निवडणुकीच्या तोंडावर नेतेमंडळी बैलगाड्यावर

दहा-दहा वर्षे गायब असलेले नेते झळकले फ्लेक्सवर

IMG_1894

लोकसभा निवडणूक जवळ आली, की सगळेच जण निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी आसुसलेले असतात. कोणी दहा-बारा वर्ष गायब असतात आणि एकदम फ्लेक्सवर अवतरतात. तर कुणी अगदी निवडणुकीच्या तोंडावर शत्रूला जाऊन मिळतो आणि राजकीय रंगमंचावर अवतरतो. चार साडेचार वर्षे हे सर्व झोपलेले असतात आणि निवडणुकीच्या मोसमात समोर येतात. बेडकं परवडली किमान दरवर्षी पावसाळ्यात तरी दर्शन देतात. पण हे राकारणी फक्त निवडणूक ते निवडणूकच दिसतात. अशी ही निवडणुकीची गंमत आहे.

अनेकांना खासदार व्हायचे डोहाळे लागले आहेत. दहा-पंधरा वर्ष गायब असलेली मंडळी मला प्रश्न विचारत आहेत, की मी गेली पंधरा वर्ष काय केलं. मी काय केलं हे जनलेताल ठाऊकच आहे. पण तुमचं काय? तुम्ही लोकांसाठी काय केलं ते तरी कळू द्या लोकांना. लेकांनो, तुम्ही जर गेली पंधरा वर्षे राजकारणात सक्रिय असता, तर हा प्रश्न विचारायची वेळच आली नसती. फक्त डोळे उघडे ठेवले असते तरी तुम्हाला समजलं असतं.

जो उठतो तो मला प्रश्न विचारतोय. याचं काय केलं, त्याचं काय झालं. रेल्वे कधी सुरू होणार. बैलगाडा शर्यती कधी चालू होणार वगैरे वगैरे. सगळे प्रश्न मलाच. अर्थात, एक बरंय. शेवटी वर्गातही शिक्षक हुशार विद्यार्थ्याला किंवा जो उत्तर देऊ शकतो त्यालाच प्रश्न विचारतात. जो अभ्यासू आहे, ज्याचं वर्गात लक्ष आहे, तोच प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकेल, अशी खात्री शिक्षकांना असते. कदाचित माझ्याबाबतीतही तसंच असावं. सर्व समस्या सोडविण्यासाठी किंवा सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठी शिवाजीराव आढळराव-पाटील हा एकमेव माणूसच योग्य आहे, असं लोकांना वाटत असावं. म्हणूनच ते माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती करत असावेत. विचारा हो कितीही प्रश्न… राजकीय हेतूने कितीही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करा. पण मी जनता जनार्दनाची मनःपूर्वक सेवा केली आहे. त्यामुळे सर्व प्रश्नांची उत्तर द्यायला मी तयार आहे. आतापर्यंत वेळोवेळी दिलेलीही आहेत आणि या पुढेही देईन. अर्थातच, मतदारराजाला.

निवडणूक जवळ आली, की सर्व जण तलवारी परजून तयार असतात. सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे बैलगाडा शर्यती… हे असंय, की स्वतः काहीच करायचं नाही आणि जो प्रयत्न करतोय त्याला सारखं प्रश्न विचारून भंडावून सोडायचं. बरं गंमत बघा विधानसभा निवडणुकीच्या वेळी किंवा जिल्हा परिषद अथवा ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी बैलगाडा शर्यतींचा मुद्दा कधीच चर्चेत येत नाही. लोकसभा निवडणूक आली, बरोबर की वातावरण तापवायला सुरुवात होते. मला अडचणीत आणण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू होतात. विशिष्ट मंडळी खासदारांनी काय केलं, खासदारांनी काय केलं म्हणून हाकाटी पिटू लागतात. खरंतर बैलगाडा शर्यतीसाठी मी केलेल्या प्रयत्नांवर एक पुस्तक तयार होईल. इतके प्रयत्न मी केलेत. अनेकदा भाषणांमधून बोललो आहे. मुलाखतींमध्ये उत्तरं दिली आहेत. ब्लॉगही लिहिले आहेत. पण एकतो आणि वाचतो कोण? फक्त प्रश्न विचारण्यातच लोकांना रस.

बैलगाडा शर्यतींसंदर्भात लोकसभेत केलेले भाषण ऐकण्यासाठी या लिंकवर क्लिक करा…

खरं तर मी सन २००२ पासून बैलगाडा शर्यतींसाठी लढा देतोय. त्यामुळे बैल, बैलगाडा आणिबैलगाडा शर्यती हा विषय कायमच माझ्यासाठी जिव्हाळ्याचा राहिलेला आहे. वास्तविक बैलगाडा मालकांच्या पाठीशी मी कायमच ठामपणे उभा राहिल्याने बैलगाडा शर्यतींचा विषय जिवंत राहीलाय. नाही तर या मंडळींनी तो कधीच निकालात काढला असता. लवकरच पाच न्यायमूर्तींच्या पूर्ण खंडपिठासमोर (फुल बेंच) ही सुनावणी होणार असून, यामध्ये तामिळनाडूतील जलिकट्टू, कर्नाटकातील कंबाळा आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती असे सगळेच एकत्रित प्रश्न या खंडपिठापुढे येणार आहेत. बैलगाडा शर्यती किंवा प्राण्यांचे साहसी क्रीडा प्रकार हा कोर्टासाठी जिव्हाळ्याचा किंवा अग्रक्रमाचा विषय नाही. त्यामुळे जेव्हा सवड असेल, तेव्हाच त्यावर सुनावणी होईल, असं कोर्टानं म्हटलंय. अर्थात, जेव्हा केव्हा सुनावणी होईल तेव्हा निकाल बैलगाडा शर्यतींच्याच बाजूने लागेल, असा मला विश्वास आहे.

001 Bailgada_PM Letter002 Bailgada_PM Letter

003_reply PM

बैलांसाठी सर्वप्रथम काढली विमा संघटना

बैलगाडा शर्यतीत बैलांच्या पायाला इजा, पाय मोडणे, शिंग मोडणे, बैल कायमचाच निकामी होणे असे प्रकार मी पाहिल्यावर महाराष्ट्रात पहिल्यांदा बैलगाडा विमा संघटना मी काढली. बैलगाडा मालकांकडून आम्ही फक्त शंभर रुपये ते पाचशे रुपये जमा करायचो आणि बैलाच्या इजा आ बैल निकामी झाल्यास त्याच्या मालकाला ४० ते ५० हजार रुपये आम्ही द्यायचो. यासाठी खुप वेळा मी खिशातूनच हे पैसे भरले हे सांगायलाही आजही अभिमान वाटतोय.

शर्यतीच्या घाटांसाठी खासदार निधी

पहिल्यांदा २००४ मध्ये मी खासदार झाल्यावर बैलगाडा घाटांसाठी खासदार निधी देणारा मी पहिला खासदार देशात ठरलोय. या निमित्ताने जुन्नर, खेड, शिरुर, आंबेगाव, भोसरी मतदार संघातील अनेक बैलगाडा घाटांच्या उभारणीत माझ्या योगाने होणा-या खासदार निधीचे योगदान संपूर्ण मतदारसंघ, मतदार आणि बैलगाड्यांचे मालक, बैलगाडा शर्यतींचे चाहते विसरलेले नाहीत.

बैलगाडा शर्यती बंद पाडण्याचे पाप काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची अवकृपा झाली अन राज्यात पहिल्यांदा सन २००५ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ता काळात बैलगाडा शर्यती बंद पडल्या. याबाबत मी न्यायालयात गेलो आणि शर्यती पुन्हा २००६ मध्ये सुरू झाल्या. पुढे पाच वर्षे या शर्यती २०११ पर्यंत निर्विघ्नपणे सुरू  होत्या. मात्र सन २०११ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमधील पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांनी एक अध्यादेश जारी करुन त्यात वाघ, सिंह, अस्वल, माकड आणि बैल यांचे प्रशिक्षण आणि प्रदर्शन यावर बंदी घातली आणि बैलगाडा शर्यती बंद झाल्या.

Dada arrest

आंदोलनाचे सर्वाधिक गुन्हे माझ्यावरच दाखल

बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात  म्हणून सन २००५ पासूनच्या प्रत्येक वेळीच्या आंदोलनात मी पुढे होतो आणि आहे देखील. या पुढेही मीच यामध्ये अग्रभागी राहणार हे लिहून ठेवा. बैलगाडा मालक माझ्याच नेतृत्वाखाली संघटित झाले. बंदी उठावी यासाठी कायदेशीर लढाई उभाण्यात मीच पुढाकार घेतला. बैलगाडा शर्यतीसंदर्भात आंदोलन छेडल्यामुळेच मी खासदार झालो, असा अनेकांचा गैरसमज. म्हणून ते देखील शर्यतींचे निमित्त करून झळकू लागले. कायद्याची भाषा अवगत नाही, कायदा समजत नाही, कायदा पाळण्यासाठी आणि लढण्यासाठी हे असतो हे अनेकांच्या गावीही नाही. मग काय लढणार ही मंडळी… फक्त सोशल मीडियावर झळकण्यासाठी आंदलनांचा फार्स करणार.

Bailgada dabhade dada copy

बैलगाड्यांसाठी मतभेदांना तिलांजली

मी बैलगाड्यासाठी काय करु शकतो याचा अनुभव सहा महिन्यांपूर्वी चाकणमध्ये दाखवून दिला. माझे राजकीय कट्टर विरोधक दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते यांच्यासह सर्वपक्षीय नेते-कार्यकर्त्यांना मी हाक दिली आणि एकाच व्यासपीठावर मी बैलगाडा शर्यतीं सुरू करण्याबाबतच्या लढाईचे रणशिंग फुंकले. पण लोक राजकीय मतभेद बाजूला ठेवून फक्त बैलगाडा शर्यतींसाठी एकत्र येऊ शकले नाहीत. दिलीप मोहिते वगळता कोणत्याही नेत्याने या व्यासपीठावर येण्याचे धाडस दाखविले नाही. राज्यव्यापी आंदोलनात दिलीप वळसे-पाटील, विलास लांडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा इतर कोणताही मोठा नेता फिरकलाही नाही. आज मला प्रश्न विचारणारे लोक तेव्हा कुठे होते हा संशोधनाचाच विषय आहे.

Bail Gada SharyatBail Gada Sharyat 01

IMG-20150805-WA0014 (1)

बैलगाड्यांचा मुद्दा पहिल्यांदा लोकसभेत मांडला

लोकसभेत महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात असे ठणकावून सांगणारा पहिला खासदार मी आहे आणि याचा मला अभिमान आहे. पंत्रप्रधान नरेंद्र मोदींना भेटून बैलगाडा शर्यतींबाबत लोकसभेत निर्णय घ्या, असे सांगणारा देशातील पहिला खासदारही मीच आहे. शिवनेरीच्या छत्रछायेखाली जन्माला येवून राजा शिवछत्रपतींच्या नावाने जगताना सामान्य शेतक-याच्या जिव्हाळ्याच्या बैलगाडा शर्यतींसाठी कुणालाही नडायची ताकद ही फक्त माझ्यातच आहे हे मी वेळोवेळी दाखवून दिलेय. तामिळनाडूतील जलिकट्टूसाठी कमल हसन सह सर्व अभिनेते रस्त्यावर उतरतात आणि सरकारला तात्पूरता अध्यादेश काढून त्या चालू कराव्या लागतात हे तामिळनाडूचे वैभव. मात्र आपल्याकडे फक्त खासदार शिवाजीराव आढळराव यांनीच काय ते लढायचे आणि बैलगाडाशर्यती सुरू होण्याचे संकेत दिसू लागले की, सोशल मिडीयासह प्रत्येक ठिकाणी चमकायचे हे आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे.

म्हणून माझे एकच सांगणे आहे की, राजकारण हा काही माझा धंदा नाही अन मला त्यातून काहीच कमवायचे नाही हे मी माझ्या तीन पंचवार्षिकमध्ये दाखवून दिले आहे. मात्र पहिल्या टर्मपासून बैलगाडा शर्यतींबाबतची लढाई मी एकट्याने सुरू केली त्यात कुणी तरी तात्पूरते येवून गेले आणि जात आहेत. मात्र बैलगाडा शर्यती सुरू होणे हे माझ्या बैलगाडा शौकीनांसाठी आणि बैलगाडा मालकांसाठी माझे स्वप्न असून ते मी पूर्ण करणारच आणि सर्वोच्च न्यायालय, लोकसभा आणि रस्त्यावरील लढाई मी जिंकणारच हे मी आवर्जून सांगतो. सुप्रीम कोर्टातील फुलबेंच समोर बैलगाडा शर्यतींसंदर्भात सुनावणी झाल्यानंतर निकाल आपल्याच बाजूने लागणार आणि पुन्हा एकदा बैलगाडा शर्यती सुरू होणार हा मला विश्वास आहे. कारण प्रत्येक टप्प्यावर कायदेशीर बाजू सक्षम ठेवण्याचे काम मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी केलेले आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.

जय महाराष्ट्र!!!

बैलगाडा शर्यतींसंदर्भातील जुने ब्लॉग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

ही लढाई माझी आणि माझीच… लढणार आणि जिंकणारही मीच…

अजित पवार तेव्हा कुठे होता तुम्ही?

भिर्रर्रर्र ऽऽऽ उचल की टाक…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s