अनुपम रम्य सोहळा…

मतदार भगिनी-बंधूंनो, नमस्कार…

आपणांस लक्ष लक्ष प्रणाम आणि कोटी कोटी धन्यवाद…

मतदारराजानं दाखविलेल्या दृढ विश्वासामुळं सलग तिसऱ्यांदा विजयाची माळ माझ्या गळ्यात पडली आहे. विजयी म्हणून नाव माझे असले, तरीही हा विजय तुमचा आहे. शिरूरमधील मतदारांचा आहे. माझ्या लाडक्या आणि मेहनती शिवसैनिकांचा आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आहे. हा विजय तुमचा माझा सगळ्यांचा आहे. तेव्हा आपल्या या दमदार आणि दणकेबाज विजयाबद्दल तुम्हालाही मनःपूर्वक शुभेच्छा… फेसबुक, ट्वीटर आणि वृत्तपत्रांमधून सर्वांचे आभार यापूर्वीच मानले होते. विजयोत्सवाचा जल्लोष आणि इतर गडबडींमधून थोडा वेळ मिळाल्यानंतर मग ब्लॉग लिहिवा, असा विचार केला आणि आज लिहायला घेतलं.

10308062_824191960944057_2797217580040961417_n

यंदाच्या निवडणुकीत धनुष्यबाणाला जवळपास साडेसहा लाख मतं मिळाली. गेल्या वेळी मला चार लाख ८२ हजार म्हणजे जवळपास पाच लाखांच्या आसपास मतं मिळाली होती आणि तुमचा दादा एक लाख ७९ हजार मतांनी निवडून आला होता. मात्र, यंदा आपण माझ्यावर व्यक्त केलेल्या प्रेमामुळं माझ्या मतांचा आकडा साडेसहा लाखांपर्यंत पोहोचला आणि जवळपास तीन लाख दोन हजार मतांच्या फरकानं आपला विजय साकारला. शिवसेनेच्या उमेदवारांपैकी सर्वाधिक मताधिक्यानं जिंकलेला उमेदवार शिरूरचा ठरला आहे. केवळ आणि केवळ आपल्यामुळेच हे शक्य झालंय.

आपण माझ्यावर जो विश्वास दाखविला त्याबद्दल माझे आपल्याला कोटी कोटी प्रणाम. फक्त धन्यवाद व्यक्त करून ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपल्या ऋणात राहूनच मतदारसंघाचा अधिकाधिक विकास करण्यासाठी कार्यरत राहीन, इतकेच आश्वासन आपल्याला मी या निमित्तानं देतो. आता केंद्रात आपले सरकार आहे. लवकरच राज्यातही महायुतीचेच सरकार येणार आहे. त्यामुळं शिरूर मतदारसंघाचा ‘सुपरफास्ट विकास’ होईल, हा माझा तुम्हाला शब्द आहे.

दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनचा विजय साकारणाऱ्या विस्टन चर्चिल यांच्या एका उद्गाराची मला आठवण झाल्यावाचून राहत नाही. ‘कोणत्याही परिस्थितीत विजय. कोणत्याही दहशतीची पर्वा न करता, लढा कितीही प्रदीर्घ असला तरीही आणि मार्ग कितीही खडतर असला तरीही विजय हवाच. कारण एकच विजयाशिवाय तरणोपाय नाही…’ आपल्या विजयाच्या बाबतीत चर्चिलचे हे उद्गार अत्यंत समर्पक आहेत.

10344345_825494007480519_8631895757535716209_o

राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आमदार, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी ठोकलेला तळ, साम दाम दंड आणि भेद अशा सर्व प्रकारांचा वापर करून विरोधकांनी लढविलेली निवडणूक, पोलिस आणि प्रशासनाच्या जोरावर गळचेपी करण्याचा केलेला प्रयत्न आणि बदनामी तसेच गैरलागू मुद्दे उपस्थित करून प्रचार भरकटविण्याचे षडयंत्र… राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जमेल ते करून पाहिले. मात्र, मतदारराजा कशालाही भुलला नाही. भरकटला नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचा ठाम निर्धार त्याने केला होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर त्याने पुन्हा एकदा सार्थ विश्वास व्यक्त केला.

तुमच्या लाडक्या दादाला सर्वच्या सर्व सहाही विधानसभा मतदारसंघांत घसघशीत आघाडी दिली आहे. विजयाचे मताधिक्य आणि सर्व विधानसभांमध्ये महायुतीला मिळालेली आघाडी पाहून राष्ट्रवादीच्या आमदारांचे धाबे दणाणले आहे. विधानसभेला अशीच परिस्थिती राहिली, तर आपले डिपॉझिट गुल होते, की काय अशा चिंतेत राष्ट्रवादीचे धुरीण चिंतन बैठका करीत आहेत. चालू दे त्यांचं…

फक्त शिरूरमध्येच नाही, तर पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रासह देशभरात भगव्या लाटेचे साम्राज्य पसरले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला मतदारांनी पसंती दर्शविली आहे. त्यांच्या गुजरात मॉडेलचे भरभरून समर्थन केले आहे. नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासियांना प्रचंड अपेक्षा आहेत. ते परिस्थिती सुधारू शकतील, असा विश्वास आहे.

विजयाची हॅट्ट्रिक आणि नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भव्यदिव्य विजयामुळे झालेल्या आनंदाचा कळसाध्याय म्हणजे संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मंगळवारी (वीस मे रोजी) पार पडलेला हृद्य सोहळा. संसदेमध्ये पहिलं पाऊल ठेवण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी टेकविलेला माथा, ‘भाजपा ही माझी आई आहे,’ हे सांगताना त्यांचा दाटून आलेला कंठ आणि हृदयाला हात घालणाऱ्या भाषणामुळं भाजपच्या अनेक नेत्या-कार्यकर्त्यांच्या डोळ्यात तरळलेले अश्रू… सर्व काही कल्पनेच्या पलिकडचे. सगळा कसा ‘अनुपम रम्य सोहळा’च जसा.

1402269_826532127376707_7443288013772275067_o

शिवसेनेसाठीही तो दिवस खूप संस्मरणीय होता. भावपूर्ण होता. आनंददायी होता. संसद आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकाविण्याचं स्वप्न हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलं होतं. संसदेवर भगवा फडकला आहे. बाळासाहेबांचे पहिलं स्वप्न साकार झालंय. आता त्यांचं आणखी एक स्वप्न पूर्ण करण्याची कामगिरी आपल्याला पार पाडायची आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेवर पुन्हा एकदा भगवा फडकावून महायुतीचे सरकार सत्तेवर आणायचं आहे. मला खात्री आहे, की उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली हा संकल्पही आपण निश्चितपणे सिद्धीस नेऊ.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सहकारी पक्षांनाही त्या दिवशी आवर्जून बोलविण्यात आलं होतं. जवळपास २९ पक्षांचे प्रतिनिधी तेव्हा उपस्थित होते. सरकार स्थापनेसाठीचा दावा करण्यासाठी नरेंद्रभाईंनी राष्ट्रपतींची भेट घेतली. ‘एनडीए’च्या घटक पक्षाच्या नेत्यांनाही बरोबर नेण्याची वेगळी प्रथा नरेंद्रभाईंनी यावेळी सुरू केली. आम्हाला त्याचं विशेष कौतुक आहे. भाजपच्या संसदीय नेतेपदी मोदींची निवड झाली. नंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांनीही नरेंद्रभाईंच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब केलं. भाजपनेही सर्व मित्रपक्षांना आश्वस्त केलं, की जरी भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता येणार असली तरीही मित्रपक्षांचा योग्य तो सन्मान राखला जाईलच. कधी खेळीमेळीच्या, कधी हास्यविनोदांच्या तर कधी भावपूर्ण वातावरणात बैठक पार पडली.

शिवसेना हा भारतीय जनता पक्षाचा सर्वाधिक जुना मित्रपक्ष आहे. यंदा तर शिवसेना हा १८ खासदारांसह सर्वाधिक मोठा मित्रपक्षही ठरला आहे. शिवसेनेचा वाघ देशातील सहाव्या क्रमांकावर राहिला आहे. शिवसेना कार्यप्रमुख मा. श्री उद्ध‍व ठाकरे यांनी घेतलेल्या कठोर मेहनतीचे आणि परिश्रमांचेच हे फळ आहे, असं मी मानतो. स्वतः उद्धवसाहेब, सौ. रश्मी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे यावेळी आवर्जून उपस्थित होते.

10358990_826532134043373_5936949364826863433_o

सेंट्रल हॉलमध्ये उद्धवसाहेबांनी मोजकंच पण मार्मिकपणे केलेलं भाषणही मला भावलं. हा सोहळा पाहताना, अनुभवताना माझाही ऊर अभिमानानं भरून आला. ‘आजच्या दिवशी मला बाळासाहेबांची राहून राहून आठवण येते,’ असं उद्ध‍वसाहेबांनी सांगितलं. खरं तर शिवसेनेच्या प्रत्येक खासदाराच्या आणि शिवसैनिकाच्या मनातली भावनाच उद्ध‍वसाहेबांनी बोलून दाखविली होती. इतक्या आनंदाच्या आणि जल्लोषाच्या प्रसंगी बाळासाहेबांची आठवण आली नाही, तर तो शिवसैनिक कसला. सगळा सोहळा कसा भावोत्कट बनला होता. आयुष्यात पुन्हा कधीही अनुभवता येणार नाही, अशा सोहळ्याचं साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं, हे मी माझं भाग्य समजतो.

आता उत्सुकता आहे नरेंद्र मोदींच्या राज्याभिषेक सोहळ्याची… आपण या आणि अशा अनेक संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार…

जयहिंद… जय महाराष्ट्र…

10 thoughts on “अनुपम रम्य सोहळा…

  1. Congratulations shri. Adhalrao Patil for the victory. We have voted for you with lots of faith that you would make Pune district a better place to live in.

  2. Sath vekasala mat danushybanala, dada tume Naigaon (tel=Haveli)cha road manjur kekl ahe lovekar holel hi apeksha.apanas mantepad melo hi apeksha.kup Aabar.

  3. नमस्कार साहेब ….
    खर तर आम्ही तुमचे आभार मानायास हवे ,कारण कि असा खासदार तुमच्या रूपाने मिळाले आहेत कि
    जणू विकास हा तुमच्या गळ्यातील ताईत बनला आहे ,,,आम्ही आमचे परम भाग्य समजतो दादा ,,,!!!
    एकच वादा आपले शिवाजीदादा ….!!! जय हिंद जय महाराष्ट्र ……!!!

  4. Dada aapan jinklat aaplyala Kharach manapasun hardik shubhechya. Aapan kay karave he sangne evdhi aamchi unchi nahi, pan ya sarv samanya Jantecha jo tumchyavar vishwas ahe tya vishwasala kadhihi tada jau deu naka. Punha ekda manapasun shubhechya

  5. Aadrniy dadasaheb janteni aaplyala,aani aaplya pakshala,v pakshpramukhanha dilela prachand vishwas sadev asas kaym raho hich sadev shivsainik ya natyani aaplya charni prarthana karto. JAY BHAVANI JAY SHIVAJI JAY MAHARASHTRA-**** Rajesh Aswar ,Nagpur

  6. dear Shivaji Rao,

    We are residents of Mundhwa Road hope you will give us a FLYOVER across GHORPADI by involving all agencies like PMC/Defence/Railways and who ever is involved and get us a flyover before this LokSabha is over.
    We are with You and wish to see our DREAM FLYOVER come true.
    Namo Namo…
    Warm Regards,

  7. dear Shivaji Rao,

    We wish to see the Ghorpadi Flyover soon before the term of this Loksabha ends.

Leave a comment