डोंगर… आपत्तीचा, दुःखांचा आणि आव्हानांचाही

माळीण… नुसता शब्द जरी नुसता कानावर पडला तरी काळजाचा थरकाप उडविणारी महाभयानक घटना डोळ्यासमोर उभी राहते. कधी काळी माळीण नावाचं छोटंसं टुमदार गाव इथं वसलेलं होतं, यावर कदाचित पुढच्या पिढीचा विश्वासही बसणार नाही, इतकी भीषण हानी या गावाची झाली आहे. कधीही भरून न येणारं नुकसान आहे. घटनेचं वर्णन करण्यासाठी भीषण आणि भयाण हे शब्द अपुरे पडतील, इतकी अवघड परिस्थिती आहे. अलिकडच्या काळात निसर्गाच्या रुद्रावताराचा मानवी जीवनाला बसलेला सर्वाधिक मोठा फटका म्हणजे माळीण असं मला वाटतं.  Satalite-image   10362619_10204072602993252_2135784327786748095_n

संसदेचं अधिवेशन सुरू असल्यामुळं नवी दिल्लीत होतो. माळीणच्या दुर्घटनेची माहिती कळताच राजधानीतच महत्त्वाच्या गाठीभेटी घेतल्या. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. त्यांना दुर्घटनेची इत्थंभूत माहिती दिली. परिस्थितीची जाणीव करून दिली. माननीय पंतप्रधानांनी राजनाथसिंह यांना तातडीनं माळीणच्या दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रात जाण्याच्या सूचना दिल्या.

10169176_10204643856439266_4879685879513590795_n

नवी दिल्लीत हे सगळं सुरू असताना माझं सगळं लक्ष माळीणकडे लागलं होतं. गेल्या पंधरा-वीस वर्षांच्या काळात अनेकदा या गावात या ना त्या निमित्तानं जाणं झालं. माझा आणि माळीणचा अगदी ऋणानुबंध निर्माण झाला होता. तिथली परिस्थिती काय असेल आणि नेमकं काय झालं असेल, हे जाणून घेत होतो. मतदारसंघातील सर्व शिवसैनिक तसंच कार्यकर्त्यांना तातडीनं दुर्घटनास्थळी जाऊन मदतकार्याला हातभार लावण्याचे आदेश दिले. अर्थात, अनेक शिवसैनिक आदेशाची वाट न पाहता आधीच दुर्घटनास्थळी रवाना झाले होते. शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आणि वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते सर्वप्रथम माळीण गावात दाखल झाले होते. तेव्हा ‘एनडीआरएफ’चे जवान किंवा प्रशासनाचे अधिकारीही तिथं पोहोचले नव्हते. सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या परीनं मदतकार्य सुरू केले होते. शिवसैनिक आणि संघाच्या कार्यकर्त्यांचं मला खूप कौतुक आणि अप्रूप वाटतं. कोणतीही आपत्ती कोसळली, की मंडळीच सर्वाधिक आधी तिथं पोहोचतात आणि मदतकार्य सुरू करतात. दुपारनंतर ‘एनडीआरएफ’चे जवान माळीणमध्ये दाखल झाले. नंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिवसैनिक आणि संघ स्वयंसेवक काम करू लागले.

1602098_868960169800569_1721092214454791634_o

नवी दिल्लीत वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांशी सातत्यानं माझी चर्चा सुरू होती. सतत कोसळणारा पाऊस, गावातील ठप्प झालेला वीजपुरवठा यामुळं रात्री दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देणं शक्य नव्हतं. त्यामुळं दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही माळीणमध्ये दाखल झालो. केंद्रीय गृहमंत्री मा. राजनाथसिंह, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे आणि इतर काही नेतेमंडळी सोबत होती. राजनाथसिंह यांनी माळीण गावची परिस्थिती पाहिली आणि त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. ‘इथं एक गाव वसलेलं होतं, यावर विश्वासच बसत नाही,’ हे त्यांचं वक्तव्यामध्येच सगंळ काही सांगून गेलं. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळं राजनाथसिंह यांचं हृदयही हेलावलं. केंद्राच्या वतीनं तातडीनं दोन लाख रुपयांची मदत मृतांच्या नातेवाईकांना देण्यात येईल, याची त्यांनी घोषणा केली. त्याचप्रमाणं राज्यानं केंद्राकडे गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव पाठवावा. केंद्र त्यावर तातडीनं सकारात्मक निर्णय घेऊन गावाच्या पुनर्वसनाची मार्ग मोकळा करेल, असं आश्वासन त्यांनी दिलं.

राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदल्या दिवशीच, म्हणजे दुर्घटनेच्या दिवशी येऊन परिस्थितीचा आढावा घेऊन गेले होते. मात्र, त्यांनी दुर्घटनाग्रस्तांना आणि मृतांच्या नातेवाईकांना कोणतीही मदत जाहीर केली नव्हती. काळाचा घालाच इतका महाभयानक होता, की आर्थिक मदत, दिलासा, मदतीचे हात या सगळ्यांच्या पलिकडं परिस्थिती पोहोचलेली होती. तरीही केंद्र सरकार आमच्या पाठिशी ठामपणे उभं आहे, असा विश्वास निर्माण करणं आवश्यक होतं. ते या निमित्तानं झालं. राजनाथसिंहांच्या नंतर दुपारी मग माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार दुर्घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्या भेटीनंतर मग राज्यानं दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. अर्थात, राज्याच्या मदतीमध्ये ७५ टक्के वाटा केंद्राचाच असतो. त्यामुळं केंद्रानं माळीणच्या दुर्घटनाग्रस्तांसाठी भरभरून दिलंय आणि इथून पुढं देखील लागेल ती सर्व मदत करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे, हे मी इथं आग्रहपूर्वक सांगू इच्छितो.

10499421_868962049800381_3891409029198393984_o

माळीणच्या दुर्घटनेमुळं कोसळलेला दुःखाचा आणि आव्हानांचा डोंगरच इतका मोठा होता, की त्याची कारणं काय, कशामुळं हे सगळं झालं, दुर्घटना नैसर्गिक की मानवनिर्मित या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्याची ती वेळ नव्हती. कदाचित अजूनही आपण चर्चा करण्याची ही वेळ नाही. भूवैज्ञानिक, पर्यावरणशास्त्रज्ञ, हवामानशास्त्रज्ञ आणि संबंधित अभ्यासू मंडळी यावर सखोल संशोधन करून योग्य तो निष्कर्ष काढतील. आपण त्यामध्ये पडण्याची आवश्यकता नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. मात्र, तरीही विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी माळीण दुर्घटनेच्या निमित्ताने माझ्यावर निशाणा साधून टीका केलीच. मोगलांना जसे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी संताजी-धनाजी दिसायचे तसंच वळसे-पाटलांचं झालेलं दिसतंय. त्यांना प्रत्येक ठिकाणी शिवाजीदादाच दिसतो वाटतं.

विनाकारण त्यांनी माझ्यावर टीका केली. मला वादात पडायचं नाही. आणि दुर्घटनेच्या संकटामध्ये सापडलेल्या आपत्तीग्रस्तांचा अवमान करायचा नाही. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे, की पडकईची कामं करण्याला माझा विरोध नाही. मात्र, ही पडकईची कामं मनुष्यबळाच्या माध्यमातून झाली असती, तर ते अधिक योग्य झालं असतं.

Malin

आणखी एक मुद्दा मला इथं आवर्जून उपस्थित करावासा वाटतोय. खरं तर अशा आपत्तीच्या प्रसंगात दावे नि प्रतिदावे करत बसण्याची माझी इच्छा नाही. मात्र, समोरच्याला हे समजत नसेल तर मी तरी काय करणार. त्यामुळंच फक्त अजून एक उल्लेख करतो. माळीणच्या मदतीची माहिती घेण्यासाठी दुसऱ्यांदा जेव्हा मी तिथं गेलो तेव्हा डिंभे चेकनाका पास केल्यानंतर अडिवरे गावाजवळ पोलिसांनी माझ्या गाडीसह माझ्यासोबतच्या तीन गाड्या अडवल्या. नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल अरुण गिेरे हे माझ्यासोबत गाडीमध्येच होते. पोलिसांनी अरुण गिरे यांना गाडीतून उतरविले. मी माळीणला जाऊन परत येईपर्यंत अरुण गिरे यांना पोलिस बंदोबस्तात तिथेच म्हणजेच अडिवरे गावातच थांबवून ठेवण्यात आले. अरुण गिरे शिवसेनेत आल्याचा धसका दिलीप वळसे-पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. अरुण गिरे यांच्या शिवसेना प्रवेशामुळं त्यांच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखी अवघड परिस्थिती झालेली दिसतेय. त्यामुळंच ते प्रत्येक ठिकाणी सूडबुद्धी वापरत आहेत.

मला या पोलिसांचं मोठं आश्चर्य वाटतं. तुम्ही पोलिस आहात की राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधलेले शिपाई आहात? पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशावर तुम्ही चालता की दिलीप वळसे-पाटील यांच्या तालावर तुमचा कारभार चालतो? अरे, आंबेगावसह शिरूर मतदारसंघात कायद्याचे राज्य आहे की कुणा एकाची हुकुमशाही आहे? वेळीच सुधारा. राज्यातही पुढचं सरकार आमचं आहे आमचं.

बरं प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आंबेगावात वेगळा न्याय लावण्याची पद्धत दिसतेय. एकीकडे शिवसैनिकांच्या आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या गाड्या अडवायच्या. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या चाळीस-चाळीस गाड्या कोणतीही तपासणी न करता आणि न अडविता सोडल्या जात आहेत. माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीची, खासदाराची गाडी अडविण्याची हिंमत पोलिसांमध्ये येतेच कुठून? राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वेगळा न्याय आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना-कार्यकर्त्यांना वेगळा न्याय हा कोणता कायदा आहे, याचे उत्तर संबंधितांनी देण्याची आवश्यकता आहे.

‘पडकई’च्या चौकशीला वळसे-पाटील दचकतात का?

  • महाकाय यंत्रसामुग्री वापरून पडकईची कामं केल्यामुळंच ही दुर्घटना झाली का? याची चौकशी व्हायला पाहिजे.
  • अशी काय महाकाय आणि जागतिक दर्जाची यंत्रसामुग्री वापरली, की पडकईच्या कामांसाठी नऊ कोटी रुपये खर्च झाला, याचा तपास व्हायला पाहिजे.
  • पडकईचे नाव निघताच विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील एकदम दचकतात का? आणि बॅकफूटवर का जातात? त्यांचे पडकईच्या कामात काही हितसंबंध गुंतलेले आहेत का, यावर प्रकाश पडला पाहिजे.
  • अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय मगर हे माझी गाडी अडवून ‘पडकईबाबत बोलू नका. लोक नाराज होतील,’ असं मला सांगतात. काय बोलायचं आणि काय नाही, हे मला सांगणारे विजय मगर कोण. मुळात एका लोकप्रतिनिधीची गाडी अडविण्याचे अधिकार यांना कोणी दिले? काय बोलायचं आणि काय नाही, हे सांगणं पुढची गोष्ट झाली. कोणाच्या तालावर हे नाचताहेत? हा सगळा काय झोल आहे?
  • फक्त पोलिसांमार्फत नाही, तर सीआयडीच्या मार्फत पडकईच्या सर्व कामांची आणि या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे, अशी माझी ठाम मागणी आहे.

10556509_10204072604913300_2966336670619223850_n

पुनर्वसनाचे काम वेगाने व्हायला पाहिजे, यासाठी मी प्रयत्नशील आहे. खचलेल्या मनांना आणि फक्त शरीरानं जिवंत असलेल्या गावकऱ्यांना सर्वतोपरी मदत करून पुन्हा उभं करण्याची आवश्यकता आहे. दुर्घटनेत वाचलेल्या नागरिकांचे पुनर्वसन होईपर्यंत त्यांचा निवास, भोजन, कपडे तसंच इतर सर्व गोष्टींची व्यवस्था ‘डायनालॉग इंडिया लिमिटेड’ कंपनी आणि ‘भैरवनाथ पतसंस्थे’मार्फत करण्यात येत आहे. गावातील पंधरा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी मी स्वतः उचलली आहे. शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं मदतनिधी कक्ष सुरू करण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी पाच लाख रुपयांचा मदतनिधी उभा राहिला. त्यानंतर मदतीचा ओघ सुरूच आहे. कपडे, धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या रुपानेही मदत मोठ्या प्रमाणावर येते आहे.

दुर्घटनेमुळं झालेलं नुकसान आणि कोसळलेला दुःखाचा डोंगर यातून आपल्याला पुन्हा उभं रहायचं आहे. गावकऱ्यांना उभं करायचं आहे. त्यांना सहकार्याचा हात द्यायचा आहे. आपण सर्वांनी शिवसेनेच्या मदतकेंद्राला भरघोस मदत करून माळीण गावाच्या विकासासाठी आणि आपत्तीग्रस्तांना पुन्हा उभं करण्यासाठी हातभार लावावा, ही माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. लिहिण्यासारखं बरंच आहे. पण आता इथंच थांबतो. पुन्हा भेटू लवकरच…