वाघ एकला राजा…

DSC_0002

मतदार बंधू-भगिनींनो नमस्कार…

भारतीय लोकशाहीमध्ये सर्वाधिक महत्त्व असलेला मतदानाचा दिवस जवळ येऊन ठेपलाय. त्या दिवशी योग्य माणूस निवडायला चुकलात, तर मग पुढील पाच वर्षे मनस्ताप करत बसण्यावाचून पर्याय नाही. त्यामुळेच सारासार विचार करून योग्य उमेदवारालाच मतदान करा आणि कोणत्याही प्रलोभनांना आणि धमक्यांना नि दबावाला बळी न पडता निर्भिडपणे मतदान करा.

निवडणुकीच्या वेळी लोक तुमच्या गावात येतील, घरात येतील. हात जोडून मतांचा जोगवा मागतील. निवडणूक जवळ आली, की उगवणारे कोण आणि गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून घरातल्या माणसाप्रमाणे सदैव तुमच्या सुखदुःखात सहभागी होणारा माणूस कोण?याचा विचार करा आणि मगच बटण दाबा.

तुम्ही बघताच आहात. गेल्या अनेक वर्षांपासून सगळ्यांना एकटाच झुंज देतोय. सगळ्यांना एकटा पुरून उरतोय. मतदारसंघात सहापैकी पाच आमदार सत्ताधारी पक्षाचे. केंद्र आणि राज्याप्रमाणाचे जिल्हा परिषदेतही सत्ता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची. प्रशासन आणि पोलिस देखील सत्ताधाऱ्यांनाच सामील असलेले. वेळोवेळी माझी आणि माझ्या पक्षाची मुस्कटदाबी करण्याचा आणि कायम कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होतो. विकासकामांचा निधी अडवून ठेव, कधी खोटी माहिती देऊन योजनेची अंमलबजावणीच रद्द कर, मी एखाद्या योजनेसाठी मागितलेला निधी दुसरीकडेच वळव, कधी मी केलेल्या कामांचे उद्घाटन स्वतःच करून खोटा प्रचार कर… असे अनेक मार्ग अवलंबून ही मंडळी मला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करतात.

राष्ट्रवादीने तर मला पराभूत करण्यासाठी नेत्यांची आख्खी फौजच्या फौजच शिरूरमध्ये उतरविली आहे. शरद पवार ठाण मांडून आहेत. अजित पवारांनी तर मला पराभूत करण्याचा विडाच उचलला आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यासंत्र्यांपासून ते गल्लीबोळातील पदाधिकाऱ्यापर्यंत जो उठतोय तो माझ्या विरोधात बोलतोय. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याशी फर्ड्या इंग्रजीतून बोलणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला ‘तुमचं शिक्षण किती,’ असा प्रश्न विचारला जातोय. घर, संसार आणि उद्योगधंद्याकडं दुर्लक्ष करून माझ्या मतदारसंघाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आणि मला विचारत आहेत, तुम्ही दहा वर्षात काय काम केलं. इतके सगळे आरोप करूनही मी जुमानत नाही, म्हटल्यावर मग आमच्याच काही लोकांना फितवून, फूस लावून आणि पैसे देऊन माझ्याविरोधात लढण्यासाठी उतरविण्यापर्यंत यांची मजल गेली.

10010661_805244569505463_4827094739406973192_o

महाभारतातील अभिमन्यूप्रमाणे मला घेरण्याची रणनिती राष्ट्रवादी काँग्रेसने आखलीय. पण मला हे चक्रव्यूह कसं भेदायचं हे मला माहितीय. नुसतं माहितीच नाही, तर मी राष्ट्रवादीचे हे चक्रव्यूह भेदणार आणि पुन्हा विजयी होणार, असा मला विश्वास आहे. छत्रपती शिवरायांनी पाच पातशाह्यांविरोधात लढा देऊन स्वराज्याची निर्मिती केली. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या पाच आमदारांविरोधात लढून त्यांना कायमचा धडा मी शिकविणार आहे. आई तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, दहा वर्षांत रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही. विकासकामांचा पैसा लाटला नाही. लोकांच्या कामांमध्ये कमिशन खाल्लं नाही. माझा दारूचा धंदा नाही. जुगाराचा आणि मटक्याच्या धंद्यात मी भागीदार नाही. वाळू उपश्याचा धंदा करून पैसे लाटलेले नाही. कधी कोणाला नाडला नाही, की कोणाकडून पैसा उकळला नाही. वाटमाऱ्या करून कधी आपापसांत वाटून घेतले नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीवाले मला घाबरत आहेत. कारण त्यांना माझ्याकडून काहीच वाटा मिळत नाही. भविष्यात आणखी डोईजड होईल म्हणूनच त्यांना स्वच्छ चारित्र्याचा आणि निष्कलंक प्रतिमेचा शिवाजी नको आहे.

पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसने कितीही अपशकुन केला, तरी मी निवडून येणारच याची मला खात्री आहे. कारण मी गेली पंधरा-वीस वर्षे लोकांमध्येच वावरलो. माझ्याकडे येईल त्याचे काम प्रामाणिकपणे आणि लवकरात लवकर कसे उरकता येईल, याचा प्रयत्न केला. विकासकामांना प्राधान्य दिले. जात, पात, धर्म आणि पक्ष यापैकी काहीच पाहिले नाही. गावागावांत, खेड्यांत आणि आदिवासी पाड्यांमध्ये गेलो. त्यांच्या अडी-अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुखाचे दिवस दाखविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. मतदार बंधू-भगिनी आणि तरुण-तरुणी माझ्या पाठिशी आहेत.

त्यामुळेच मला राष्ट्रवादीच्या या चक्रव्यूहाची भीती नाही. मी बिनधास्त आहे. अरे, छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन स्थापन झालेल्या शिवसेनेचा मी खासदार आहे. सच्चा शिवसैनिक आहे. टोळकं करून येणाऱ्या कोल्हे, लांडगे आणि तरसांना मी घाबरत नाही. मी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वाघ आहे वाघ. आडवे याल तर खबरदार..

1897674_10151935527787030_807607086160904921_n

आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसम्राट, दिवंगत शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांचे सहकार्य आणि शुभेच्छा, शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप मतदारांचे शुभाशिर्वाद नि तरूण मतदार बंधू-भगिनींच्या शुभेच्छा यांच्या जोरावर माझी वाटचाल सुरू आहे. यंदाही ती सुरूच राहणार. आता तर केंद्रात आणि पुढे राज्यातही आपलेच सरकार येणार आहे. त्यामुळे विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण करून विकासाच्या आणखी योजना राबविण्यासाठी मी सज्ज आहे.

तुमच्या पाठिंब्यामुळेच माझी आजवरची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे. यंदाच्या सतरा एप्रिलला तुम्ही धनुष्यबाणाच्या समोरील बटण दाबून मला एक नंबरच्या मताधिक्याने विजयी कराल, अशी खात्री आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्ही असेच माझ्यासोबत रहा. कारण तुम्ही सोबत असाल तर राष्ट्रवादी नि काँग्रेसने माझी कितीही कोंडी करण्याचा प्रयत्न केला, चक्रव्यूहात अडकविण्याचा प्रयत्न केला, तरी मी त्यातून मी विजयश्री खेचून वीरासारखा बाहेर पडेन, असा मला आत्मविश्वास आहे.

नवी दिल्लीवर भगवा फडकविण्याचे दिवंगत शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करूया… दिल्ली जिंकूया… गुरूवार दिनांक १७ एप्रिल रोजी धनुष्यबाणासमोरील बटण दाबून आपण नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी मला प्रचंड बहुमताने विजयी कराल, असा मला विश्वसा आहे…

धन्यवाद.

भगव्या झेंड्याची शान… धनुष्यबाण

जय हिंद… जय महाराष्ट्र…

1 thought on “वाघ एकला राजा…

Leave a comment