
जून सुरू झालाय आणि जुलै येवू घातलाय आणि याच काळात सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठीची निर्णायक सुनावणीही होतेय. मात्र बैलगाडा शर्यतींचा विषय आलाय आणि मी बोलण्याआधी राजकारणातील कुणी बोललेय असे कधीच संपूर्ण पुणे जिल्ह्यात आणि अर्थातच महाराष्ट्रातही झालेले नाही. पर्यायाने एकीकडे जून-जुलैमधल्या पावसाळ्यातील ’कुत्र्यांच्या-छत्र्या’ उगवायला सुरुवात होईल आणि त्याच पध्दतीने याच काळात मी बोललोय म्हटल्यावर अनेक नाटकी बैलगाडाप्रेमी नेते-कार्यकर्ते मंडळीही बोलू लागतील हे माझ्यासाठी नेहमीचे चित्र.
खरं तर मी सन २००२ पासून बैलगाडा शर्यतींसाठी लढा देतोय. त्यामुळे बैल, बैलगाडा आणि बैलगाडा-शर्यती हा विषय नेहमीच माझ्यासाठी जणू श्वासच झालाय. अनेकांना असंच वाटतं आलंय की, मी बैलगाडा शर्यतींचा मुद्दा लावून धरलाय म्हणूनच खासदार झालोय आणि मग तेही असंच काहीसं करु लागतात. वास्तविक बैलगाडा मालकांच्या पाठीशी मी कित्येक वर्षे कायमच ठामपणे उभा राहिल्याने बैलगाडा शर्यतींचा विषय जिवंत राहिलाय. अन्यथा राजकरणातील काही तथाकथित नेते मंडळींनी बैलगाडा शर्यतींचा विषय कधीच ‘निकालात’ काढला असता. येत्या महिनाभरात सर्वोच्च न्यायलायात पाच न्यायमुर्तींच्या पूर्ण खंडपीठासमोर (फुल बेंच) निर्णायक सुनावणी होतेय. यात तामिळनाडूतील जलिकट्टू, कर्नाटकातील कंबाळा आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती असे सगळेच एकत्रित प्रश्न या खंडपिठापुढे सुनावणीसाठी येणार आहेत. अर्थात याच अनुषंगाने बैलगाडा शर्यती आणि त्या चालू-बंद होण्याच्या इतिहासात डोकवावं आणि आजच्या पिढीला हा इतिहास अवगत व्हावा म्हणून हे वास्तव मांडतोय.

महाराष्ट्रात बैलगाडा विमा संघटना काढणारा पहिला खासदार मीच
बैलगाडा शर्यती हे महाराष्ट्राचं आणि त्यातल्या त्यात माझ्या शिरुर लोकसभा मतदार संघाचं एक सोहळ्याचं रुप. याच सोहळ्याला आपल्यातीलच काही नतद्र्ष्टांची नजर लागली ती सन २००४-०५ च्या दरम्यान. खरं तर सन २००३-०४ चा काळ आठवा. त्याकाळी बैलगाडा शर्यतींबाबत कोण गंभीर होतं तर कुणीच नाही. माजी खासदार दिवंगत किसनराव बाणखेले यांना बैलगाडा शर्यतींमध्ये रस होता. त्यांच्यानंतर या विषयात स्वारस्य दाखवून माझा ’अजेंडा’ समजून मी काम केले. बैलगाडा शर्यतींबरोबरच बैलगाडा मालक आणि शौकिनांच्या प्रत्येक प्रश्नावरही मी काम केले आणि या प्रश्नी सातत्यही ठेवले. खरं तर बैलगाडा शर्यतीत बैलांच्या पायाला इजा, पाय मोडणे, शिंग मोडणे, बैल कायमचाच निकामी होणे असे प्रकार मी अनेक स्पर्धांमध्ये पाहिल्यावर महाराष्ट्रात पहिल्यांदा ‘बैलगाडा विमा संघटना’ मी काढली. बैलगाडा मालकांकडून आम्ही फक्त शंभर रुपये ते पाचशे रुपये जमा करायचो आणि बैलाच्या इजा उपचाराबरोबरच बैल निकामी झाल्यास त्याच्या मालकाला ४० ते ५० हजार रुपये आम्ही द्यायचो. यासाठी खूप वेळा मी खिशातूनच हे पैसे भरले हे सांगायला मला आजही अभिमान वाटतोय. अर्थात अशा काही अफलातून कल्पनांमुळे बैलगाडा शर्यतींची लोकप्रियता अगदी जगात प्रसिध्द झालेल्या ‘पुणे-फेस्टीवल’ पर्यंत पोहचली आणि त्याचे निमित्त आपली एक पिढी आहे याचा मला अभिमान वाटतो.


बैलगाडा शर्यतींच्या घाटाला खासदार निधी देणारा देशातील पहिला खासदारही मीच
सन २००४ मध्ये मी पहिल्यांदा खासदार झाल्यावर ’बैलगाडा घाटांसाठी खासदार निधी’ देणारा मी पहिला खासदार देशात ठरलोय. या निमित्ताने जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरुर-हवेली मतदार संघातील अनेक बैलगाडा घाटांच्या उभारणीत माझ्या योगाने होणा-या खासदार निधीचे योगदान संपूर्ण मतदार संघ विसरलेला नाही. अशाच पध्दतीने बैलगाडा शर्यती ज्या पुणे जिल्ह्यात कधीकाळी एकदम भन्नाट-सुसाट अशा सुरू होत्या त्याच वेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची अवकृपा झाली अन राज्यात पहिल्यांदा सन २००५ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ता काळात बैलगाडा शर्यती बंद पडल्या. याबाबत मी न्यायालयात गेलो अन शर्यती पुन्हा सन २००६ मध्ये सुरू झाल्या. पुढे पाच वर्षे या शर्यती २०११ पर्यंत अगदी निर्विघ्नपणे सुरू होत्या. मात्र सन २०११ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमधील तत्कालीन पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांनी एक अध्यादेश जारी करुन त्यात वाघ, सिंह, अस्वल, माकड आणि बैल यांचे प्रशिक्षण आणि प्रदर्शन यावर बंदी घातली आणि आपल्या बैलगाडा शर्यती बंद झाल्या.
अर्थात त्याच वेळी मी लगेच सर्वोच्च न्यायालयात पदरमोड करुन धाव घेतली आणि नामवंत वकिलांची फौज उभी केली. याचा परिणाम असा झाला की, संपूर्ण राज्यभरात फेब्रुवारी-२०१२ मध्ये बैलगाडा शर्यती पुन्हा जोमात सुरू झाल्या. मात्र आडकाठी आणणार नाही ते कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकार कसले हो..? मग पुन्हा एकदा तत्कालीन सरकारकडून आडकाठी आली आणि शर्यती बंद झाल्या. खरं तर बैल हा वरील रानटी प्राण्यांच्या गटात न मोडणारा आणि तुमच्या आमच्या घरातील एक कुटुंबसदस्य असणारा प्राणी. तर इतर प्राणी हे जंगली आहेत हे मी संसदेसह न्यायालयात सिध्द करण्यासाठी कायमच भांडत राहिलो. अर्थात केवळ बैलाला त्या जंगली प्राण्यांच्या यादीतून वगळले तरी आपल्या बैलगाडा शर्यती सुरू होणे शक्य आहे. मात्र संसद, सर्वोच्च न्यायालय आणि अगदी राजकीय व्यवस्था अशा सर्व स्तरावर आर्थिक ताकदीसह लढलो पण तोकडे यश आले आणि ७ मे २०१४ रोजी पुन्हा एकदा याच नियमाद्वारे बैलगाडा शर्यतींवर बंदी लादण्यात आली, तीच आजही कायम आहे.

बैलगाडा शर्यतींवर सन २००५ पासून आंदोलने करुन गुन्हे दाखल होणारा एकमेव नेता मीच
बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात म्हणून सन २००५ पासूनच्या प्रत्येक वेळीच्या आंदोलनात मी पुढे होतो आणी आहेही. बैलगाडा मालक माझ्याच नेतृत्वाखाली संघटीत झालेत. बंदी उठावी यासाठी कायदेशीर लढाई उभाण्यात मीच पुढाकार घेतला आणि रस्त्यावरची आंदोलनेही केली. या आंदोलनांमध्ये बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी गुन्हा दाखल झालेला मी एकमेव नेता आहे हे सांगायला मला अभिमान वाटतो. बैलगाडा शर्यती हा जसा माझा ‘श्वास’ झाला तोच ‘श्वास’ अनेकांनाही आकर्षित करु लागला आणि बैलगाडा शर्यतीच्या विषयामुळेच आपण खासदार होवू शकतो असे उगाचच कुणालाही वाटू लागले. कायद्याची भाषा अवगत नाही, कायदा समजत नाही, कायदा पाळण्यासाठी आणि लढण्यासाठी असतो हे अनेकांच्या गावीही नाही. अशाच काही उत्साही मंडळींमुळे कायद्याचीच भाषा करणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच मुंबईत नरिमन पॉईंटवर केलेल्या एका बैलगाडा-स्टंटला सामोरे जावे लागण्याचा प्रसंग महाराष्ट्राने अनुभवलाय आणि तो क्षण शेतकरी, बैलगाडा शर्यतींशौकीनांसाठी तितकाच वाईटही ठरला.


बैलगाड्यांसाठी राजकीय जोडे बाजूला ठेवणाराही मीच
मी बैलगाड्यासाठी काय करु शकतो याचा अनुभव सहा महिन्यांपूर्वी चाकणमध्ये दाखवून दिला. माझे राजकीय कट्टर विरोधक दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते, महेश लांडगेंसह सर्वपक्षीय नेते-कार्यकर्त्यांना मी फक्त बैलगाडा शर्यती सुरू होण्याच्या एकाच अजेंड्यासाठी हाक दिली आणि याच व्यासपीठावर मी बैलगाडा शर्यती सुरू करण्याबाबतच्या एकत्रित लढाईचे रणशिंगही फुंकले. अर्थात बैलगाडा शर्यती सुरू करण्याच्या नावाखाली काही मंडळी उगाच संघटीत होण्याचे चित्र तयार करतात याचे दु:ख खुप वेदना देते हेही आवर्जून सांगावेसे वाटते. अर्थात कुणातरी नेत्याला खुष करण्यासाठी, त्याच्या इशा-यावर चालणारी काही मंडळी ही पावसाळ्यातील कुत्र्यांच्या छत्र्यांसारखेच असतात हे मी गेल्या काही वर्षांच्या अनुभवात जवळून पाहिलेले आहे. अर्थात बैलगाडा मालकांकडील वर्गणी, वकील-शिष्ठमंडळांच्या नावाखाली विमानांच्या दिल्ली फे-या, दिल्लीत कुणी तरी नेता पकडून त्याचेबरोबर केलेले फोटो सेशन असा सगळाच खेळ शेतक-यांच्या भावनांशी खेळला गेला आणि जातोय हे या मंडळींच्या गावीही नसते आणि नाही हे विशेष.

बैलगाड्यावर पहिल्यांदा लोकसभेत बोलणारा पहिला खासदारही मीच!
लोकसभेत महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात असे ठणकावून सांगणारा पहिला खासदार मी आहे आणि याचा मला अभिमान आहे. पंत्रप्रधान नरेंद्र् मोदींना भेटून बैलगाडा शर्यतींबाबत लोकसभेत निर्णय घ्या असे सांगणारा देशातील पहिला खासदारही मीच आहे. शिवजन्मभूमी ‘शिवनेरीच्या छत्रछायेखाली जन्माला येवून राजा शिवछत्रपतींच्या नावाने जगताना सामान्य शेतक-याच्या जिव्हाळ्याच्या बैलगाडा शर्यतींसाठी कुणालाही नडायची ताकद ही फक्त माझ्यातच आहे,’ हे मी वेळोवेळी दाखवून दिलेय. तामिळनाडूतील जलीकट्टूसाठी कमलहसन सह सर्व अभिनेते रस्त्यावर उतरतात आणि सरकारला तात्पूरता अध्यादेश काढून तिथे बैलगाडा शर्यती चालू कराव्या लागतात हे तामिळनाडूचे वैभव. मात्र आपल्याकडे फक्त खासदार शिवाजीराव आढळराव यांनीच काय ते लढायचे आणि बैलगाडा शर्यती सुरू होण्याचे संकेत दिसू लागले की, सोशल मिडीयासह प्रत्येक ठिकाणी या ‘संधीसाधू-उपटसुंभांनी’ चमकायचे हे आपल्या पुणे जिल्ह्यातील शेतक-यांचे खरोखरीच दुर्दैव म्हणावे लागेल.



आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागे म्हणाले होते की, बैलगाडा शर्यती सुरू करण्याबाबतचे विधेयक विधानसभेत आणू आणि कायदा करु. मात्र हे विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे जावून त्यावर सही होताच त्यावर अजय मराठे नामक व्यक्तिने आक्षेप घेतले आणि कायदा झाला पण ’नियमावली कुठेय?’ असे म्हणत पुन्हा बैलगाडा शर्यतींपुढे अडचण आली. यावर उच्च न्यायालयाने याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडे हे प्रकरण सोपवल्याबरोबरच न्यायालयाने पाच सदस्यांचे पूर्ण बेंच यासाठी नेमले आणि त्याचीच सुनावणी येत्या महिनाभरात होईल. अर्थात यासाठी राज्याच्या वतीने लढण्यासाठी राज्याच्या कायदा व विधी विभागाशी मी नुकताच बोललो असून दिल्लीत राज्याच्या वतीने बाजु मांडणारे जे वकील आहेत त्यांचेकडे बैलगाडा शर्यती सुरू होतील अशा पध्दतीचे सर्व पूरावे व बाजु मांडण्यासाठीचे दस्ताऐवज पोहच झाल्याची खात्रीही आपण करुन घेतलेली आहे.
पहा कशी थट्टा, बरी नव्हे ही थट्टा..!
भाजपा सरकारने प्राणी कल्याण मंडळाच्या (अॅनिमल वेलफेअर बोर्ड) अध्यक्षपदी खासदार पूनम महाजन-राव यांची नियुक्ती केलीय. अर्थात केंद्रातील एक मंत्री मनेका गांधी यांच्या सांगण्यावरुन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पूनम महाजन या सगळ्यांनी मिळून प्राणी कल्याण मंडळात ज्या जयसिन्हा यांची नियुक्ती केलीय ते जयसिन्हा म्हणजे ‘पेटा’चे (म्हणजेच बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी ज्या पेटा संघटनेचा तीव्र विरोध आहे त्यांचेच सदस्य असलेले हे गृहस्थ) सक्रीय सदस्य आहेत हे आपण सगळ्यांनी याचसाठी ध्यानी घ्यायला हवे. कारण या नियुक्तीने भाजपाच्या केंद्रापासून ते राज्यापर्यंतच्या सर्वच नेते-पदाधिका-यांची भूमिका किती (अ) प्रामाणिक आहे तेच लक्षात येतेय. मात्र बैलगाडा शर्यती-प्रेमी शेतक-यांची जयसिन्हांच्या नियुक्तीच्या निमित्ताने कशी थट्टा केली गेलीय ते आपण प्रत्येकासाठी लक्षवेधी आहे हे नक्की.
म्हणून शेवटी एकच सांगणे ते हे की, राजकारण हा काही माझा धंदा नाही अन मला त्यातून काहीच कमवायचेही नाही हे मी माझ्या तीन पंचवार्षिकमध्ये दाखवून दिलेय. मात्र माझ्या खासदारकीच्या अगदी पहिल्या टर्मपासून जी बैलगाडा शर्यतींबाबतची लढाई मी एकट्याने सुरू केली त्यात माझ्या सोबतीला आज पर्यंत कुणी सलगपणे टिकले असा एकही ‘हरीचा-लाल’ नाहीये. तरीही बैलगाडा शर्यती सुरू होणे आणि त्या चालू राहणे हे माझ्या बैलगाडा शौकीनांसाठी, सामान्य शेतक-यांसाठी आणि बैलगाडा मालकांसाठी माझे स्वप्न असून ते मी पूर्ण करणारच आणि सर्वोच्च न्यायालय, लोकसभा आणि रस्त्यावरील लढाई मी जिंकणारच हे मी पुन्हा एकदा आवर्जून सांगतो!
जय महाराष्ट्र!!!
खूप छान लिहिले आहे, आम्हा मुंबई मधल्या लोकांना गावी यात्रा म्हणजे बैलगाड्या हि एकच हौस असते. लवकरात लवकर चालू होईल हीच अपेक्षा.
शर्यत चालू करणार दादाच
Good morning
Very nice.
>
Dada shetkarichya samasyansathi ladha amhi tumcha sonar aahot .