तेलंगण आंदोलनाचा त्रास नि मनस्ताप

तेलंगणमधील मतांवर डोळा असलेल्या काँग्रेसला दहा वर्षांपूर्वीचे आश्वासन पूर्ण करण्याची फार घाई झाली होती. त्यामुळे दूरचित्रवाहिन्यांचे प्रक्षेपण बंद करून, सुरक्षारक्षकांच्या कडेकोट बंदोबस्तात आणि बंद दरवाज्याच्या आतमध्ये तेलंगण हे नवे राज्य जन्माला घालण्याची प्रक्रिया काँग्रेसने पार पाडली. लोकशाहीचा गळा घोटला आणि संसदीय परंपरेला काळिमा फासली. इतके सारे नाटक करून वेगळ्या तेलंगणची निर्मिती करून काँग्रेसने काय साध्य केले. मुळात वैयक्तिक माझा आणि शिवसेना पक्षाचा तेलंगणच्या निर्मितीला विरोधच होत आणि यापुढेही राहील. अशा प्रकारे राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून भावाभावांमध्ये भांडणे लावण्याची आवश्यकताच काय? त्यामुळेच संयुक्त आंध्र प्रदेशच्या बाजूने आम्ही आहोत.

Tirupati-Balaji-temple

तेलंगणचा विषय निघाला म्हणून सहज आठवलं. तेलंगण आणि सीमांध्र यांच्या आंदोलनांचा फटका सर्वसामान्य नागरिकांना कसा बसतो, याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतलाय. घेतलाय म्हणजे काय अगदी चांगला लक्षात सुद्धा राहिलाय. असेल साधारण सहा-आठ महिन्यांपूर्वीची घटना. वेगळ्या तेलंगणच्या आंदोलनाने तेव्हापासूनच अधिक जोर धरलाय. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सीमांध्रमधील नागरिकही रस्त्यावर उतरले आणि त्यांनीही संयुक्त आंध्र प्रदेशसाठी जोरदार आंदोलन छेडले. या आंदोलनांचा फटका तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांना कसा बसतो, हे मी प्रत्यक्ष अनुभवलंय.

सहाएक महिन्यांपूर्वी मी तिरुपतीला गेलो होतो. दर्शनासाठी. अगदी व्यवस्थित दर्शन करून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी निघून दुपारपर्यंत बेंगळुरूला पोहोचणार होतो. चित्तूर-पालमनेर-मुलबागल या मार्गाने आम्ही जाणार होतो. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळपासून नेमका सीमांध्रातील नागरिकांनी रास्ता रोको पुकारला होता. तरीही आम्ही सकाळी पाचच्या सुमारास निघालो. तिरुपती रोडवरून हायवेवर आल्यानंतर आम्हाला आंदोलनाचा अंदाज हळूहळू येऊ लागला. जागोजागी रास्ता रोको सुरू होते. सकाळची वेळ असल्यामुळं अजून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या नव्हत्या. पण तरीही रांगा लागायला सुरूवात झाली होती.

Tirupati Balaji Photo

पहिल्या रास्ता रोकोच्या ठिकाणी आम्हाला अडविलं. मला चांगलं आठवतंय, पालमनेर नावाचं गाव होतं ते. थोडा वेळ थांबल्यानंतर एक रुग्णवाहिका तिथं आली. आंदोलकांनी रुग्णवाहिकेला सोडलं. आमच्या ड्रायव्हरनं शिताफीनं त्यामागून गाडी घुसविली आणि पहिल्या रास्ता रोकोचा अडथळा आम्ही पार केला. मात्र, वीस-पंचवीस किलोमीटर गेल्यानंतर पुन्हा एकदा नव्या रास्ता रोकोला आम्हाला सामोरे जावे लागले.  झालं, इथंच दोन-तीन तास काढावे लागणार, अशा विचारात आम्ही सर्व होतो. तेवढ्यात पाच-दहा मिनिटांनी आठ-दहा तरुण बाईकवरुन तिथं आले. त्यांनी आम्हाला विचारलं, की गावागावांतून तुम्हाला पुढच्या रस्त्यापर्यंत नेतो, आम्हाला चारशे रुपये द्या. सुरुवातीला मला हे थोडं ऑड वाढलं. मी पुण्याजवळील शिरुरचा खासदार आहे, असं सांगूनही त्यांच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. पैसे हवेच अशी त्यांची भूमिका होती.

शेवटी काय आम्हालाली लवकर बेंगळुरूला पोहोचायचं होतं. त्यामुळं आम्ही तरुणांची ऑफर स्वीकारली. फक्त आम्ही एकटेच नाही, तर आणखी तीन-चार वाहनचालकांनाही त्यांनी पटविलं होतं. चारशे रुपये त्यांच्या हातावर टेकविले. मग त्या तरुणांनी आम्हाला गाडी वळवून घ्यायला लावली आणि थोडं मागं जाऊन एका फाट्यावरून आमच्या गाड्या आत वळल्या. अगदी छोट्या छोट्या खेड्यातून, पाड्यांमधून आमच्या गाड्या जात होता. रस्ते अगदी छोटे छोटे. खडबडीत आणि ओबडधोबड. साधारण तास दीडतास प्रवास केल्यानंतर मग त्यांनी आम्हाला पुढच्या रस्त्यावर नेऊन सोडलं.

Tirupati- Map

त्या रस्त्यावरून थोडा प्रवास करुन पुढं गेल्यानंतर पुढचा रास्ता रोको होताच. तिथंही बाईकवाल्या तरुणांचं तसंच टोळकं हजरच होतं. आम्ही त्या तरुणांच्या पाठीमागून आलोय, हे पाहिल्यानंतर जे समजायचं होतं, ते त्यांना समजलं. मग त्यांनी पुन्हा आम्हाला पुढचा रस्ता दाखवायची ऑफर दिली आणि आमच्याकडून आधीच्याच रेटप्रमाणे चारशे रुपये घेतले. सीमांध्रचे आंदोलन म्हणजे त्या तरुणांचा धंदाच झाला होता. कदाचित आंदोलकांपैकीच काही तरुण हे तोडपाणी करीत असावेत. कोणास ठाऊक. पुन्हा तशाच आडवाटा, छोटीछोटी गावं, धुरळा उडणारा बारीकसा रस्ता आणि निष्कारण वाया जाणारा वेळ. तासाभरानंतर मग आम्हाला मोठा रस्ता मिळाला. नंतर थोड्यावेळानं पुन्हा त्याच नाटकाचा तिसरा खेळ झाला आणि शेवटी आम्ही कर्नाटक बॉर्डरजवळ येऊन पोहोचलो. मग तिथून पुढं आम्हाला कोणताही त्रास झाला नाही.

सकाळी पाचाला निघालेलो आम्ही एरव्ही पाच तासात सहजपणे बेंगळुरूला पोहोचलो असतो. म्हणजे सकाळी दहा अकराच्या सुमारास. पण या सीमांध्र आंदोलनाच्या गडबडीत आमचा हाकनाक वेळ गेला. संध्याकाळचे पाच वाजले आम्हाला पोहोचायला. म्हणजे तब्बल बारा तास. मला सांगा, तिरुपतीच्या दर्शनाला येणाऱ्या सर्वसामान्य भाविकांचा वेगळा तेलंगण आणि संयुक्त आंध्र प्रदेश यांच्याशी दुरान्वये तरी संबंध आहे का? पण त्या सामान्य भक्तांना विनाकारण त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागतो. सीमांध्र इतक्या सगळ्या आंदोलकांसमोर आपण बोलून किंवा त्यांना समजावूनही काही फायदा नसतो.

तेव्हा सरकारनंही कायदे करताना ते लवकरात लवकर कसे संमत होतील, याचा विचार केला पाहिजे. कारण कायदे होतात, मात्र, ते होत असताना सामान्यांना त्याचा फटका बसतो. शिवाय ज्यांचा त्या प्रदेशाशी किंवा घटनेशी सूतराम संबंध नाही, त्यांना उगाचच त्रास. म्हणजे सरकार कायदे करण्याचे वायदे करतं आणि फायदे मात्र, ही असली इरादे नेक नसलेली दलाल मंडळी उकळतात.

अनेकदा लोकांना वाटतं, की हे खासदार आहेत. त्यांना काहीच त्रास नाही. फक्त गाडीत बसायचं आणि फिरायचं. पण दिसतं तसं नसतं. खासदार असलो तरीही सामान्य नागरिकांप्रमाणे आम्हालाही कधीकधी खूप त्रास सहन करावा लागतो. तेलंगणच्या निमित्तानं हे सहज आठवलं म्हणून आपल्याशी शेअर केलं.

जय महाराष्ट्र, अखंड महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्र  

Advertisements