धन्यवाद… शतशः धन्यवाद…

धन्यवाद… त्रिवार धन्यवाद… शतशः धन्यवाद… गेल्या निवडणुकीच्या तुलनेत आपल्या शिरूर मतदारसंघात यंदा मतदान साडेआठ ते नऊ टक्क्यांनी वाढले. भारताचे भविष्य सुरक्षित आणि समर्थ हातांमध्ये सोपविण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बाहेर पडून भरभरून मतदान केले, याबद्दल सर्व मतदार बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार.

भारतीय लोकशाहीच्या अलिकडच्या इतिहासातील ‘आरपार’ची लढाई म्हणून चर्चेत असलेल्या लोकसभा निवडणुकीतील आपल्याकडील मतदानाचा टप्पा पार पडला. आता वेध लागलेत सोळा मे चे. गेल्या दहा वर्षांतील मतदारसंघातील कामाचा धडाका, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी देशात असलेली लाट आणि वाढलेला मतदानाचा टक्का हे सर्व संकेत एकाच गोष्टीचे निदर्शक आहेत. मतदारांचे प्रेम, शुभेच्छा नि आशीर्वाद, शिवसैनिकांनी अहोरात्र घेतलेली मेहनत तसेच सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा यांच्या जोरावर यंदाही शिवसेनाच बाजी मारणार आणि हॅट्ट्रिक साधणार, यामध्ये आता मला अजिबात शंका नाही.

10006357_805351042828149_4900195435141979680_n

गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून या ना त्या निमित्ताने सगळीकडे हिंडणं-फिरणं होतं. दहा वर्षांपूर्वी खासदार झाल्यापासून तर पायाला भिंगरी लागल्यासारखाच हिंडतोय. त्यामुळं निवडणुकीच्या निमित्तानं हिंडणं हा काही माझ्यासाठी तसं पहायला गेलं तर वेगळा अनुभव नव्हता. तरीही  निवडणुकी  निमित्तानं प्रचारासाठी महिना दीड महिन्याच्या कालावधीत मतदारसंघ उभा-आडवा पालथा घालणं हा वेगळाच अनुभव असतो. या निवडणुकीच्या निमित्तानंही असेच काही अनुभव आले. ते तुम्हाला जरूर सांगावेसे वाटले, म्हणूनच हा ब्लॉग लिहितोय…

यंदा उन्हाळा बराच लवकर सुरू झाल्याचं प्रचारादरम्यान फिरताना जाणवलं. उन्हाचा कडाका आणि उन्हामुळं होणारी काहिली ही गेल्या दोन निवडणुकीपेक्षा खूपच अधिक होती, हे प्रकर्षानं अनुभवलं. सकाळी सहा वाजता माझा दिवस सुरू व्हायचा आणि रात्री झोपायला कधी कधी रात्री दोन वाजायचे. चार तास झोप घेतल्यानंतर पुन्हा पुढच्या दिवशी प्रचारासाठी तयार व्हावं लागायचं. तालुकानिहाय प्रचार यंत्रणा राबविली. त्यानुसारच प्रचाराचं प्लॅनिंग केलं. अनेकदा रोज चाळीस-चाळीस गावांमध्ये प्रचारासाठी जाणं व्हायचं. खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचणं व्हायचं. तालुक्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या गावात गेल्यावर प्रचारसभा,मेळावे किंवा रोड शो व्हायचे. पण छोट्या गावांत गेल्यानंतर पायी फेरी मारायची, लोकांशी संवाद साधायचा आणि पुढं निघायचं, असं ठरलेलं असायचं.

मतदारसंघातील अगदी छोट्यातील छोट्या गावात, आदिवासी पाड्यात गेलो. कोणत्याही गावात गेलो, की मतदारांना भेटण्याची हक्काची जागा म्हणजे गावातलं मंदिर. मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आणि नंतर मग मंदिराच्या बाहेरच गावकऱ्यांशी संवाद साधायचा. गेल्या पाच वर्षांत गेलो नव्हतो, इतक्या मंदिरांमध्ये या दीड महिन्यात गेलोय. लोकांना पण बरं वाटायचं, आपला खासदार निवडणुकीच्या रणधुमाळीत वेळ काढून खास आपल्याला भेटायला आलाय याचं.

10256657_803992489630671_4767046410696233741_o

गावातल्या तरुणांना माझ्यासोबत फोटो काढायचा असायचा. फोटो काढून तो व्हॉट्सअप, फेसबुकवर टाकावयाचा असायचा. ‘अब ऑटोग्राफ का नाही फोटोग्राफ का जमाना है..,’ असं कुठल्याशा जाहिरातीत पाहिल्याचं आठवतंय. त्याचा अनुभव मला जागोजागी येत होता. प्रत्येकाकडून दादा घरी या, दादा घरी या, अशी विनंती व्हायची. प्रत्येकाच्या घरी जाणं काही व्हायचं नाही. पण निवडून आल्यावर नक्की  येणार, असं आश्वासन देऊ मग आम्ही पुढं निघायचो. ‘दादा आता जेवूनच जायचं, दादा चहा तरी घ्या किंवा थंडगार सरबत घ्या,’  असा आग्रह प्रत्येकाकडून व्हायचा. खरं तर सगळेच मला घरच्यासारखे. त्यामुळंच घरच्यांचा आग्रह मोडणं अशक्य असायचं. पण प्रत्येकाची समजूत घालून मग तिथून पुढं निघावं लागायचं. क्वचित कुठंतरी घोटभर चहा घे, कुठं थोडं सरबत पी, उसाचा रस घे असं करत आमचा प्रवास पुढं सुरू असायचा.

गावात गेल्यानंतर आमच्या अनेक भगिनी या शिवाजीदादाला ओवाळण्यासाठी थांबलेल्या असायच्या. पोहोचल्यानंतर पटकन ओवाळून घ्यायचं आणि मग पुढं जायचं, असं ठरलेलं असायचं. पण अनेकदा गडबडीत त्यांच्याकडून ओवाळल्यानंतर डोक्यात तांदुळांच्या ऐवजी साखर टाकली जायची आणि साखर भरवायच्या ऐवजी त्या तांदूळ भरवायच्या. अशी मजा मजा चालायची प्रचारादरम्यान. पण आपल्याला ओवाळण्यासाठी भर उन्हात कोणतरी थांबलंय, हे पाहूनच मला खूप बरं वाटायचं. असं प्रेम सगळ्याच राजकारण्यांना मिळतो, असं नाही.

10258615_804454106251176_7277278779762166207_o

आमच्या गावात पाच मिनिटं तरी बोललं पाहिजे हं,  असा सगळ्याच ठिकाणी आग्रह असायचा. मी पण मग गावकऱ्यांचा आग्रह मोडायचो नाही. ‘दिल्लीत जाण्यासाठी तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा हव्या आहेत. आशीर्वाद घ्यायला आलो आहे,’ असं काहीसं बोलून मग तिथून पुढं निघायचो. दोन मिनिटं बोललं तरी गावकऱ्यांना बरं वाटायचं. दहा वर्षांत केलेल्या कामांची आठवण मतदार स्वतःहून करून द्यायचं. दादा तुमच्यामुळं आमच्या गावात रस्ता आला. तुमच्यामुळं आमच्या नदीवर पूल बांधला गेला… असं बरंच काही.

अनेक ठिकाणी गेल्यानंतर लोकांनी वैयक्तिक कामांच्या आठवणींनाही उजाळा दिला. ‘दादा, तुम्हाला हॉस्पिटलचं बिल कमी करण्यासाठी फोन केला होता. तुम्ही त्यावेळी आमच्यासाठी हॉस्पिटलला फोन केला आणि आमचं बिल कमी झालं. आता आम्ही तुमची साथ सोडणार नाही,’ असं एखादा गावकरी म्हणायचा. कुणी म्हणायचं, दादा तुमच्या शिफारसीमुळं सरकारी रुग्णालयात आमचं ऑपरेशन अगदी सहज झालं वगैरे वगैरे. एका गावात गेल्यानंतर नऊ-दहा तरुण माझ्यापाशी आले आणि म्हणाले, की दादा, मागं आम्ही दिल्लीत अडकून पडलो होतो. तेव्हा आम्ही तुमच्या दिल्लीतील बंगल्यावर राहिलो होतो. तेव्हा तुम्ही आमच्या राहण्यासह इतर सगळी व्यवस्था खूप चांगली केली होती. ती गोष्ट आमच्या खूप लक्षात राहिली आहे. आमची मते तुम्हालाच… मी मतदार राजाकडे मत मागायला जातोय आणि मतदार मला स्वतःहून सांगतोय, की दादा यंदा आमचं मत तुम्हालाच. मला सांगा, कोणत्याही लोकप्रतिनिधीला यापेक्षा अधिक आनंदाची गोष्ट काय असू शकेल.

10012783_793480607348526_1180859552_o

मतदारांप्रमाणेच मला आभार मानायचे आहेत, ते माझ्या कार्यकर्त्यांचे, शिवसैनिकांचे. माझ्या गावातील कार्यकर्ते असो, मतदारसंघातील शिवसैनिक असो किंवा मुंबईहून वीस-पंचवीस दिवसांसाठी माझ्याबरोबर फिरणारे कार्यकर्ते असो. त्या सर्वांच्या जोरावरच आम्ही प्रचारयंत्रणा अत्यंत प्रभावीपणे राबवू शकलो. प्रचारात फिरताना अत्यंत अचूक प्लॅनिंग असो, पुढील व्यवस्था योग्य पद्धतीनं लागलेली आहे किंवा नाही हे तपासून पाहणं असो, गोळ्या-औषधं मी वेळेवर घेतोय की नाही यावर लक्ष ठेवणं असो… अशी अनेक छोटी-मोठी काम कार्यकर्त्यांनी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली, त्यामुळंच आम्ही मतदारसंघात सर्वदूर पोहोचू शकलो. आमचं नियोजन फारसं कधी चुकलं नाही. उशीर झालाच तर पंधरा-वीस मिनिटांचा. पण पोहोचायलाच दोन-तीन तास उशीर झाला, असं फारसं कधी घडलं नाही. ते याच अचूक आणि शिस्तबद्ध प्लॅनिंगमुळं.नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाचं नाव इथं घेणं शक्य नसलं तरीही मी त्यांचे योगदान जाणतो आणि मला त्या सर्वांच्या ऋणात राहणेच पसंत आहे.

माझ्या प्रचारासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांप्रमाणेच माझं बॅक ऑफिस सांभाळणाऱ्या मंडळींचाही मला इथं आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. आमचा बबलू काजळे असेल, दत्ता गांजाळे, सुजीत देशमुख, सुशांत जाधव, संतोष गावडे, नाना गांजाळे, सागर काजळे आणि प्रकाश थोरात ही मंडळी असतील किंवा प्रमोद सावंत असतील, या सात-आठ जणांवर मी माझं ऑफिस सोपवून निर्धास्तपणे प्रचारासाठी बाहेर पडायचो. माझ्याकडे काम घेऊन आलेल्या प्रत्येकाला समाधान मिळेल आणि त्याचं काम पूर्ण होईल, यासाठी ही मंडळी प्रयत्नशील असायची. कामासाठी आलेला माणूस रिकाम्या हातानं आणि हिरमुसल्या मनानं परत जाणार नाही, याची काळजी हे घेत असत. दौऱ्याच्या बातम्या वृत्तपत्रांपर्यंत पोहोचविणं, त्याचा फॉलोअप घेणं, निवडणूक आयोगाच्या संपर्कात राहणं, खर्चाचे हिशेब-परवानग्या आणि अशा असंख्य गोष्टींचा पाठपुरावा करणं अशी शेकडो कामं ही मंडळी निर्विघ्नपणे पार पाडत होती, म्हणूनच मला कशाचंही टेन्शन नव्हतं.

आणखी काही जणांना विसरून चालणार नाही. ते म्हणजे माझे कुटंबीय आणि नातेवाईक. ही मंडळी देखील माझ्या प्रचारात पहिल्यापासूनच हिरिरीने सहभागी झाली होतीच. पण गेली दहा वर्षे त्यांनी मला जे सांभाळून घेतलंय, त्याबद्दल मला त्यांचं कौतुक वाटतं. मतदारसंघात फिरताना कधीकधी घराकडं, संसाराकडं दुर्लक्ष होतं. पण त्यांनी त्याबद्दल कधीही तक्रार केली नाही किंवा चुकूनही एखादा शब्द देखील काढला नाही.

मतदारसंघातील मतदार, माझे शिवसैनिक, कुटुंबीय त्याचप्रमाणे माझ्या गावातील दीडशे ते दोनशे लोकं, विविध गावातील गावकरी, माझे नातेवाईक आणि खेड्यापाड्यातील सर्वसामान्य माणसं फक्त माझ्या प्रचारासाठी आणि विजयासाठी सतत एक महिना संपूर्ण मतदारसंघ फिरत होते. त्या सर्वांच्या जोरावरच माझी आजवरची वाटचाल सुरू होती आणि ही घोडदौड यापुढेही कायम राहील, असा मला विश्वास आहे.

पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे धन्यवाद. मनापासून धन्यवाद.

जय महाराष्ट्र…

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s