पण मी ती घेतली. अनेकदा इंजीनिअर मंडळींसोबत काम केलं. काही वेळा त्यांच्या डिझाईनमध्ये सुधारण सुचविल्या. त्या मंडळींनीही योग्य त्या सूचना मोठ्या मनानं स्वीकारल्या. इंजीनिअर किंवा एमबीए नसतानाही अनुभवामुळं मी व्यवसायात स्थिरावलो आणि आज ‘डायनॉलॉग’ जगातील प्रमुख कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते आहे. दूरदृष्टी होती, म्हणूनच मी तेव्हा या व्यवसायात शिरलो. परंपरागत व्यवसाय निवडला असता, तर आज कुठं असतो माहिती नाही. शिक्षमामुळं ज्ञान मिळतं आणि समाजात वावरल्यामुळं दृष्टीकोन प्राप्त होतो. तो मला झाला आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा उदयोगपती झालाय. आजच्या घडीला ‘डायनॉलॉग’मध्ये आज शेकडो इंजीनिअर्स आहेत.

उद्योगपती झालो, तरी पाय जमिनीवरच आहेत. कोणाच्याही घरी जातो. शेतकऱ्याच्या घरी चटणी-भाकरी खातो. चहा-नाष्टा घेतो. मायमाऊलीच्या पायावर डोकं ठेवून आशीर्वाद घेतो. त्यामुळं मी उद्योगपती असलो किंवा कोणीही असलो, तरी त्याचा रोजच्या जगण्यावर अजिबात फरक पडलेला नाही. मी आधी होतो तसाच आजही आहे. माझं काम आणि प्रचारही निवडणुकीपुरता नसतो. निवडणूक आली, की फोटो काढून फेसबुकवर टाकायचे धंदे मी करीत नाही. निवडणुकीपुरती लोकांची कामं करीत नाही. निवडणुकीपुरता जनतेत मिसळत नाही.

0023

गेली अनेक वर्ष लोकांमध्ये आहे. रोज सकाळी उठून लोकांच्या गाठीभेटी घेतोय. आदिवासी पाड्यांवर जाऊन लोकांच्या समस्या, वेदना जाणून घेतोय. कधीकधी सकाळी सात वाजता सुरू होणारा माझा दिवस दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजेपर्यंत सुरू असतो. पाऊस, थंडी आणि ऊन काहीही असो. माझ्या नित्यक्रमात कधीही फरक पडलेला नाही. लोकांना भेटल्याशिवाय मला चैनच पडत नाही.

त्यामुळं शिक्षण आणि कामांचा हिशेब तुम्ही मागू नका. मी कोण आहे आणि काय आहे, हे जनतेला माहिती आहे. मी कायम तुमच्या सोबत होतो आणि यापुढेही राहील. त्यामुळंच जनतेनं मला पहिल्या वेळी वीस हजारांनी निवडून दिलं आणि दुसऱ्यांदा एक लाख ८० हजारांपर्यंत माझ्या विजयाचं मार्जीन वाढवलं. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझा माझ्या मतदारांवर. इतरांनी त्यामध्ये लुडबूड करण्याची आवश्यकता नाही.

विकासकामे आणि प्रचाराचे मुख्य मुद्दे बाजूला सारून गैरलागू मुद्दे पुढे करणाऱ्यांना विचारावेसे वाटते, बाबारं, ‘तुही यत्ता कंची…?’

‘मनीलाइफ’ मासिकात छापून आलेली दादांची मुलाखत वाचण्यासाठी यावर क्लिक करा…

पाच वर्षांतील खणखणीत पाच…

  • –    पुणे-नाशिक रेल्वेमार्गासाठी सुरेश कलमाडी हे रेल्वे राज्यमंत्री असताना सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, हा मार्ग फायदेशीर ठरणारा नाही. तोट्यात चालणारा आहे, हे समजून त्यांनी तो प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवला होता. मी खासदार झाल्यानंतर त्या रेल्वेमार्गासाठी सातत्याने पाठपुरावा केला. ममता बॅनर्जी यांना भेटलो. सुरुवातीला रेल्वे खाते हे तृणमूल काँग्रेसकडे असल्यामुळे त्यांना भेटणे आवश्यक होते. त्यांना या रेल्वेमार्गाचे महत्त्व समजावून सांगितले. अखेरीस पुणे-नाशिक रेल्वेमार्गासाठी १८३९ कोटी रुपयांचा निधी २०१२ मध्ये मंजूर करण्यात आला. एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या कामांना नियोजन आयोगाची संमती लागते. सध्या हे प्रकरण नियोजन आयोगाकडे प्रलंबित असून त्यांच्या मान्यतेनंतर पुणे-नाशिक रेल्वेमार्गाला गती येईल.
  • –    दुसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर मी खेड-सिन्नर मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा केला. २००९ पासून तो विषय माझ्या डोक्यात होता. जवळपास सोळाहून अधिक वेळा बैठका झाल्या. मंत्री महोदय, सचिव, अधिकारी यांच्याशी चर्चा झाली. कार्मिक खाते, भूसंपादन खाते आणि विविध संबंधित खात्यांबरोबर बैठका झाल्या. पाच वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर महिन्याभरापूर्वी या रस्त्यासाठी १४५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
  • –    कल्याण ते नगर हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनल्यासारखा आहे. अनेक अपघात आणि अनेक बळी हीच या रस्त्याची ओळख बनली आहे. हे टाळण्यासाठी मी २०१० सालापासून माळशेज घाट ते अणे घाट रस्ता व्हावा, यासाठी प्रयत्न केले. सुमारे १६१ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यासाठी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात २९३ कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले असून लवकरच या रस्त्याच्या कामाला प्रारंभ होईल. मुख्य म्हणजे या रस्त्याला कोणत्याही स्वरुपाचा टोल असणार नाही. त्यामुळे वाहनचालकांची लूट या रस्त्यामुळे होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे.
  • –    पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत खेड आणि शिरुर या मतदारसंघांमध्ये सर्वानिधी निधी आणण्यात मी यशस्वी झालो आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या कोणत्याही खासदाराने माझे आव्हान स्वीकारावे. त्यांच्या मतदरासंघात जर अधिक निधी नेण्यात ते यशस्वी झाले, असतील तर दाखवून द्यावे. मतदारसंघात पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत पाचशे कोटींहून अधिक रुपयांचा निधी आणण्यात मला यश आले आहे.
  • –    हडपसर ते कवडीपाट या सहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी तीन वर्षे झगडलो. वेळप्रसंगी भांडलो सुद्धा. केंद्रीय मंत्र्यांबरोबर भांडलो. शाब्दिक चकमक उडाली. पण अखेरीस सहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी आता ५० कोटी रुपये संमत करण्यात आले आहेत.
Advertisements