झालं आता निवडणूक शेवटच्या टप्प्यात आलीय. बरोबर आठवडाभरानं प्रचाराचा धुरळा उडणं थांबेल आणि मतदानाची १७ एप्रिल ही तारीख उजाडेल. यंदाच्या वेळीही आपला एक नंबरच आहे. त्यामुळं एक नंबरच्या उमेदवारासमोरचं बटण दाबून एक नंबरच्या लीडनं मला निवडून द्यायचं आहे, असं आवाहन मी आपणा सर्वांना करतोय. एक नंबरचं बटण म्हणजे शिवसेनेचा धनुष्यबाण. भगव्याची राखतो शान, शिवसेनेचा धनुष्यबाण.
गेल्या निवडणुकीत मला आपण सर्वांनी पावणेदोन लाखांहून अधिक मतांनी निवडून दिलं. भरघोस मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पाडाव केला होता. यंदा आपल्याला गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्यानं विजय मिळवायचा आहे. अर्थातच, आपल्या सर्वांचे सहकार्य आणि आशीर्वाद यांच्या जोरावर हे शक्य होऊ शकेल, असा मला विश्वास आहे. गेली दहा वर्ष फक्त मतदारसंघाचा विकास हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून फिरतोय. दिवस-रात्र न पाहता खेडोपाड्यांमध्ये मतदारांच्या गाठीभेठी घेण्यासाठी हिंडतोय. आदिवासी जनतेशी संवाद साधतोय. दहा वर्षांत वेळप्रसंगी संसाराकडं दुर्लक्ष केलं. उद्योगधंद्याऐवजी माझ्या मतदारसंघाला आणि विकासकामांना प्राधान्य दिलं. माझा मतदारसंघ अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणं जपला. त्यामुळंच यंदाच्या निवडणुकीतही आपण मला भरघोस मतांनी निवडून द्याल, अशी खात्री आहे.
माझं इतकं काम आहे, जनसंपर्क आहे म्हणून तर माझ्या विरोधात लढायला राष्ट्रवादीचा एकही आमदार तयार झाला नाही. कुणाच्या पोटात दुखायला लागलं, दुसऱ्याच्या छातीत कळ आली तर कुणाचं डोकं दुखू लागलं. माझ्याविरूद्ध लढायला कोणीच तयार होईना म्हणून मग दिलाय कोणीतरी उमेदवार राष्ट्रवादीनं. म्हणजे कारखान्याचा अध्यक्ष. अरे, मी उभा केलाय तो कारखाना. कारखान्याची उभारणी होत होती, तेव्हा तेव्हा मी तन, मन आणि धन खर्चून तिथं टिच्चून उभा होतो. प्रसंगी माझ्या खिशातला पैसा खर्च करून कारखाना चालू करण्यासाटी झटलो. मागं पुढं पाहिलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलो आणि शिवसेनेत दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा मी कारखान्याचा राजीनामा दिला. जो कारखाना मी माझ्या हातानं आणि मेहनतीनं उभा केला होता, त्याचा राजीनामा देऊन बाहेर पडलो. नैतिकता पाळली.
मध्यंतरी एका पक्षाचे नेते आले होते. म्हणे, शिवनेरीसाठी खासदारांनी काय केल? कधी प्रश्न उपस्थित केला का वगैरे वगैरे… बरंच काही बोलले. काय बोलणार आता लोकांबद्दल. बाकी सगळं सांगत बसत नाही. ते यापूर्वीही सांगितलंय. लिहिलंय. फक्त शिवनेरीच्या विकासाचा प्रश्न विचारलात ना त्याचंच सांगतो. २००७ मध्ये विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी खासदारांची बैठक बोलाविली होती. दिल्लीत संसदेच्या अधिवेशनादरम्यान महाराष्ट्रातील कोणते प्रश्न आवर्जून मांडले पाहिजेत, यावर चर्चा करण्यासाठी ती बैठक होती. २००७ मध्येच विलासराव देशमुख यांना पत्र दिलं होतं. जुन्नर तालुक्यातील नारायणगड, शिवनेरी, हरिश्चंद्रगड आणि हडसर या चार किल्ल्यांचे संवर्धन करण्याच प्लॅनच त्या पत्रामध्ये होता. चारही गडांचे क्लस्टर करून मग त्याचा विकास करावा आणि पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी जागतिक स्तरावर त्याचे मार्केटिंग करण्यात यावे, अशी योजना दिली होती. पुढे काय झाले ते तुम्हीच सरकारला विचारा. लोकसभेत मुद्द्यावर वेळोवेळी आवाज उठविला. मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. पण पुढे सरकायला तयारच नाही. आता काय बोलणार या मंडळींना.
आता केंद्रात आणि राज्यात आपले सरकार आल्यानंतर हे सारे प्रश्न प्राधान्याने सोडवून टाकू. सरकारमधली यांचीच मंडळी कोंडी करतात. विरोधकांच्या मतदारसंघातील विकास रोखून ठेवतात आणि त्यांचे गल्लीतील नेते काय विकास केला, काय विकास केला असे विचारतात. काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांचा हा दुटप्पीपणा आहे. त्याचा पर्दाफाश मी वेळोवेळी करतच राहीन.
तुम्हाला जर चर्चा करण्याची एवढीच इच्छा असेल, तर मग एखाद्या जाहीर सभेत येऊ आमनेसामने. मी काय विकास केला, ते कागदपत्रांसह आणि पुराव्यांसह मांडतो. नि तुम्ही तुम्ही केलेल्या कामांची जंत्री घेऊन या. होऊ दे जनतेसमोर खरं खोटं काय आहे ते. बोला काय करायचं यायचं का आमनेसामने. मी शिवसेनेचा छोकरा आहे. कुणाला घाबरणारा नाही. मागे हटणार नाही. लढत राहणार. झुंज देत राहणार.
१) पुण्यातील ससून हॉस्पिटलप्रमाणे किंवा मुंबईतील केईएम हॉस्पिटलप्रमाणे ग्रामीण भागासाठी आपल्या मतदारसंघात भव्य सरकारी हॉस्पिटल उभारण्यासाठी प्रयत्न करणार. जेणेकरून स्वस्त उपचारांसाठी पुण्यामध्ये जाण्याची आवश्यकता भासू नये. अत्यंत माफक दरात आणि चांगल्या पद्धतीने उपचारांची व्यवस्था या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असेल, याकडे लक्ष असेल.
२) पुणे-नाशिक रेल्वेमार्ग. पुण्याहून नाशिकला जाणारा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर आपल्या मतदारसंघाला त्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. त्याचे काम सुरू होईन जलदगतीने पूर्ण व्हावे, यासाठी मी प्रयत्नशील असेन. पुणे-नाशिक रेल्वेमार्गासाठी १८३९ कोटी रुपयांचा निधी २०१२ मध्ये मंजूर करण्यात आला आहे. सध्या हे प्रकरण नियोजन आयोगाकडे प्रलंबित असून त्यांच्या मान्यतेनंतर पुणे-नाशिक रेल्वेमार्गाला गती येईल.
३) दाऱ्याघाटाचा प्रश्न सोडविण्यासाठी माझे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. केंद्रात सत्ता आल्यानंतर त्याला आणखी गती मिळेल. २००४ मध्ये निवडून आल्यानंतर सर्वप्रथम फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांबरोबर दाऱ्याघाट हवाच म्हणून पाच बैठका घेतल्या. गेल्या तीन वर्षांपासून महसूल आणि फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठका सुरूच आहेत. बोगदा काढण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी महसूल विभागाला पत्र दिले आहे. पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्यास या प्रकल्पाला गती मिळेल. दाऱ्याघाटाची निर्मिती करताना साधारण फॉरेस्टची १९ ते २० एकर जमीन वापरली जाणार आहे. त्याबदल्यात त्यांना ४० एक जमीन देऊ, असे आश्वासन देणारे पत्र महसूल विभागाने फॉरेस्ट डिपार्टमेंटला दिले तर प्रकल्प मार्गस्थ होईल. मात्र, राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे हे प्रकरण अडकले आहे. मात्र, आपले सरकार आल्यानंतर या प्रकल्पाला गती मिळेल आणि त्यासाठी मी कटिबद्ध आहे.
४) आदिवासी भागासाठी शिक्षण आणि आरोग्याच्या सेवा पुरविण्यासाठी अधिक सक्षम आणि कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. आदिवासी भागातील समस्या सोडविण्यासाठी काय करताय येईल, यासंदर्भात मा. नरेंद्र मोदी आणि माझी चर्चाही झाली आहे. त्यांच्या आणि माझ्या कल्पना कशा पद्धतीने राबविता येतील, यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे.
५) बेरोजगार आणि स्थानिक युवकांना कशा पद्धतीने एमआयडीसीमध्ये सामावून घेता येईल, त्यांच्यासाठी अधिकाधिक उद्योगधंदे कसे आणता येतील, यावरही माझा भर असणार आहे. खेड, आंबेगाव आणि जुन्नरच्या पट्ट्यात ‘फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री’ची संकल्पना कशा पद्धतीने रुजविता येईल आणि त्यामध्ये स्थानिक तरुणांना कसे सामावून घेता येईल, यासाठी मी प्रयत्नशील आहे. प्रक्रिया केलेल्या शेतीमालाला जागतिक बाजारपेठेत अधिक मागणी आणि उठाव असल्यामुळे ती संकल्पना माझ्या भागात कशी रुजविता येईल, हे मी पाहणार आहे.
६) माझ्या मतदारसंघात धरणग्रस्तांचे प्रश्न खूप वर्षांपासून प्रलंबित आहेत. दहा वर्षांत मी त्याकडे जातीने लक्ष दिले आहेच. मात्र, पुढील पाच वर्षांतही ते सोडविण्यासाठी केंद्रीय स्तरावरून कशा पद्धतीने प्रयत्न होतील, याकडे मी लक्ष देणार आहे. खुद्द मा. नरेंद्र मोदी यांनीही या प्रश्नाकडे लक्ष देण्याचे सूतोवाच केले आहे.
जय महाराष्ट्र…
DADA – I don’t have more words to express about you, still I feel’s from the bottom of heart that – DADA is true, loyal (Faithful , Trustworthy , Reliable , Dedicated ) & a good human-being. So in future… DADA shall represent the Bharat with many directions…