प्रोफेशनल नेत्याची अविस्मरणीय भेट

एखाद्या कॉर्पोरेट कंपनीला लाजवेल, असं प्रोफेशनल व्यवस्थापन पण तरीही अत्यंत आस्थेनं आणि जिव्हाळ्यानं विचारपूस करण्याची वृत्ती, प्रचंड व्यापात असूनही ज्या व्यक्तीला भेटायचंय, त्याबद्दलची बारकाईनं मिळविलेली माहिती आणि समोरच्या व्यक्तीची काय मतं आहेत, हे कायम जाणून घेण्याची उत्सुकता… हे वर्णन आहे, पहिल्याच भेटीत समोरच्याला जिंकून घेण्याची क्षमता असलेले गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं. त्यांच्या केवळ वागण्या-बोलण्यातच नाही, तर व्यक्तिमत्त्वात आणि कार्यशैलीतही जादू आहे, हे मला अगदी प्रकर्षानं जाणवलं.

भारतीय जनता पक्षाने त्यांना पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार जाहीर केल्यापासून मला मोदी यांची भेट घेण्याची इच्छा होती. वाणी, विचार, व्हिजन आणि व्यक्तिमत्व अशा सर्वच गोष्टींमुळे सारा देश त्यांच्याकडे आकृष्ट होतो आहे. अशा व्यक्तिमत्त्वाला आपणही भेटावं, असं खूप दिवसांपासून मनात होतं. मध्यंतरी भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील उपनेते श्री. गोपीनाथ मुंडे आणि राज्यसभेतील खासदार प्रकाश जावडेकर यांना मोदी यांची भेट घेण्याची इच्छा असल्याचं सांगितलं होतं. मला नरेंद्र मोदींना भेटण्याची इच्छा असल्याचा निरोप त्यांनी संबंधित कार्यालयाकडे दिला होता. पण तेव्हा तो विषय तेवढ्यावरच थांबला.

DSC_6616 copy

मग अचानक एकदिवशी मला नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातून फोन आला. दिवस होता वीस जानेवारी. मला दोन दिवसांनी म्हणजे २२ जानेवारी रोजी मोदी यांनी भेटीसाठी वेळ दिल्याचा निरोप सांगण्यासाठी तो फोन होता. खरं तर मोदींची भेट मिळणार ही माझ्यासाठी नव्या वर्षाची विशेष ‘भेट’च होती. बावीस जानेवारीला दुपारी साडेबारा वाजता मोदी यांच्या गांधीनगर येथील कार्यालयात मोदींना मी भेटणार होतो. भेटीच्या आदल्या दिवशी म्हणजे २१ जानेवारी रोजी मला मोदी यांच्या ‘ओएसडी’चा (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) फोन आला. तुम्ही उद्या भेटायला येणार आहात का, हे विचारायला. माझा होकार आहे, हे कळल्यानंतर त्यांनी सांगितलं, की पंधरा मिनिटं आधीच या. शिवाय तुमची राहण्याची किंवा गाडीचा व्यवस्था करायची आहे का, असंही विचारलं. अर्थात, गांधीनगरमध्ये माझ्या कंपनीचं ऑफिस आणि राहण्याची व्यवस्था असल्यानं मी त्याला नम्रपणे नकार दिला.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी बरोब्बर सव्वाबारा वाजता मोदी यांच्या कार्यालयात पोहोचलो. मंत्रालय कॉम्प्लेक्सपासून त्यांच्या ऑफिसपर्यंत मला विशेष ‘एस्कॉर्ट’ पुरविण्यात आला होता. ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर चहा, पाणी वगैरे झालं. त्यांचे ‘ओएसडी’, सेक्रेटरी आणि पीए अशा सर्वांशी माझी ओळख करुन देण्यात आली. थोडं ब्रिफिंग झालं. काय पाहिजे वगैरेची विचारपूस केली. बरोब्बर साडेबारा वाजता त्यांनी बेल वाजवून मला आत पाठविण्याचा निरोप धाडला.

गंमत पहा, भारताचा भावी पंतप्रधान असलेला माणूस पण त्याचं नियोजन इतकं पक्क होतं की विचारता सोय नाही. वेळापत्रक प्रचंड व्यस्त असलेला माणूस असूनही त्यांनी साडेबाराची वेळ खास माझ्यासाठी राखून ठेवली होती. त्या ऑफिसमध्ये तेव्हा फक्त मी एकटाच होतो. नाहीतर इतर मंत्री, मुख्यमंत्री यांनी भेटायला वेळ दिली, की शेकडो कार्यकर्ते तिथं असतात. कुठलेकुठले अधिकारी असतात, कामं घेऊन आलेले लोक असतात, सचिव आणि इतर मंडळी असतात. मंत्री, मुख्यमंत्री ऑफिसमधून बाहेर आला, की सगळेच त्याला भेटायला तुटून पडतात. त्या सगळ्यांच्या गराड्यातच मंत्री किंवा मुख्यमंत्री तुम्हाला भेटतात आणि घाई गडबडीत भेट उरकून निघून जातात. ना त्यांना नीट काही समजतं, ना आपलं समाधान होतं.

मोदी भेटीबाबतीतही तसंच होईल का, अशी चिंता मला सतावत होती. पण मी निश्चितपणे येणार आहे, म्हटल्यानंतर मोदींनी ती वेळ खास माझ्यासाठीच राखून ठेवली होती. त्यावेळी दुसऱ्या कोणालाही त्यांनी भेटायला बोलविलं नव्हतं. फक्त मी आणि तेच. त्यांचा हा वक्तशीरपणा आणि प्रोफेशनलिझम मला प्रचंड आवडला. ऑफिसमधील प्रत्येकाच्या बॉली लँग्वेजमध्ये प्रोफेशनलपणा ठासून भरल्याचं जाणवत होतं. प्रोफेशनलपणा असला तरीही कोरडेपणा नव्हता. त्याचंही कौतुक वाटलं.

DSC_6620 copy

आता गेल्यानंतर माझं मराठीमधून त्यांनी स्वागत केलं. म्हणाले, ‘या… या… शिवाजीराव या. कसे आहात. काय चाललंय.’ पुण्याचं राजकारण काय म्हणतंय, पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीला दणका बसेल का, महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे, शिरूर लोकसभा मतदारासंघातील राजकारण कसंय… अशा विविध विषयांवर चर्चा होत गेली. गेल्यावेळी शिरूरमधून शरद पवार तुमच्या विरोधात उभे राहणार होते. पण त्यांनी रिस्क न घेता माढ्याकडे मोर्चा वळविला. यंदा तुमच्याविरोधात कोण आहे, गेल्या वेळी पावणेदोन लाखांचं लीड घेऊन तुम्ही जिंकून आला होता, यंदा किती लीड असणार वगैरे सर्व गोष्टींची माहिती त्यांच्याकडे होती. त्याबद्दल अधिक माहिती ते माझ्याकडून जाणून घेत होते.

मग आमच्यासाठी चहा आला. आम्ही दोघांनी मस्त चहा घेतला. देशात सर्वाधिक औद्योगिकीकरण असलेला मतदारसंघ शिरूर आहे, हे त्यांना माहिती होतं. औद्योगिक आघाडीवर महाराष्ट्रात सध्या काय परिस्थिती आहे, मतदारसंघातील औद्योगिक क्षेत्राच्या अडचणी काय आहेत, यावर आमची चर्चा झाली. त्यासाठी तुमच्या डोक्यात काय उपाययोजना आहेत, अशी मला विचारणाही केली. शिरूर मतदारसंघात अनेक धरणं बांधली गेली आहेत. पण धरणग्रस्तांचा प्रश्न प्रलंबित आहे. त्या समस्या सोडविण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू आणि मार्ग काढू, असं सांगितलं. शिरूर मतदारसंघात दोन ते तीन लाख आदिवासी नागरिक आहेत. त्यांच्यासाठीही आपण काही ना काही विशेष योजना राबवू. तुम्हीही तुमच्या कल्पना मला सांगा. त्यांचाही अंतर्भाव आपण त्यामध्ये करू, असं आवर्जून सांगितलं.

मला माझ्या कार्य अहवालासाठी मोदी यांचं शुभेच्छापत्र हवं होतं. तेही त्यांनी मला त्याच दिवशी तातडीनं मिळेल, अशी व्यवस्था केली. पीएला ते तयार करण्यास सांगितलं. दुपारी जेवायला घरी या आणि तेव्हाच शुभेच्छापत्र घेऊन जा, असं आग्रहाचं निमंत्रणही दिलं. त्या निमित्तानं घर पाहणं होईल, असंही म्हणाले. मी म्हटलं, जेवण नको. मी ऑफिसला जाऊन येतो फक्त शुभेच्छापत्र न्यायला. तसं पहायला गेलं तर मोदी आणि माझी भेट फक्त दहा मिनिटांसाठी ठरली होती. पण आम्ही जवळपास अर्धातास गप्पा मारत होतो. शुभेच्छापत्र घेण्यासाठी मग मी संध्याकाळी त्यांच्या घरी गेलो. तेव्हाही तिथं पंधरा-वीस मिनिटं आमची ‘टी विथ नरेंद्र मोदी’ अशी खास छोटेखानी मैफल जमली. वाफाळता चहा घेताघेता पुन्हा गप्पा रंगल्या.

शिरूर मतदारसंघात सभा घेण्यासंदर्भातही आमची चर्चा झाली. ‘तुम्ही आतापर्यंत मुंबई-पुण्यातच जाहीर सभा घेतल्या आहेत. आमच्या मतदारसंघात ग्रामीण भागातील नागरिकांशी संवाद साधायला या तुम्ही. तुम्हाला ऐकण्याची, पाहण्याची खूप उत्सुकता आहे,’ असं आग्रहाचं निमंत्रण मी त्यांना दिलं. त्यांनी देखील पीएला बोलवून तातडीनं त्याची नोंद डायरीत करायला सांगितली. इतर नेत्यांशी चर्चा करून मी नक्की तुमच्या मतदारसंघात सभा घेतो, असं आश्वासन मला दिलं.

मी पहिल्यांदा प्रोफेशनल राजकारणी माणसाला भेटतो आहे, असं मला वाटलं. अनेक मंत्री नि मुख्यमंत्र्यांना भेटलोय. पण असा अनुभव कुठेच आला नव्हता. असा अत्यंत प्रोफेशनल, वक्तशीर आणि बारीकसारीक माहिती जाणून असलेला माणूस जर देशाचा पंतप्रधान झाला, तर देशात नक्कीच खूप चांगले बदल होतील, असा विश्वास मला मोदी यांना भेटून वाटला. शिवाय मोदी यांना भेटल्यानंतर प्रत्येक जण का भारावून जातो, याचं उत्तरही मला मोदी यांच्या भेटीमुळं मिळालं.

नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी हार्दिक शुभेच्छा…

Advertisements

अजित पवार तेव्हा कुठे होता तुम्ही?

मराठीमध्ये एक म्हण आहे, ‘आपण मारणाऱ्याचा हात पकडू शकतो. पण बोलणाऱ्याचं तोंड नाही पकडू शकत.’ आता एकदम मला या म्हणीची आठवण झाली. ‘खोटं बोल पण रेटून बोल’ अशा प्रवृत्तीच्या लोकांना काय बोलायचं तेच मला कळत नाही. अशाच प्रवृत्तीचे एक महाशय म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार. त्यांच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करण्यासाठीच मी हा ब्लॉग लिहितोय.

बरीच धापवळ आणि शोधाशोध केल्यानंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार सापडला आणि त्याची जाहीर घोषणा उपमुख्यमंत्री महाशयांनी केली. तेव्हा त्यांना अचानक बैलगाडा शर्यती आणि बैलगाडा मालक वगैरे गोष्टींची आठवण झाली. बैलगाडा शर्यती भविष्यात थांबवायच्या नसतील, तर बैलगाडा मालक असलेल्या  उमेदवारालाच निवडून द्या, अशी सूचनावजा दमच त्यांनी शेतकऱ्यांना भरला. अहो, अजित पवार जनाची नाही, पण मनाची तरी थोडी बाळगा… 

0021

नेमका निवडणुकीच्या तोंडावरच तुम्हाला शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा बैलगाडा शर्यतींचा विषय आठवतो का? मतांवर डोळा ठेवून किती घाणेरडं राजकारण कराल. बैलगाडा शर्यतींविरोधात २००५ पासून रण पेटले होते. कोर्टकचेऱ्या चालू होत्या, बंदी उठवण्यासाठी मागणी होत होती आणि अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिला जात होता, तेव्हा तुम्ही कुठे गायब झाला होतात. अहो, इतकंच काय, दोनवेळा तुमच्याच राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी सरकारने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. सरकारने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातलीच, शिवाय प्रत्यक्ष कायदेशीर मार्गांनी लढा देण्याची वेळ आली, तेव्हा सरकारने पळ देखील काढला.

दादा तुम्हाला आठवणार नाहीच. पण मला चांगलं आठवतंय. पहिल्यांदा २००५ मध्ये बंदी आली होती. तेव्हा तुम्ही कुठे दडून बसला होता आम्हाला माहिती नाही. बैलगाडा शर्यतबंदी विरोधात मंचरमध्ये आंदोलन झालं. आणि तुमच्या पोलिसांनी बैलगाडा मालकांना गुराढोरा सारख मारलं आणि माझ्यासह ५८ निरपराध शेतकऱ्यांवर कलम ३०७चे खटले दाखल केले. पण मी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन समर्थपणे लढा दिला होता आणि शेतकऱ्यांची बाजू मांडली होती. तुम्ही, तुमचे कार्यकर्ते, तुमचा पक्ष आणि तुमचे आताचे उमेदवार तेव्हा कुठे गायब झाला होता. तुमचे कार्यकर्ते फक्त कोर्टातील विजयाचा जल्लोष साजरा करताना पुढे पुढे मिरवित होते. अजित पवार हेच का तुमचे बैलगाडा शर्यतींचे प्रेम आणि जिव्हाळा.

1913388_775197562510164_984222003_o

जेव्हा २००५ मध्ये बैलगाडा शर्यतींवर बंदी आली होती, तेव्हा मंचरमध्ये दंगल उसळली होती. शेतकऱ्यांनी या अन्यायकारक बंदीविरोधात जाब विचारला होता. तेव्हा माझ्यासह ५८ जणांवर केसेस दाखल केल्या होत्या. जेव्हा कोर्टाने बैलगाडा शर्यतींच्या बाजूने निकाल दिला तेव्हा महाराष्ट्राचे तोंडपाटील गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी घोषणा केली, की सर्वच्या सर्व ५८ जणांच्या  विरोधातील खटले मागे घेतले जातील. नऊ वर्षे झाली आज त्या घटनेला. पण अजून एकाही शेतकऱ्याविरुद्धचा खटला मागे घेण्यात आलेला नाही. उलट आता सर्वांना पोलिस खात्याने अटक वॉरंट धाडले आहे. नेमके निवडणुकीच्या तोंडावर ही अटक वॉरंट धाडण्याचे कारण काय? तुम्ही शेतकऱ्यांना गर्भित इशारा देताय का, की राष्ट्रवादीला मतदान केले नाही, तर तुम्हाला तुरुंगात डांबू? मतांसाठी शेतकऱ्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा नवा व्यवसाय सुरू केलाय का राष्ट्रवादी काँग्रेसनं. खबरदार जर माझ्या शेतकऱ्याला हात लावाल तर.

अजित पवार तुम्हाला शिरूर लोकसभा मतदारसंघातील तसेच जुन्नर, आंबेगाव, खेड परिसरातील तुमच्याच पक्षाच्या काही शेतकरी आणि बैलगाडा मालकांनी घेतलेली ती भेट आठवतेय का बरं? तुम्हाला नाहीच आठवणार म्हणा. पण मला चांगली आठवतेय. त्यावेळी परिसरातील अनेक गावांमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, शेतकरी आणि बैलगाडा मालक तुमच्याकडे आले होते. ‘दादा, काहीतरी करा. बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठविण्यासाठी…’ अशी गळ घालत होते. पण तेव्हा तुम्ही त्यांची बाजू ऐकून घेतली नाहीच. पण त्यांना कोणतीही मदत न करता हाकलवून लावलं. शिवाय त्यांनाच चार खडे बोल सुनाविले. ‘शर्यतींचा नाद कसला करता. बैलगाडा शर्यती काही चांगल्या नाहीत. तुम्हाला हे नसते धंदे करायला कुणी सांगितले. चालते व्हा आणि पुन्हा असल्या मागण्या घेऊन माझ्याकडे यायचं नाही,’ असा दम भरून राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांना तुम्ही हुसकावून काढले होते. बघा जरा आठवतोय का तो प्रसंग…

अजित पवार तुमच्यासारखा दुटप्पी आणि दुतोंडी माणूस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शोधून सापडायचा नाही. आधी शेतकऱ्यांना आणि बैलगाडा मालकांना हाकलवून लावले. त्यांचा अपमान केला. त्यांना चालते व्हा म्हणालात. आणि आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा पुळका आलाय का तुम्हाला. ज्यांना तुम्ही ‘चालते व्हा’ म्हणालात ती मंडळी आणि ते बैलगाडा मालक, शेतकरी तुम्हाला ‘चालते व्हा’ म्हटल्याशिवाय राहणार नाहीत. मतदारराजा हा आंधळा, बहिरा आणि मुका नाही. तो हुशार आहे. त्याला माहितीये आपला कोण आणि परका कोण? वेळप्रसंगी मदतीला धावून येणारा कोण आणि निवडणुकीच्या तोंडावर फक्त गोडगोड बोलणारा कोण हे मतदाराला चांगलं ठावूक आहे. त्यामुळं तुम्ही बैलगाडा शर्यती आणि बैलगाडा मालकांबद्दलचं खोटं प्रेम व्यक्त करून मतांवर डोळा ठेवू नका. तुमच्या पदरी निराशाच येणार आहे.

तेलंगण आंदोलनाचा त्रास नि मनस्ताप

तेलंगणमधील मतांवर डोळा असलेल्या काँग्रेसला दहा वर्षांपूर्वीचे आश्वासन पूर्ण करण्याची फार घाई झाली होती. त्यामुळे दूरचित्रवाहिन्यांचे प्रक्षेपण बंद करून, सुरक्षारक्षकांच्या कडेकोट बंदोबस्तात आणि बंद दरवाज्याच्या आतमध्ये तेलंगण हे नवे राज्य जन्माला घालण्याची प्रक्रिया काँग्रेसने पार पाडली. लोकशाहीचा गळा घोटला आणि संसदीय परंपरेला काळिमा फासली. इतके सारे नाटक करून वेगळ्या तेलंगणची निर्मिती करून काँग्रेसने काय साध्य केले. मुळात वैयक्तिक माझा आणि शिवसेना पक्षाचा तेलंगणच्या निर्मितीला विरोधच होत आणि यापुढेही राहील. अशा प्रकारे राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून भावाभावांमध्ये भांडणे लावण्याची आवश्यकताच काय? त्यामुळेच संयुक्त आंध्र प्रदेशच्या बाजूने आम्ही आहोत.

Tirupati-Balaji-temple

तेलंगणचा विषय निघाला म्हणून सहज आठवलं. तेलंगण आणि सीमांध्र यांच्या आंदोलनांचा फटका सर्वसामान्य नागरिकांना कसा बसतो, याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतलाय. घेतलाय म्हणजे काय अगदी चांगला लक्षात सुद्धा राहिलाय. असेल साधारण सहा-आठ महिन्यांपूर्वीची घटना. वेगळ्या तेलंगणच्या आंदोलनाने तेव्हापासूनच अधिक जोर धरलाय. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सीमांध्रमधील नागरिकही रस्त्यावर उतरले आणि त्यांनीही संयुक्त आंध्र प्रदेशसाठी जोरदार आंदोलन छेडले. या आंदोलनांचा फटका तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांना कसा बसतो, हे मी प्रत्यक्ष अनुभवलंय.

सहाएक महिन्यांपूर्वी मी तिरुपतीला गेलो होतो. दर्शनासाठी. अगदी व्यवस्थित दर्शन करून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी निघून दुपारपर्यंत बेंगळुरूला पोहोचणार होतो. चित्तूर-पालमनेर-मुलबागल या मार्गाने आम्ही जाणार होतो. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळपासून नेमका सीमांध्रातील नागरिकांनी रास्ता रोको पुकारला होता. तरीही आम्ही सकाळी पाचच्या सुमारास निघालो. तिरुपती रोडवरून हायवेवर आल्यानंतर आम्हाला आंदोलनाचा अंदाज हळूहळू येऊ लागला. जागोजागी रास्ता रोको सुरू होते. सकाळची वेळ असल्यामुळं अजून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या नव्हत्या. पण तरीही रांगा लागायला सुरूवात झाली होती.

Tirupati Balaji Photo

पहिल्या रास्ता रोकोच्या ठिकाणी आम्हाला अडविलं. मला चांगलं आठवतंय, पालमनेर नावाचं गाव होतं ते. थोडा वेळ थांबल्यानंतर एक रुग्णवाहिका तिथं आली. आंदोलकांनी रुग्णवाहिकेला सोडलं. आमच्या ड्रायव्हरनं शिताफीनं त्यामागून गाडी घुसविली आणि पहिल्या रास्ता रोकोचा अडथळा आम्ही पार केला. मात्र, वीस-पंचवीस किलोमीटर गेल्यानंतर पुन्हा एकदा नव्या रास्ता रोकोला आम्हाला सामोरे जावे लागले.  झालं, इथंच दोन-तीन तास काढावे लागणार, अशा विचारात आम्ही सर्व होतो. तेवढ्यात पाच-दहा मिनिटांनी आठ-दहा तरुण बाईकवरुन तिथं आले. त्यांनी आम्हाला विचारलं, की गावागावांतून तुम्हाला पुढच्या रस्त्यापर्यंत नेतो, आम्हाला चारशे रुपये द्या. सुरुवातीला मला हे थोडं ऑड वाढलं. मी पुण्याजवळील शिरुरचा खासदार आहे, असं सांगूनही त्यांच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. पैसे हवेच अशी त्यांची भूमिका होती.

शेवटी काय आम्हालाली लवकर बेंगळुरूला पोहोचायचं होतं. त्यामुळं आम्ही तरुणांची ऑफर स्वीकारली. फक्त आम्ही एकटेच नाही, तर आणखी तीन-चार वाहनचालकांनाही त्यांनी पटविलं होतं. चारशे रुपये त्यांच्या हातावर टेकविले. मग त्या तरुणांनी आम्हाला गाडी वळवून घ्यायला लावली आणि थोडं मागं जाऊन एका फाट्यावरून आमच्या गाड्या आत वळल्या. अगदी छोट्या छोट्या खेड्यातून, पाड्यांमधून आमच्या गाड्या जात होता. रस्ते अगदी छोटे छोटे. खडबडीत आणि ओबडधोबड. साधारण तास दीडतास प्रवास केल्यानंतर मग त्यांनी आम्हाला पुढच्या रस्त्यावर नेऊन सोडलं.

Tirupati- Map

त्या रस्त्यावरून थोडा प्रवास करुन पुढं गेल्यानंतर पुढचा रास्ता रोको होताच. तिथंही बाईकवाल्या तरुणांचं तसंच टोळकं हजरच होतं. आम्ही त्या तरुणांच्या पाठीमागून आलोय, हे पाहिल्यानंतर जे समजायचं होतं, ते त्यांना समजलं. मग त्यांनी पुन्हा आम्हाला पुढचा रस्ता दाखवायची ऑफर दिली आणि आमच्याकडून आधीच्याच रेटप्रमाणे चारशे रुपये घेतले. सीमांध्रचे आंदोलन म्हणजे त्या तरुणांचा धंदाच झाला होता. कदाचित आंदोलकांपैकीच काही तरुण हे तोडपाणी करीत असावेत. कोणास ठाऊक. पुन्हा तशाच आडवाटा, छोटीछोटी गावं, धुरळा उडणारा बारीकसा रस्ता आणि निष्कारण वाया जाणारा वेळ. तासाभरानंतर मग आम्हाला मोठा रस्ता मिळाला. नंतर थोड्यावेळानं पुन्हा त्याच नाटकाचा तिसरा खेळ झाला आणि शेवटी आम्ही कर्नाटक बॉर्डरजवळ येऊन पोहोचलो. मग तिथून पुढं आम्हाला कोणताही त्रास झाला नाही.

सकाळी पाचाला निघालेलो आम्ही एरव्ही पाच तासात सहजपणे बेंगळुरूला पोहोचलो असतो. म्हणजे सकाळी दहा अकराच्या सुमारास. पण या सीमांध्र आंदोलनाच्या गडबडीत आमचा हाकनाक वेळ गेला. संध्याकाळचे पाच वाजले आम्हाला पोहोचायला. म्हणजे तब्बल बारा तास. मला सांगा, तिरुपतीच्या दर्शनाला येणाऱ्या सर्वसामान्य भाविकांचा वेगळा तेलंगण आणि संयुक्त आंध्र प्रदेश यांच्याशी दुरान्वये तरी संबंध आहे का? पण त्या सामान्य भक्तांना विनाकारण त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागतो. सीमांध्र इतक्या सगळ्या आंदोलकांसमोर आपण बोलून किंवा त्यांना समजावूनही काही फायदा नसतो.

तेव्हा सरकारनंही कायदे करताना ते लवकरात लवकर कसे संमत होतील, याचा विचार केला पाहिजे. कारण कायदे होतात, मात्र, ते होत असताना सामान्यांना त्याचा फटका बसतो. शिवाय ज्यांचा त्या प्रदेशाशी किंवा घटनेशी सूतराम संबंध नाही, त्यांना उगाचच त्रास. म्हणजे सरकार कायदे करण्याचे वायदे करतं आणि फायदे मात्र, ही असली इरादे नेक नसलेली दलाल मंडळी उकळतात.

अनेकदा लोकांना वाटतं, की हे खासदार आहेत. त्यांना काहीच त्रास नाही. फक्त गाडीत बसायचं आणि फिरायचं. पण दिसतं तसं नसतं. खासदार असलो तरीही सामान्य नागरिकांप्रमाणे आम्हालाही कधीकधी खूप त्रास सहन करावा लागतो. तेलंगणच्या निमित्तानं हे सहज आठवलं म्हणून आपल्याशी शेअर केलं.

जय महाराष्ट्र, अखंड महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्र  

भिर्रर्रर्र ऽऽऽ उचल की टाक…

ब्लॉग या नव्या माध्यमाच्या विश्वात पहिलं पाऊल टाकताना आपल्या परंपरेचा आणि संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या बैलगाडा शर्यतीच्या विषयाशिवाय आणखी कोणता विषय समर्पक असू शकतो, असं आपलं मला सहज वाटलं. आम्हाला नव्याच्यी कास धरायची आहे. अगदी जरुर धरायची आहे. मात्र, हे करताना आम्ही आमची संस्कृती आणि प्रथापरंपरांना फाटा देऊ शकत नाही, हेच माझं म्हणणं आहे. त्यामुळंच माझा पहिला ब्लॉग हा माझ्या लाडक्या सर्जा-राजासाठी…

Image

बरोब्बर एक वर्ष पूर्ण झालं बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठून आणि पुन्हा सुरू होऊन. राज्य सरकारनं ऑगस्ट २०११ मध्ये सर्क्युलर काढून बैलगाडा शर्यतींवरील बंदी म्हणजे कोणताही सारासार विचार न करता घेतलेला मोगलाई निर्णय होता. नंतर हायकोर्टातही ही बंदी काय राहिली. मात्र, उत्साही गावकऱ्यांनी बैलगाडा शर्यती आयोजित करण्याचे सुरूच ठेवले. त्यामुळे गावागावांमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास प्रारंभ केला. सर्वसामान्य शेतकरी त्यामुळं नाडला गेला. शेतकऱ्यांचे तारणहार आम्हीच आहोत, अशा पद्धतीनं भाषणे ठोकायची. मात्र, त्याच शेतकऱ्याला कसा त्रास होईल, यासाठी सर्क्युलर काढायचे. व्वा.. रे काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार.

काय झालं या बंदीमुळं. शेतकऱ्याचा आनंद हिरावून घेण्याचे पाप काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या माथी लागले. मुळात अशी बंदी घालण्याची काही आवश्यकताच नव्हती. कारण कोणत्याही शेतकऱ्याचं उदाहरण घ्या, तो स्वतःपेक्षा त्याच्याकडील पशुधन अधिक प्रेमाने जपतो. त्यांची स्वतःच्या जिवापेक्षा अधिक काळजी घेतो. वेळप्रसंगी तो स्वतः उपाशी राहिल, पण आपल्या गायी-बैलांना चारा दिल्याशिवाय त्याला चैन पडणार नाही. पोटच्या पोरासारखा तो जनावरांना जपत असतो. त्यामुळं बैलगाडा शर्यतींमुळं बैल जोड्यांवर अन्याय, अत्याचार होईल, ही धारणाच चुकीची आहे.

पण ‘व्हाइटकॉलर’ म्हणजेच पांढरपेशा मंडळींच्या दबावाला राज्य सरकार बळी पडले. शेतकऱ्यांच्या आनंदावर, त्याच्या मनोरंजनावरच बंदी आली. मग गावोगावच्या यात्रा ओस पडू लागल्या. यात्रेमुळे पोट भरणारे वाजंत्रीवाले, छोटे-मोठे व्यावसायिक आणि जत्रेत सहभागी होणारे विक्रेते यांचा रोजगारच बुडाला. पण आम आदमीच्या सोबत आमचा हात आहे, अशा गप्पा ठोकणाऱ्यांनी त्यांच्याच पोटावर पाय आणला होता.

पांढरपेशा समाजाचा हा हल्ला परतवून लावण्यासाठी आम्ही लढा उभारला. नाही, ही बंदी आम्ही खपवून घेणार नाही. आपण सर्वांनी एकत्र येऊन ही लढाई लढू, असे सर्वांनी ठरविले. कधी रास्ता रोको केला. झोपी गेलेल्या राज्य सरकारकडे बैलगाडा मालकांचे गाऱ्हाणे मांडले. त्यांना खडबडून जागे करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला. बैलगाडा मालक आणि शिवसेना पक्षाच्या वतीने मी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.  बैलगाडा मालक रामकृष्ण टाकळकर होते, आबा शेवाळे होते, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर इथले बैलगाडा मालक होते. आम्ही सर्वांनी एकत्र येऊन बैलगाडा मालकांची बाजू सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली.

आम्ही आमच्या पोरांपेक्षा अधिक प्रेम हे गायीबैलांवर करतो, हे सर्वोच्च न्यायलयाच्या न्यायाधीशांनी पटवून दिलं. शेवटी त्यांनाही आमचे म्हणणे पटले आणि सर्वोच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारी २०१३ रोजी बैलगाडा शर्यतींवरील बंदी मागे घेतली. शेतकरी बैलांची खूप काळजी घेतात आणि त्यांचे हाल करीत नाही, हे न्यायमूर्तींना पटले. आमच्या लढ्याला निर्भेळ यश आल्यामुळं मला वैयक्तिकपणे खूप आनंद झाला. माझ्या बळीराजासाठी मी काही करु शकलो, अशी भावना खूप सुखावह होती. अखेर सर्वोच्च न्यायालयानंच परवानगी दिल्यामुळं पुन्हा एकदा गावागावांमधून भिर्रर्रर्रर्रर्रर्र… चा आवाज घुमू लागला आणि बैलगाडा शर्यती भरू लागल्या.

(वृत्त आणि व्हिडिओ पाहाः http://bharat4india.com/mediaitem/1466-top-news)

माघी पौर्णिमेच्या निमित्तानं गावागावांना भेटी देत फिरत होतो. तेव्हाही बैलगाडा शर्यतींमुळं बळीराजाच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य पाहून माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. बैलगाडा शर्यतींमुळं गावांचं हरवलेलं गावपण पुन्हा एकदा मिळालं. गावात चैतन्य आलं. उत्साह आला. जल्लोष आला. सारे श्रेय बैलगाडा मालकांनी संघटितपणे उभारलेल्या लढ्याचे होते. मी फक्त निमित्त मात्र. त्यांच्यासोबत होतो इतकंच. पण आमच्या यशाचे श्रेय लाटण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण शेतकरी राजा सूज्ञ आहे. त्याला आपले कोण आणि परके कोण हे चांगल्या पद्धतीनं समजतं. त्यामुळंच अशा श्रेय लाटणाऱ्यांबद्दल शब्द वाया न घालविलेलेच बरे.

मुळात मला अनेकदा वाटतं, की ही पांढरपेशी मंडळी फक्त बैलगाडा शर्यतींनाच का टार्गेट करतात. म्हणजे बैलगाडा शर्यती या देशभरात भरविल्या जातात. किला रायपूरच्या ग्रामीण ऑलिंपिकमध्ये बैलगाडा शर्यतींचे आयोजन होते. तमिळनाडूत पोंगलच्या सणानिमित्त ‘जालिकट्टू’चे आयोजन होत असते. कर्नाटकातही बैलगाडा शर्यतींची लोकप्रियता प्रचंड आहे. इतकेच काय तर आपला शेजारी असलेल्या बांग्लादेशामध्येही बैलगाडा शर्यतींना तुफान प्रतिसाद मिळतो. इतक्या सर्वदूर जर बैलगाडा शर्यतींना प्रतिसाद मिळत असेल तर या पांढरपेशा मंडळींच्या डोळ्यात का खुपते देव जाणे.

एकीकडे बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्याची मागणी ही मंडळी करतात. पण दुसरीकडे अश्वशर्यतींवर हीच मंडळी पैसै लावतात. घोड्यांच्या शर्यतींमुळे त्यांचे हाल होत नाहीत का. पोलोसारखा किंवा इक्वेस्ट्रियन या खेळांमध्ये घोड्यांचा वापर केला जातो. त्या खेळांवर बंदी आणावी, म्हणून कोणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. मग सामान्य शेतकऱ्याला आनंद मिळवून देणाऱ्या बैलगाडा शर्यतीच टार्गेट का.

त्यांना कोणी वाली नाही, अशी तुमची समजूत असेल तर तुम्ही गैरसमजुतीत आहात. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाजूने मी कायमच उभा होतो, आहे आणि राहीन. मग ते बैलगाडा शर्यतींचे आंदोलन असो किंवा शेतकऱ्यांना भेडसावणारी कोणतीही समस्या असो. शिवाजीराव आढळराव पाटील कायम त्यांच्या सोबत असेल. फक्त पाठिशी थांबणार नाही. तर त्यांच्यासोबत रस्त्यावरही उतरेन.

येळकोट येळकोट… जय मल्हार…

दिसामाजी काहीतरी ते लिहावे…

नमस्कार…

जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या आणि सर्वत्र गुण्यागोविंदानं नांदणाऱ्या सर्व मराठी भाषक बंधू-भगिनींना माझा सप्रेम दंडवत…

खूप दिवसांपासून लिहीन लिहीन असं मनात होतं. पण त्याला मुहूर्त सापडत नव्हता.अनेकदा छोट्या छोट्या गोष्टी असतात किंवा काही महत्त्वाच्या घडामोडी असतात. त्या तुमच्याशी ‘शेअर’ कराव्याशा वाटतात. वृत्तपत्रांमधून या ना त्या निमित्तानं आपली भेट होत असते. पण त्यालाही मर्यादा पडतात. त्यामुळंच एका वेगळ्या माध्यमातून तुमच्याशी बोलावं, असं अनेक दिवस मनात घोळत होतं. अखेरीस आता त्याला मूर्त रुप आलंय.निरनिराळ्या व्यापातून अखेर वेळ काढला असून यापुढेही नियमितणे वेळ काढणार आणि लिहित राहणार,हे पक्क ठरवलंय. आणि हो, ‘ब्लॉग’साठी निमित्त निवडणुकीचं असलं तरीही प्रचारासाठीब्लॉग लेखन नाही. राजकारण असेलही पण चवीपुरतं.

Image

मग तुम्ही म्हणाल, राजकारणी माणूस राजकारणावर लिहिणार नाही, मग हा ब्लॉग आहे कशासाठी? या ब्लॉगमध्येराजकारणावर लेखन असेल. पण फक्त चवीपुरतं.उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं जगभर प्रवास करताना अनेक गमतीदार गोष्टी समजतात. ‍वेगळीच माहिती पुढं येते. राजकारणात आल्यापास्नं अनेक वेगवेगळेअनुभव मिळतात. गावातनं फिरत असताना एखादी मायमाऊली ‘शिवाजी, लय मोठा झालास रं तू. असाच आणखी मोठा हो,’ असं म्हणत आशीर्वाद देऊन टाकते. तरुण मंडळी भेटतात आणि ‘दादा, तुमचा अभिमान वाटतो. आम्हालाही तुमच्यासारखं करियर करायचंय,’ असं सांगतात. असं काही ऐकतो, तेव्हा मलाही थोडंसं भरून येतं आणि स्वतःवरील जबाबदारीची जाणीव होते. संसदेत नुकत्याच घडलेल्या रणकंदनानंतर प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून तातडीनं ‘रिअॅक्ट’ व्हावंसं वाटतं. क्वचित कधीतरी जुन्या आठवणींचा कप्पा अलगद उघडावासा वाटतो. मन मोकळं करावंसं वाटतं. हे सगळं करण्यासाठी हा ब्लॉग असेल.

गंमत पहा. परिस्थिती कशी बदलत जाते. पूर्वी नुसतं साक्षर असून भागायचं. नंतरच्या काळात संगणक साक्षरता आवश्यक भासू लागली. आताच्या जमान्यातफक्त संगणक साक्षर असून उपयोग नाही. ‘सोशल नेटवर्किंग’वर तुमचा वावर असणं अत्यावश्यक भासू लागलंय.कारण एका ‘क्लिक’च्या जोरावर जगभरात पसरलेल्या कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचणं, हे सोशल मिडियामुळंच शक्य झालंय. अगदी आपल्या लांडेवाडीपासून ते ब्रिटनमधील लंडनपर्यंत आणि शिक्रापूरपासून ते अमेरिकेतल्या शिकागोपर्यंत एकाचवेळी अनेकांशी पोहोचणं सहज शक्य आहे. हा सोशल मिडियाचा आणखी एक फायदा. तुमच्या माझ्यात संवाद आहेच. गाठीभेटीही नियमितपणे होतच असतात. दौरेही असतातच. मात्र, हा संवाद आणखी सहज, सोपा आणि नियमितपणे व्हावा, यासाठीच ‘ब्लॉग’ या माध्यमाचा उपयोग करण्याचं निश्चित केलंय.

Image

मुळात संगणक आणि तंत्रज्ञान या गोष्टी मला नवीन नाहीत. त्यांची भीती वगैरे तर कधीच वाटली नाही.इतर मंडळी त्यापासून चार हात दूर राहण्याचा प्रयत्न करीत होती, तेव्हापासून मी संगणकाशी दोस्ती केलीय. १९८२ साली जेव्हा ‘डायनॉलॉग’ सुरू केली तेव्हापासून इन्फॉर्मेशन-टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर या गोष्टींशी माझा संबंध आहे. अनेकदा इंजीनिअर मंडळींना देखील मी वेगळ्या पद्धतीनं ‘सर्किट डिझाईन’ करण्याबाबत सुचवायचो. त्यामुळं माझी आणि टेक्नॉलॉजीची गट्टी खूप आधीपासनं जमलीय. ट्वीटर आणि फेसबुकवरही अनेक वर्षांपासून सक्रिय आहे.‘शिवाजीराव आढळराव पाटील’ फेसबुक पेजला ७० हजारांच्या आसपास चाहत्यांनी ‘लाईक’ केलंय. ‘ब्लॉग’च्या निमित्तानं पुन्हा एकदा माझे नि टेक्नॉलॉजीचे सूर जुळून येणार आहेत.

‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे…’ असे समर्थ रामदास यांनी म्हटले आहे.तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी ‘लिहिता होणार’ आहे आणि नियमित लिहिता राहणार आहे. तेव्हा भेटतच राहू.

जय हिंदुस्थान, जय महाराष्ट्र